Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांचा महाराष्ट्र पोस्ट खात्याला दणका
२० दिवसांत माहिती देण्याचा आदेश

 

कर्जत, ५ फेब्रुवारी/वार्ताहर शासनाच्या अल्पबचत योजनेमध्ये सुमारे एक कोटी रुपयांचा कथित स्वरूपाचा अपहार करण्याबाबतचा आरोप असलेल्या एका महिला अल्पबचत एजंटच्या प्रकरणासंदर्भात ‘पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी’संबंधी गुंतवणूकदाराने मागितलेली माहिती देण्यास नकार देणाऱ्या महाराष्ट्र पोस्ट खात्याला केंद्रीय माहिती मुख्य आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे. मागितलेली माहिती २० दिवसांच्या आत तक्रारदाराला उपलब्ध करून देण्याचा आदेश केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांनी दिले आहे. आता याप्रकरणी टपाल खात्याच्या कथित मनमानीपणाविरुद्ध ठाणे जिल्ह्याच्या ग्राहक मंचाच्या न्यायालयात रीतसर दाद मागण्यात आली आहे.
याप्रकरणी विशेष भूमिका बजावलेले येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनजागृती ग्राहक मंचाच्या शाखेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत देसाई, तसेच सचिव प्रभाकर गुरव यांनी यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीला सविस्तर माहिती दिली आहे. कर्जतमधील एका तत्कालीन महिला अल्पबचत एजंटकडून झालेल्या कथित अपहारासंबंधी कर्जत तालुक्यातील किरवली येथील एक गुंतवणूकदार महेंद्र भाटिया यांनी गतवर्षी नवी मुंबई विभागाच्या टपाल खात्याच्या केंद्रीय मुख्य माहिती अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. गेल्यावर्षी ११ मार्च रोजी माहितीच्या अधिकारातील कलम क्रमांक सहा अन्वये, कुळमुखत्यारपत्राबाबत म्हणजेच ‘पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी’संबंधी माहिती मागितलेली होती. मात्र डाकघर खात्याच्या अधीक्षकांनी असंबद्ध कारणे देऊन ही माहिती देण्यास भाटिया यांना नकार दिला होता.
अधीक्षकांच्या या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याचा निर्णय महेंद्र भाटिया यांनी घेतला होता. त्यासाठी त्यांनी जनजागृती ग्राहक मंचाच्या कर्जत शाखेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत देसाई यांच्याकडून विशेष मार्गदर्शन घेतले होते. त्यानुसार भाटिया यांनी २२ मे रोजी प्रथम अपीलीय अधिकारी असलेले मुंबईच्या जी. पी. ओ. कार्यालयातील डाकघर संचालक यांच्याकडे माहितीच्या अधिकारात अपील दाखल केले होते. मात्र त्यांनी ही माहिती भाटिया यांना उपलब्ध करून देण्यास नकार दिला होता.
त्यामुळे त्यानंतर महेंद्र भाटिया यांनी डॉ. देसाई यांच्याच मार्गदर्शनाखाली माहितीच्या अधिकारातील कलम १९(३) मधील तरतुदीनुसार दुसरे अपील ९ ऑगस्ट २००८ रोजी नवी दिल्ली येथील केंद्रीय माहिती आयोगाकडे दाखल केले होते. या अपिलाची नोटीस भाटिया यांना यावर्षी २० जानेवारी रोजी मिळाली. प्रत्यक्षात अपिलाची सुनावणी २१ जानेवारी रोजी ठेवण्यात आली होती. प्रचलित नियमानुसार सात दिवसांच्या अवधीची नोटीस भाटिया यांना प्राप्त झालेली नसल्यामुळे भाटिया यांनी फॅक्सद्वारे यासंबंधीची हरकत नोंदविली होती, तरीही २१ जानेवारी रोजी नवी मुंबई येथील डाकघर अधीक्षक प्रकाश शेवाळे यांनी टपाल खात्याच्या महाराष्ट्र विभागाचे प्रतिनिधी या नात्याने तेथे उपस्थित राहून युक्तिवाद केला होता. मात्र केंद्रीय माहिती आयुक्तांनी या युक्तिवादानंतर हे अपील योग्य असल्यामुळे अपीलकर्ते महेंद्र भाटिया यांच्या अनुपस्थितीत भाटिया यांच्याच बाजूने निर्णय दिला आहे. यासंबंधी भाटिया यांना अपेक्षित असलेली माहिती येत्या २० दिवसांच्या आत त्यांना उपलब्ध करून द्यावी, असा सुस्पष्ट आदेश केंद्रीय माहिती आयुक्तांनी दिला आहे.