Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

भजनसम्राट हरिश्चंद्रबुवा लोणारकर यांचा ८० व्या वाढदिवशी होणार गौरव
अलिबाग, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

रायगडचीच नव्हे, तर संपूर्ण राज्याची प्राचीन भजन परंपरा आपल्या सुमधूर आणि खडय़ा आवाजात अबाधित राखण्यात सिंहाचा वाटा असणारे आणि आपल्या याच सुमधूर आणि खडय़ा आवाजातून गेली तब्बल ६० वर्षे भजनरसिकांची अखंड सेवा करून लाखो भजनरसिकांच्या हृदयात आपले अनन्यसाधारण स्थान निर्माण केलेले रायगड जिल्ह्यातील लोकप्रिय व ज्येष्ठ संगीत भजनकार हरिश्चंद्रबुवा लोणारकर यांचा त्यांच्या ८० व्या वर्षी त्यांचेच एक चाहते आणि हितचिंतक विधानसभेचे माजी विरोधीपक्ष नेते व कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष लोकनेते अ‍ॅड. दत्ता पाटील यांच्या हस्ते शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता बुवांचे मूळ गाव भाल (अलिबाग) येथे गौरव केला जाणार आहे.
हरिश्चंद्रबुवा लोणारकर यांनी गेली ६० वर्षांहून अधिक काळ आपल्या संगीत भजन गायकीने भजनरसिकांची सेवा केली आहे. त्यांनी केलेल्या या सेवेचा यथोचित गौरव सार्वजनिक स्वरूपात व्हावा, अशी इच्छा त्यांच्या अनेक चाहत्यांनी व शिष्यवर्गानी वेळोवेळी व्यक्त केली होती. ८०व्या वर्षांत पदार्पणाच्या निमित्ताने ही संधी प्राप्त झाली आहे, म्हणून हरिश्चंद्रबुवांचे कुटुंबीय, शिष्यवर्ग आणि हिंतचिंतक मित्रपरिवाराच्या वतीने गौरवाचा हा सोहळा शनिवारी भाल येथील मराठी शाळेच्या प्रांगणात जगदीश पाटील- लोणारकर, अरविंद पाटील- लोणारकर आणि भजनरसिक व जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रसाद शां. पाटील यांच्या परिश्रमातून आयोजित करण्यात आला आहे.
या गौरव सोहळ्याचे औचित्य साधून हरिश्चंद्रबुवांनी आपल्या सुमधूर आवाजाने गायलेली लोकप्रिय संगीत भजनांची ध्वनिचित्रमुद्रिका आणि ध्वनिमुद्रिका रूपी गुंतले लोचन हा दोन सीडींचा संच प्रकाशित करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्याच्या संगीत भजन परंपरेत हरिश्चंद्रबुवांचे योगदान या विषयावर तमाम भजनरसिकांच्या वतीने पनवेल येथील भजन अभ्यासू अरुणबुवा कारेकर हे प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करणार आहेत. संध्याकाळी सात वाजता महाराष्ट्रातील नामवंत भजनसम्राट नाशिक येथील शंकरराव वैरागकर आणि अहमदनगर येथील बाळासाहेब वाईकर हे भजनसंध्या या संगीत चक्रीभजन जुगलबंदीतून हरिश्चंद्रबुवा लोणारकर यांच्या प्रति आपल्या आदरभावना व्यक्त करून भजनरसिकांना एक आगळी पर्वणी देणार आहेत. या मान्यवर भजनसम्राटांच्या संगीत चक्रीभजन जुगलबंदीस मृदुंगसाथ खारघर- नवी मुंबई येथील प्रताप पाटील, तबलासाथ पुण्याचे उदय ऊर्फ रामदास देशपांडे, टाळसाथ पुण्याचेच माऊली टाकळकर, व्हॉयोलिनसाथ पुण्यातील नामांकित व्हॉयोलिनवादक एजाज खान हे करणार आहेत, तर या संपूर्ण जुगलबंदीचे निवेदन नामांकित निवेदक सुजाता पाटील या करणार आहेत.