Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण वेळेत होणार - उपमुख्यमंत्री
सावंतवाडी, ५ फेब्रुवारी/वार्ताहर

 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण ठरल्या वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमिनी उपलब्ध झाल्यास पर्यटनस्थळी सर्व सुविधा असणारी विश्रामगृहे उभारली जातील, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय येथे विश्रामगृह भूमिपूजन, मसुरे येथे जोडरस्ता पुलाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पालकमंत्री मदन पाटील, आमदार गुरुनाथ कुलकर्णी, राजन तेली, दीपक केसरकर, संदेश पारकर, जि. प. अध्यक्ष काका कुडाळकर आदी उपस्थित होते. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण वेळीच पूर्ण होईल, तसेच बांदा येथील टोल नाक्यास विरोध करणाऱ्यांशी चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.
सर्वत्रच विकास कामांना विरोध होतो, त्यातून मार्ग काढला जाईल, असे सांगून त्यांनी पर्यटन जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे स्पष्ट केले.
सिंधुदुर्गचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून व्हायचा झाल्यास विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांनी राजकीय झेंडे बाजूला ठेवून जिल्हा विकास करण्यासाठी एकत्रित या, असे आवाहन भुजबळ यांनी मसुरे येथील कार्यक्रमात बोलताना केले. राजकीय झेंडे उभारून विकासाला विरोध करण्याचे थांबवा आणि पर्यटन विकासासाठी एकत्रित या, असे आवाहनही त्यांनी केले.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर ते गोव्यापर्यंतच्या रस्त्याचे भूसंपादन करावे, असे आवाहन केले. त्यांनी पर्यटनदृष्टय़ा दळणवळणाच्या साधनांची गरज असून सरकारकडे त्यासाठी आपण कायमच पाठपुरावा केल्याचे सांगितले.