Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

ऐतिहासिक संगमेश्वर विकासाच्या प्रतीक्षेत
संगमेश्वर, ५ फेब्रुवारी/वार्ताहर

 

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या कसबा-संगमेश्वर या ऐतिहासिक गावाला आजही विकासात्मक कामांची प्रतीक्षा असून, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हे गाव महाराष्ट्राच्या नकाशात जरी प्रसिद्ध म्हणून ओळखले जात असले तरी ते गेली अनेक वर्षे विकासाच्या प्रतीक्षेतच आहे.
तालुक्याचे नाव जरी संगमेश्वर असले तरी सर्व सरकारी कार्यालये व पंचायत समिती हे सर्व देवरुख येथे असल्याने ज्या मानाने देवरुख परिसराचा विकास झाला, त्या तुलनेत संगमेश्वर-कसबा या ऐतिहासिक गावांचा विकास होऊ शकला नाही. हा अपेक्षित विकास रखडण्यामागे राजकीय इच्छाशक्ती व लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा कमी पडल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
कसबा येथे चालुक्य राजवटीतील शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेले कर्णेश्वर मंदिर आहे. याच गावात संभाजी महाराजांना दगाबाजीने पकडण्यात आले. याचबरोबर आणखीही अनेक मंदिरे या गावात असल्याने या गावाचा उल्लेख मंदिराचा गाव असाच केला जातो. प्रत्यक्षात येथील तीन मंदिरे वगळता उर्वरित मंदिरे अर्धी जमीनदोस्त झाली असून, पुरातत्त्व विभागाकडे या मंदिराच्या जतनासाठी जो निधी आणणे आवश्यक आहे, त्यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत.
छत्रपती संभाजी महाराजांच्या नावे येथे उभारण्यात आलेल्या अर्धपुतळ्याव्यतिरिक्त येथे काहीच नसल्याने पर्यटकांची काहीशी निराशाच होते. कर्णेश्वर मंदिर हे चालुक्य राजवटीमधील असताना मंदिरातील पुजारी हे मंदिर पांडवकालीन असल्याचा खोटा इतिहास सांगत असल्यानेही पर्यटक नाराज होत आहेत. यावर आता मंदिर विश्वस्त समितीने आक्षेप घेण्याची खरी गरज आहे.
संगमेश्वर येथे ११ मार्च १९८९ रोजी संभाजी स्मारक उभारण्याचे काम सुरू झाले, मात्र गेल्या १९ वर्षांत हे स्मारक पूर्णत्वास जाऊ शकले नाही, हे कसबा-संगमेश्वरच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने दुर्दैवी असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संभाजी स्मारक हे तालुक्यातील एक महत्त्वाचे केंद्र बनविण्यासाठी आवश्यक निधी आणण्याकरिता लोकप्रतिनिधींकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
संगमेश्वरच्या दुतर्फा ३६ कि.मी.चे अपघातप्रवण क्षेत्र आहे. यासाठी युती शासनाच्या काळात मंजूर झालेल्या ट्रॉमा केअर सेंटरला अद्याप निधी मिळू शकत नाही. परिणामी, अपघातामधील गंभीर जखमींना आपले प्राण गमवावेच लागत आहे. याच्या जोडीने संगमेश्वर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला स्वतंत्र इमारत नसल्याने येथील ट्रेड मर्यादित आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी जागा घेण्यात आली आहे, मात्र इमारत उभारणीसाठी निधीची तरतूद केली गेली नसल्याने यावर्षी हे काम सुरू होण्याची शक्यता मावळली आहे.
नावडीची बाजारपेठ ही ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध आहे. मात्र सध्या या बाजारपेठेला पूर्वीची शान राहिली नसून बाजारपेठेतील वाहतूक कोंडी, रस्त्यांची अपूर्ण कामे, दरवर्षीची महापुराची भीती आदी समस्यांनी ही बाजारपेठ सतत ग्रासलेली असते. कसबा-संगमेश्वरच्या विकासासाठी आता निर्णायक लढा देण्याकरिता येथील ग्रामस्थांनीच एकत्र येण्याचे ठरविले आहे.