Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

सापे ग्रामपंचायतीमधील अपहाराच्या चौकशीची मागणी
महाड, ५ फेब्रुवारी/वार्ताहर

 

महाड तालुक्यातील सापे नडगावतर्फे तुडील या ग्रामपंचायतीच्या विकासाच्या कामासाठी आलेल्या निधीमध्ये मोठय़ा प्रमाणात अपहार करण्यात आला असून, या प्रकरणी त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सापे ग्रामस्थांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
महाड तालुक्यातील खाडी परिसरातील महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या सापे नडगावतर्फे तुडील या ग्रामपंचायतीमध्ये निर्मल ग्राम योजना कार्यान्वित करण्यासाठी शासनाकडून निधी देण्यात आला. दारिद्रय़रेषेखालील लाभार्थींसाठी ३१ शौचालये बांधण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करण्यात आल्यानंतर प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानंतर त्यासाठी लागणारे ३७ हजार २०० रुपये सापे ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आले. प्रत्यक्षात केवळ चारच लाभार्थींनी शौचालयाचे काम पूर्ण केले. मात्र ग्रामपंचायतीचे सरपंच देशमुख आणि ग्रामसेवक यांनी सर्व लाभार्थींनी शौचालये बांधून पूर्ण केल्याचा अहवाल सादर केला आणि ग्रामपंचायतीच्या खात्यातून ३२ हजार ४०० रुपये खर्च केल्याचे दाखविण्यात आले, असा आरोप गावातील ज्येष्ठ नागरिक डी.एन. देशमुख यांनी केला आहे. शासनाकडून गावाच्या विकासासाठी देण्यात आलेल्या निधीची रक्कम पंचायतीच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर खाते चालविण्याचा अधिकार सरपंच आणि ग्रामसेवकांना देण्यात आल्याने त्या अधिकाराचा गैरवापर सरपंच आणि ग्रामसेवकाने केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारची अनेक प्रकरणे तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये घडलेली असताना केवळ राजकीय दबावामुळे अधिकारी वर्ग कारवाई करण्यास पुढे येत नसल्याचे दिसून येते. सापे गावामध्ये निर्मल ग्राम योजनेकरिता आलेल्या निधीमध्ये ज्याप्रमाणे अपहार केला आहे, त्याचप्रमाणे यशवंत ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. १२ व्या वित्त आयोगांतर्गत स्मशानभूमीचे काम करण्यात आले. ही दोन्ही कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत, यालाही सरपंच, ग्रामसेवक जबाबदार आहेत.