Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

वरिष्ठ सरकारी अधिकारी हजेरी
पंचनामा अभियानाचे सर्वत्र स्वागत
अलिबाग, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

बुधवारी रायगड जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे त्यांच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष पंचनामे करण्याचे अभियान अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटना, भाजपा कार्यकर्ते आणि नागरिकांनी संयुक्तरीत्या अमलात आणून जिल्हा प्रशासनातील अक्षम्य बेजबाबदारपणा उघड केल्याबद्दल रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी या उपक्रमांचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत करून पत्रकारांचे दूरध्वनी, फॅक्स आणि पत्राद्वारे अभिनंदन केले आह़े
रायगडमधील ज्येष्ठ वकील अ‍ॅड. बाळासाहेब जोशी यांनी अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेचे पत्र पाठवून खास अभिनंदन केले आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात असलेल्या तक्रारीस तुमच्या संघटनेने वाचा फोडल्याबद्दल पत्रकार व संघटनेचे आभार मानावेत तितके थोडे आहेत़ राज्य शासनाने गैरहजर अधिकाऱ्यांबाबत काढलेल्या आदेशाचा उल्लेख आह़े वास्तविक असा आदेश काढून शासनाने व सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या चुकीची व नाकर्तेपणाची प्रत्यक्षरीत्या कबुलीच दिलेली आह़े असा आदेश असूनही सरकारी अधिकारी व कर्मचारी विशेषत: रायगड जिल्ह्यातचे उच्चपदस्थ अधिकारी व कर्मचारी स्वत:च्या जबाबदारीबद्दल किती निष्काळजी असतात, याचे चित्र या तुमच्या कार्यामुळे जनतेसमोर आले आह़े अधिकारी किंवा सरकारी कर्मचाऱ्यांनी साहेबी थाटात वागणे योग्य नाही, असे अ‍ॅड. जोशी यांनी पत्रात नमूद केले आहे.
महाराष्ट्र धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेनेही या अभियानाबद्दल अभिनंदन केले आहे. सरकार जनतेची बांधील आहे, जनता सरकारची नव्ह़े पंचनामे करण्याचे अधिकार केवळ पोलिसांनाच आहेत, असा जो समज वर्षांनुवर्षे करून दिला जात होता, तो खोडून काढून जनता नोकरशहांचे न्याय्य मार्गाने पंचनामे करून, त्यांना जनसामान्यांसाठी कार्यरत करून घेऊ शकते हा महत्त्वपूर्ण मार्ग अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेने दाखवून दिले, अशी प्रतिक्रिया यानिमित्ताने बोलताना महाराष्ट्र धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचे जिल्हा संघटक सतीश लोंढे यांनी दिली आह़े
दरम्यान, गैरहजर जिल्हाधिकारी डॉ़ निपुण विनायक, अप्पर जिल्हाधिकारी रामदास खडतरे, निवासी उपजिल्हाधिकारी रमेश सुरवाडे, उपजिल्हाधिकारी गायकवाड, प्रवीण पुरी, उपविभागीय महसूल अधिकारी रेवती गायकर व तहसीलदार एन. व्ही. कर्णिक यांच्या कार्यालयात करण्यात आलेले वस्तुनिष्ठ पंचनामे शासनाच्या मुख्य सचिवांना पाठविण्यात येत असल्याची माहिती अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेचे महासचिव नितीन पाटील यांनी दिली आह़े, तर हे सर्व पंचनामे भाजप ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, पांडुरंग फुंडकर, विनोद तावडे व विरोधी पक्ष नेते रामदास कदम यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी रवाना करण्यात येत असल्याची माहिती अलिबाग तालुका भाजप अध्यक्ष हेमंत दांडेकर व अलिबाग शहर भाजप सरचिटणीस सुनील दामले यांनी दिली आह़े