Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

रविवारी अलिबागमध्ये इस्पात मॅरेथॉन स्पर्धा
जिल्हाभरातून आठ हजारावर स्पर्धक सहभागी होणार
अलिबाग,५ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

 

जिल्ह्याच्या क्रीडाक्षेत्रात अनन्यसाधारण स्थान संपादन केलेली इस्पात मॅरेथॉन स्पर्धा रविवार ८ फेब्रुवारी रोजी अलिबागमध्ये होत असल्याची माहिती इस्पात इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रदीप पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पध्रेचे आयोजन राज्याच्या युवा व क्रीडा संचालनालय व रायगड जिल्हा क्रीडा परिषद यांच्या माध्यमातून करण्यात येत असून स्पध्रेचे एकमेव प्रायोजक इस्पात इंडस्ट्रीज आहेत़ इस्पात इंडस्ट्रीज यंदा २५ व्या वर्षांत पदार्पण करीत असल्याने २००९ हे इस्पात कंपनीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे व ऐतिहासिक वर्ष आह़े रजत महोत्सवी वर्षांतील ही सातवी ‘इस्पात मॅरेथॉन स्पर्धा’ आहे. या इंडस्ट्रीजने स्पध्रेस अनुरूप अशी १ लाख ७५ हजार रुपयांची पारितोषिके ठेवली असल्याचे पांडे यांनी सांगितले. यावेळी इस्पात इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजीव दोंदे, सुरक्षा व सतर्कता संचालक उल्हास जोशी आदी उपस्थित होते.
स्थानिक युवकांच्या क्रीडागुणांना वाव देऊन त्यांच्यातील सुप्त गुण जागृत करणे हा उद्देश या स्पर्धेमागे असून, २००३ पासून सुरू झालेल्या या स्पध्रेत अनेक युवक-युवतींनी आजवर भाग घेतला. यंदा आठ हजारावर खेळाडू यात सहभागी होतील असा विश्वास राजीव दोंदे यांनी व्यक्त केला आहे. इस्पात मॅरेथॉनबरोबर सायकलिंग स्पर्धाही असून, या दोन्ही स्पर्धा रविवार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३० वाजता अलिबागमधील क्रीडाभवनात सुरू होतील. स्पर्धेत २१ किमी खुल्या गटाची पुरुष गट पूर्ण मॅरेथॉन, १० किमीची २० वयापर्यंतच्या पुरुषांची अर्ध मॅरेथॉन, ५ किमीची महिलांची खुल्या गटाची धावण्याची स्पर्धा, १५ वर्षांआतील मुलींची ५ किमी धावण्याची स्पर्धा, ४५ वा त्या पेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठांची ५ किमीची धावण्याची स्पर्धा तर इस्पात कर्मचाऱ्यांसाठी ३ किमीची इस्पात ड्रीम रन स्पर्धा होईल. पुरुषांसाठी ३० किमीची तर महिलांसाठी २० किमीची सायकल स्पर्धा होईल.