Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९

राज्य

भारतीय जनता पक्षाचे आजपासून नागपुरात राष्ट्रीय अधिवेशन
नितीन तोटेवार
नागपूर, ५ फेब्रुवारी

शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी येत्या लोकसभा निवडणुकीसाठीचे धोरण ठरवचानाच शेतकऱ्यांचे प्रश्न, दहशतवाद यासह काही राजकीय आणि आर्थिक ठरावांवरून केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला धारेवर धरण्यात येणार आहे.
लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा केंद्रात सत्तेत येण्याचा संकल्प असून समृद्ध आणि सुरक्षित भारत हे आमचे लक्ष्य आहे.

निर्दय सरकारला धडा शिकवा - उद्धव ठाकरे
अमरावती, ५ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

एकीकडे शेतकऱ्यांच्या हजारोंनी आत्महत्या होत असताना सरकारच्या हृदयाला पाझर फुटत नाही. मात्र दहशतवादी अफजलला फाशी देताना त्यांचा जीव कासावीस होतो, अशा या निर्दय सरकारला लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. कसाब, अफजल काँग्रेसचे जावई असतील तर त्यांना घेऊन काँग्रेसवाल्यांनी पाकिस्तानमध्येच जायला हवे, अशा शब्दात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर टीका केली.

मराठा समाजाला १५ टक्के आरक्षण द्या - रामदास आठवले
नागपूर, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

मराठा समाजाला १५ टक्के आरक्षण राज्य शासनाने द्यावे, स्वतंत्र विदर्भाबाबत सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भूमिका जाहीर करावी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीने रिपाइंसाठी लोकसभेच्या सहा जागा सोडाव्या आदी मागण्या रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी आज नागपूर येथे पत्रकर परिषदेत केल्या.

केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांचा महाराष्ट्र पोस्ट खात्याला दणका
२० दिवसांत माहिती देण्याचा आदेश

कर्जत, ५ फेब्रुवारी/वार्ताहर शासनाच्या अल्पबचत योजनेमध्ये सुमारे एक कोटी रुपयांचा कथित स्वरूपाचा अपहार करण्याबाबतचा आरोप असलेल्या एका महिला अल्पबचत एजंटच्या प्रकरणासंदर्भात ‘पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी’संबंधी गुंतवणूकदाराने मागितलेली माहिती देण्यास नकार देणाऱ्या महाराष्ट्र पोस्ट खात्याला केंद्रीय माहिती मुख्य आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे.

भजनसम्राट हरिश्चंद्रबुवा लोणारकर यांचा ८० व्या वाढदिवशी होणार गौरव
अलिबाग, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

रायगडचीच नव्हे, तर संपूर्ण राज्याची प्राचीन भजन परंपरा आपल्या सुमधूर आणि खडय़ा आवाजात अबाधित राखण्यात सिंहाचा वाटा असणारे आणि आपल्या याच सुमधूर आणि खडय़ा आवाजातून गेली तब्बल ६० वर्षे भजनरसिकांची अखंड सेवा करून लाखो भजनरसिकांच्या हृदयात आपले अनन्यसाधारण स्थान निर्माण केलेले रायगड जिल्ह्यातील लोकप्रिय व ज्येष्ठ संगीत भजनकार हरिश्चंद्रबुवा लोणारकर यांचा त्यांच्या ८० व्या वर्षी त्यांचेच एक चाहते आणि हितचिंतक विधानसभेचे माजी विरोधीपक्ष नेते व कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष लोकनेते अ‍ॅड. दत्ता पाटील यांच्या हस्ते शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता बुवांचे मूळ गाव भाल (अलिबाग) येथे गौरव केला जाणार आहे.

वरिष्ठ सरकारी अधिकारी हजेरी
पंचनामा अभियानाचे सर्वत्र स्वागत
अलिबाग, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी
बुधवारी रायगड जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे त्यांच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष पंचनामे करण्याचे अभियान अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटना, भाजपा कार्यकर्ते आणि नागरिकांनी संयुक्तरीत्या अमलात आणून जिल्हा प्रशासनातील अक्षम्य बेजबाबदारपणा उघड केल्याबद्दल रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी या उपक्रमांचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत करून पत्रकारांचे दूरध्वनी, फॅक्स आणि पत्राद्वारे अभिनंदन केले आह़े रायगडमधील ज्येष्ठ वकील अ‍ॅड. बाळासाहेब जोशी यांनी अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेचे पत्र पाठवून खास अभिनंदन केले आहे.

रविवारी अलिबागमध्ये इस्पात मॅरेथॉन स्पर्धा
जिल्हाभरातून आठ हजारावर स्पर्धक सहभागी होणार
अलिबाग,५ फेब्रुवारी/ प्रतिनिधी
जिल्ह्याच्या क्रीडाक्षेत्रात अनन्यसाधारण स्थान संपादन केलेली इस्पात मॅरेथॉन स्पर्धा रविवार ८ फेब्रुवारी रोजी अलिबागमध्ये होत असल्याची माहिती इस्पात इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रदीप पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पध्रेचे आयोजन राज्याच्या युवा व क्रीडा संचालनालय व रायगड जिल्हा क्रीडा परिषद यांच्या माध्यमातून करण्यात येत असून स्पध्रेचे एकमेव प्रायोजक इस्पात इंडस्ट्रीज आहेत़

मराठा आरक्षण मागणाऱ्यांना रामदास कदमांनी संबोधले गधडे
मालेगाव, ५ फेब्रुवारी / वार्ताहर

मराठा समाजासाठी आरक्षण मागणाऱ्यांना ‘गधडे’ ठरवितानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी आरक्षणाचे हे आंदोलन म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करण्यात येणारी स्टंटबाजी असल्याची टीका येथे बुधवारी शिवसेनेतर्फे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात बोलताना केली. सर्वधर्मिय विवाह सोहळ्याचे हे व्यासपीठ राजकीय व्यासपीठ नाही याची जाणीव असल्याने आपण तसे भाषण करणार नाही, असे सुरूवातीलाच नमूद करणाऱ्या कदम यांना समोर दिसणाऱ्या प्रचंड जनसमुदायापुढे बोलताना मात्र राजकीय भाष्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडण्याची संधीही दवडली नाही. आपल्या भाषणात त्यांनी राज्यातील विद्यमान सरकार वांझोटे असल्याची टीका केली. राज्यात सध्या चर्चेत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ाचा उल्लेख करून मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काय भूमिका आहे, हे विचारण्यासाठी मराठा संघटनेचे काही लोक आपल्याला भेटल्याचा दाखला देत, त्यावर टीप्पणी करताना कदम म्हणाले की, ‘अरे गधडय़ांनो.. आरक्षण ठिक आहे, पण सर्वसामान्यांच्या पोटात अन्न जाण्यासाठी या सरकारची काय भूमिका आहे हे आधी का विचारीत नाही, अजित पवारांपासून दिलीप वळसे पाटलांपर्यंत निम्मे मंत्री मराठा असताना आरक्षण घेण्यास थांबवले कुणी आणि जर ते मिळत नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसपासून बाजूला का होत नाही’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीच्या तोंडावर अशी स्टंटबाजी करण्यापेक्षा ठोस निर्णय घेण्याचे आव्हानही कदम यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना यावेळी दिले.

शालान्त परीक्षेच्या हॉल तिकिटांचा गोंधळ
बेलापूर, ५ फेब्रुवारी/वार्ताहर

नेहमीची येतो पावसाळा या उक्तीनुसार याही वर्षी शिक्षण मंडळाच्या भोंगळ कारभाराचे दर्शन विद्यार्थ्यांना पहावयास मिळाले. नेहमीप्रमाणे याहीवर्षी शालांत परीक्षेच्या हॉल तिकिटांमध्ये अनुक्रमांक व केंद्र क्रमांक यामध्ये तफावत आढळून आली आहे. याहून अधिक कहर म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांचे पाटीटाकूपणा असा की विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर अन्य विद्यार्थ्यांचा नव्हे, तर चक्क विद्यार्थिनीचे छायाचित्र लावण्यात आले आहे. बारावीच्या परीक्षेस दोन आठवडे शिल्लक राहिले असताना आता विद्यार्थ्यांची भंबेरी उडाली आहे. एकीकडे अभ्यासाचा ताण असताना शिक्षण मंडळाच्या या चुकांमुळे या विद्यार्थ्यांस आपण आणखी किती छळणार आहोत, असा प्रश्न भारतीय विद्यार्थी सेनेचे नवी मुंबईप्रमुख सोमनाथ वास्कर यांनी उपस्थित केला आहे. या चुकांप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाविसेच्या शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे वाशीतील शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांकडे केली आहे. या वेळी शिष्टमंडळात नगरसेवक विजय माने, भाविसे शहर संघटक काशिनाथ पवार व अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

‘गरिबी हटविण्यासाठी सहकार हाच राजमार्ग’
सावंतवाडी, ५ फेब्रुवारी/वार्ताहर
सारस्वत बँकेत सरकारचा एक नवा पैसाही नाही. सामान्य माणसांच्या तुटपुंज्या भांडवलावर बँकेने देशातील नागरी सहकारी बँकेत प्रथम क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. भारतातील गरिबी दूर करण्यासाठी सहकार क्षेत्रच राजमार्ग आहे, असे प्रतिपादन सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांनी केले.देशात १६० कोटींपैकी ९३ कोटी लोक गरिबीत आहेत. मग भारत देश आर्थिक महासत्ता कसा काय बनेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.सारस्वत बँकेच्या सावंतवाडी शाखेचे उद्घाटन हाफकीन इन्स्टिटय़ूटचे माजी संचालक डॉ. बी. बी. गायतोंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी राजमाता सत्वशिलादेवी भोसले, आमदार शिवराम दळवी, माजी मंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार जयानंद मठकर, विजय सावंत, माजी नगराध्यक्ष दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्वेता शिरोडकर, अनंत पोकळे, उपाध्यक्ष किशोर रांगणेकर, संचालक सुनील सौदागर, मदन देसाई, देशपांडे, सहव्यवस्थापकीय संचालक शशिकांत साखळकर, व्यवस्थापकीय संचालक समीरकुमार बॅनर्जी आदी उपस्थित होते.देशातील १८१३ नागरी सहकारी बँकांमध्ये आशिया खंडात सारस्वत बँक प्रथम क्रमांकावर आहे. अशा तऱ्हेने विजयी होऊन सावंतवाडीत आलो आहोत, असे एकनाथ ठाकूर यांनी सांगितले. देशातील ३१ राज्य सहकारी बँकापैकी २६ नफ्यात आहेत. त्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आघाडीवर आहे. सारस्वत बँकेने बँकिंग क्षेत्रातील विश्वासार्हता राखली आहे, असे त्यांनी सांगितले. देशात एक हजार शाखा सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

शनिवारी साकारणार ‘चेंढरे सन्मान - २००९’ सोहळा
अलिबाग, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या आणि क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, उद्योग, महिला विशेष व सांस्कृतिक या क्षेत्रांत आगळी कामगिरी केलेल्या सहा गुणवंतांसाठी ‘चेंढरे सन्मान - २००९’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता सतीश इंजिनीयरिंग पटांगण येथे करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार जयंत पाटील, आमदार विवेक पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, जि. प. अध्यक्षा अ‍ॅड. नीलिमा पाटील, बाळाराम पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती उपक्रमाचे संयोजन प्रमुख जि. प. सदस्य संजय पाटील यांनी दिली. १०० पेक्षा अधिक बालकलाकार, ६५ युवा कलाकार, ३० तंत्रज्ञ आणि ५० व्यवस्थापन प्रतिनिधी अशा चमूच्या माध्यमातून पुरस्कार क्षेत्राशी निगडित कलाविष्कार, कॉम्प्युटराईज्ड प्रकाशयोजना हे या सोहळ्याचे महत्त्वपूर्ण आकर्षण राहणार असल्याचे अक्षय टी.व्ही.चे यतीन घरत यांनी सांगितले. यावेळी संयोजन समिती सदस्य वीरेंद्र साळवी, माधव जोशी, परेश देशमुख, रामचंद्र पाटील, संजय कवळे, प्रशांत फुलगावकर आदी उपस्थित होते.