Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९

क्रीडा

भारताच्या विजयाची नऊलाई!
श्रीलंकेवर ६७ धावांनी विजय* गौतम गंभीरच्या १५० धावा* कर्णधार धोनीचे शतक हुकले

कोलंबो, ५ फेब्रुवारी / पीटीआय

गौतम गंभीर आणि महेंद्र सिंग धोनीने रचलेल्या पायावर भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेविरुद्धच्या सलग चौथ्या विजयाचा कळस चढवला. सलग नवव्या एकदिवसीय विजयाची नोंद करत नवा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या भारतीय संघाचे आव्हान यजमान श्रीलंकेला या लढतीतही झेपलेच नाही. ६७ धावांनी मिळवलेल्या या सहज विजयासह भारताने मालिकेत ४-० ने आघाडी घेत निर्भेळ यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. येत्या रविवारी होणारी शेवटची लढत जिंकून भारतीय संघ निर्भेळ यश संपादन करतो, हीच उत्सुकता आता या मालिकेत शिल्लक आहे. १० फेब्रुवारीला होणाऱ्या ट्वेन्टी-२० सामन्याने भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सांगता होणार असून तीसुद्धा विजयानेच गोड होईल, अशी आशा आहे.

सहा, सात, आठ, नऊ आणि नंतर दहा..
मुंबई, ५ फेब्रुवारी / विशेष प्रतिनिधी

महेंद्रसिंग धोनीच्या भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेला श्रीलंकेत ५-० अशी धूळ चारण्याचा विडा उचलला आहे. त्या पणाच्या पूर्तीच्या भारतीय संघ समिप येऊन पोहोचला आहे. पाच सामन्यांची प्रत्येक पायरी पादांक्रात केल्यानंतर भारतीय संघ विजय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करीत आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सलग विजयाच्या प्रत्येक अंकाच्या आकाराचा खास केक सामन्यानंतर कापण्यात येतो. इंग्लंडविरुद्ध सलग पाच विजय मिळविणाऱ्या भारतीय संघाने दम्बुला येथील सलामीची लढत जिंकल्यानंतर सहा या अंकाचा केक कापला. दुसरी, तिसरी आणि चौथी लढत प्रेमदासा स्टेडियमवर जिंकल्यानंतर अनुक्रमे ७, ८ आणि ९ या अंकांचे केक कापण्यात आले. या केकमध्येही काही साम्य आहे. प्रत्येक केक १०-१० किलो वजनाचा असतो. तो केक कापण्याचा बहुमान फक्त एकाच खेळाडूकडे जातो. तो खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. खास बाब म्हणजे भारतीयांनी १० या अंकाचा केकही तयार करून घेतला आहे.

शतकवीर अजिंक्यवर पश्चिमेची मदार
जाफर आणि ठक्करचे अर्धशतक
चेन्नई, ५ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था
रणजी करडंक स्पर्धेमध्ये हजार धावांचा टप्पा ओलांडून मुंबईसाठी ‘रन मशिन’ ठरलेल्या अजिंक्य रहाणेने आज येथील चिदंबरम स्टेडियमवर दुलीप करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत झळकाविलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर पश्चिम विभागाला पहिल्या दिवसअखेर तीनशे धावांचा टप्पा गाठता आला. दक्षिण विभागाने केलेल्या अचूक माऱ्यामुळे फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या खेळपट्टीवर अजिंक्यचा अपवाद वगळता पश्चिम विभागाच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही.

पिटसरनचे शतक हुकले; इंग्लंड ५ बाद २३६
किंग्जस्टन, ५ फेब्रुवारी / एएफपी

केव्हिन पिटसरनच्या (९७) झुंजार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने काहीशा डळमळीत सुरुवातीनंतरही वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ५ बाद २३६ धावांची सन्मानजनक मजल मारली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ४३ धावावर नाबाद असलेल्या अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिंटॉफला मॅट प्रायर (२७) साथ देत होता. सबिना पार्कवर बुधवारपासून सुरू झालेल्या या कसोटीत केव्हिन पिटर्सनचा अपवाद वगळता इंग्लंडच्या अन्य फलंदाजांना विंडीजच्या अचूक माऱ्यापुढे वेगाने धावा काढण्यात अपयश आले.

ह्य़ुजेस करणार ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात
कटिच, मॅक गेन संघात परतले
मेलबर्न, ५ फेब्रुवारी / पीटीआय
सलामीची बाजू सांभाळण्यासाठी नवोदित फिलिप ह्य़ुजेसला निवृत्त मॅथ्यू हेडनच्या जागी स्थान देऊन ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थानाचा बचाव करण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी सर्वात अननुभवी संघ निवडला आहे. ऑस्ट्रेलियाने मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका १-२ ने गमावल्यानंतर जागतिक कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ही आगामी मालिका जिंकणे गरजेचे आहे. त्या मालिकेतच दक्षिण आफ्रिकेने जगजेत्यांना आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतूनही खाली खेचले होते.

आयपीएलच्या दुसऱ्या पर्वात पिटरसन, फ्लिंटॉफ लिलावाचे आकर्षण
पणजी, ५ फेब्रुवारी / पीटीआय

इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या दुसऱ्या पर्वासाठी आता क्रिकेटविश्व सज्ज झाले आहे. गोव्याच्या रमणीय वातावरणात उद्या होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावासाठी इंग्लिश फलंदाज केव्हिन पिटरसन, अ‍ॅण्ड्रय़ू फ्लिंटॉफ यांच्यासह क्रिकेट रणभूमीवरील ४३ रथी-महारथी विशेष आकर्षण ठरणार आहेत. तथापि, ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार मायकेल क्लार्कने सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल स्पध्रेतून अंग काढून घेतले आहे.

मायकेल क्लार्कची माघार
मेलबोर्न, ५ फेब्रुवारी,/ वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार मायकेल क्लार्क याने इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेशी बोलताना खुद्द क्लार्क यानेच ही माहिती दिली. सतत खेळत असल्याने मला विश्रांती घेण्याची गरज वाटत आहे. त्यामुळेच मी या स्पर्धेत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन प्रीमियर लीगची ही स्पर्धा ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी खूपच उपयुक्त ठरली असती. परंतु हा वेळ मी विश्रांतीसाठी कारणी लावणार आहे, असे क्लार्क याने सांगितले. क्लार्क याने सांगितले की, या हंगामात आमचा संघ भरपूर खेळला आहे. सतत व्यस्तकार्यक्रमातून काही काळ विश्रांती घेणे आवश्यकच ठरते. विश्रांतीच्या काळात कुटुंबीयांसमवेत वेळ घालवणे मला महत्त्वाचे वाटते. क्लार्क याच्यासाठी १० दशलक्ष डॉलर एवढय़ा मोठय़ा रकमेची बोली लावली गेली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या संघातील कर्णधार रिकी पॉंटिंग याच्यासह दहा खेळाडू तसेच निवृत्ती घेतलेले शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा, जस्टीन लॅंगर, अ‍ॅडॅम गिलख्रिस्ट, मॅथ्यू हेडन हे सहभागी होणार आहेत. नॅथन ब्रॅकन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, सायमन कटिच, ब्रेट ली, कॅमेरुन व्हाईट हे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

पुरेशा तयारी अभावी ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजविण्याची भारताची संधी हुकली -मिकी आर्थर
नवी दिल्ली, ५ फेब्रुवारी / पीटीआय

क्रिकेटविश्वातील ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाला ओहोटी लागली असून, गेल्या वर्षी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन दौऱ्यापूर्वी तेथील वातावरणात रुळण्यासाठी पुरेसा कालावधी मिळाला असता तर त्यांनीच यजमानांवर पूर्णपणे हुकुमत गाजविली असती, असे दक्षिण आफ्रिका संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियात गेल्या १७ वर्षांत विजय मिळविण्याची करामत गेल्या वर्षी भारताने केलेली असली तरी त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेनेही हा पराक्रम केल्याचे आर्थर यांनी निदर्शनास आणले आहे.गेल्या वर्षीचा भारताचा दौरा हा वाद आणि नाराजी यांच्यामुळेच अधिक गाजला. प्रत्यक्षात मात्र त्या दौऱ्यात चमकदार खेळही पाहायला मिळाला आणि उभय संघांमध्ये भारतीय संघ खराब सुरुवातीनंतरही बलवान वाटल्याचे आर्थर यांनी म्हटले आहे. दोन आठवडय़ानंतर आर्थर यांचा दक्षिण आफ्रिका संघ पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन संघाशी दोन हात करणार आहे. भारताच्या तुलनेत दक्षिण आफ्रिका संघ ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेपूर्वी १० दिवस तेथे डेरेदाखल झाला होता व त्यामुळेच आम्हाला तेथील वातावरणात रुळण्याची संधी मिळून आम्ही जिंकू शकलो. दक्षिण आफ्रिकेने कसोटी व एकदिवसीय मालिकेतही विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. आर्थर यांच्या मते दक्षिण आफ्रिका व भारतानेही ऑस्ट्रेलियन संघाला अडचणीत आणले असून, आता इंग्लंड संघदेखील अ‍ॅशेस मालिकेत त्याची पुनरावृत्ती करू शकेल. अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफ, केवीन पीटरसन आणि स्टीव्ह हार्मिसन हे सगळे फिट आणि चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असल्याने आगामी अ‍ॅशेस मालिका चुरशीची ठरेल, असे आर्थर यांनी म्हटले आहे.

पवार, कलमाडी यांची बिनविरोध निवड
महाराष्ट्र ऑलिंम्पिक संघटनेच्या सरचिटणीसपदासाठी लांडगे-जाधव यांच्यात लढत
पुणे, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

महाराष्ट्र ऑलिंम्पिक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा ८ फेब्रुवारी रोजी येथे होत असून संघटनेच्या सरचिटणिसपदाकरिता कुस्ती संघटक बाळाशाहेब लांडगे व सायकलिंग संघटक प्रताप जाधव यांच्यात लढत होणार आहे. संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, संघटनेचे अन्य सर्व पदांची निवड एकमताने करण्यात आली आहे. अध्यक्षपदी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय ऑलिंम्पिक संघटनेचे अध्यक्ष खासदार सुरेश कलमाडी, केंद्रीय नागरी वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल, नेमबाजी प्रशिक्षक अशोक पंडित, अ‍ॅथलेटिक्स संघटक सतीश प्रधान यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. खजिनदारपदी चंद्रकांत शिरोळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.सरचिटणिसपदाची निवडणूक रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे. लांडगे हे कुस्तीचे ज्येष्ठ प्रशिक्षक व संघटक असून अनेक वर्षे ते संघटनेवर काम करीत आहेत. जाधव तरुण कार्यकर्ते असून ते स्वत: सायकलपटू व प्रशिक्षक आहेत.वार्षिक सर्वसाधारण सभा ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता रेसिडन्सी क्लब येथे होईल.

सायमंड्सला संघात परतलेले मला पहायचे आहे - वॉर्न
मेलबर्न: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड न होणे ही ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अ‍ॅंड्रय़ू सायमंड्स याच्यासाठी इष्टापत्ती ठरेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा निवृत्त फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याने व्यक्त केले आहे. ‘द टेली टेलिग्राफ’ या वृत्तपत्रातील स्तंभात वॉर्न याने हे मत व्यक्त केले आहे. वॉर्न म्हणतो की, संघात निवड न झाल्याने या काळाचा वापर त्याला कारकीर्द वाचविण्यासाठी करता येईल. सायमंड्सचा सूर सध्या हरवलेला आहे. या काळात स्थानिक स्पर्धामध्ये खेळून त्याला गमाविलेला फॉर्म परत मिळविता येईल. अन्य प्रश्न सोडविण्यासाठीही या काळाचा वापर करता येऊ शकेल. वॉर्न ने सायमंड्सविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे. एकाच वेळी अनेक गोष्टींत गुंतला गेल्याने तो सतत वादाच्या भोवऱ्यात सापडतो. मी त्याच्या खेळाचा चाहता आहे.त्यामुळे तो लवकरात लवकर संघात परतलेला मला पाहायचे आहे, असे वॉर्नने नमूद केले. त्याने पुढे म्हटले आहे की, प्रत्येक माणसाच्या हातून चुका होतच असतात. माणूस या चुकांतून शिकत असतो. मात्र जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे हे महत्वाचे असते.

हरभजनला समन्स
चंडीगढ: धार्मिक भावना दुखावल्याबद्दल भारताचा क्रिकेटपटू हरभजनसिंग व अभिनेत्री मोना सिंग यांना येथील प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यांनी समन्स बजावले आहे. कलर्स चॅनेलवरील एका कार्यक्रमात हरभजन व मोना यांनी रावण-सीता नृत्य सादर केले होते. या नृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे कारण पुढे करीत स्थानिक वकील अरविंद ठाकूर व विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विजयसिंग यांनी येथील दंडाधिकारी रजनीश यांच्या न्यायालयात अर्ज सादर केला आहे. भारतीय दंड विधान क्र. २९८ व कलम १२० बी या कलमांखाली हरभजन व मोना यांना समन्स बजाविण्यात आले आहे.या कार्यक्रमानंतर हरभजन याने दिलगिरी व्यक्त केली असली तरी न्यायालयात येऊन त्याने क्षमा मागितली पाहिजे असा अर्ज सादर करण्यात आला आहे. मोना हिने मात्र कोणतीही दिलगिरी केली नव्हती. या दोघांनी न्यायालयापुढे दिलगिरी व्यक्त केली तरच आम्ही अर्ज मागे घेऊ असे ठाकूर यांनी सांगितले.

..तर ऑस्ट्रेलियाची मालिकेतून माघार
मेलबर्न, ५ फेब्रुवारी / पीटीआय

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान एप्रिल महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेबाबत पेच निर्माण झाला आहे. या मालिकेत पाकिस्तानने जर राष्ट्रीय संघात आयसीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना स्थान दिले तर ऑस्ट्रेलिया संघ मालिका रद्द करणार असल्याचे वृत्त आहे. आयसीएलची कास धरणाऱ्या पाकिस्तानच्या १९ क्रिकेटपटूंवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून त्यांना स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली. तटस्थ ठिकाणावर होणाऱ्या या मालिकेसाठी आयसीएलमध्ये खेळणाऱ्या मोहम्मद युसूफसारख्या खेळाडूची पाक संघात निवड झाली तर ऑस्ट्रेलिया संघ मालिकेतून माघार घेण्याची शक्यता असल्याचे ‘हेराल्ड सन’च्या वृत्तात म्हटले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आयसीएलला समर्थन करणार नसल्याचे वृत्तात स्पष्ट करण्यात आले. पाकिस्तानचे क्रीडामंत्री पिर अफताब शाह जिलानी यांनी युसूफला पाकिस्तान संघात संधी देण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

टेनिस : भारताचा सलग दुसरा पराभव
पर्थ: भारताच्या फेड चषक टेनिस संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. येथील स्टेट टेनिस सेंटरवर झालेल्या आशिया/ओसियाना विभागातील आय-गटातील लढतीत इंडोनेशियाकडून भारताने ०-३ अशा फरकाने हार पत्करली. आता भारताची अखेरची लढत होईल ती उझबेकिस्तानशी.

पाकिस्तानी खेळाडूंना बोर्डाची बंधने
कराची: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन इजाझ बट्ट यांनी बोर्डाच्या नवीन धोरणानुसार बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांना व राष्ट्रीय खेळाडूंना प्रसारमाध्यमांशी बोलण्यापूर्वी बोर्डाची परवानगी घेणे आवश्यक असल्याचा फतवा काढला आहे. या धोरणानुसार बोर्डाचे कर्मचारी अथवा खेळाडू यांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यापूर्वी बोर्डाचे संचालक वासिम बारी यांची परवानगी घेणे बंधनकारक केले असल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील एका सूत्राने दिली आहे.

इंग्लंड ८ बाद ३११
किंग्स्टन: पीटरसनचे शतक हुकल्यानंतर प्रायर (६४) आणि फ्लिन्टॉफ (४३) यांनी इंग्लंडचा डाव सावरला. त्यामुळे येथील सबिना पार्कवर सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटीत इंग्लंडने दुसऱ्या दिवशी उपाहाराच्या वेळी ८ बाद ३११ धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. साइड बॉटम (२०) आणि हार्मिसन (७) त्या वेळी फलंदाजी करीत होते. विंडीजच्या सुलेमान बेन या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने ७६ धावांत ३ बळी घेतले. टेलर आणि पॉवेल यांनी प्रत्येकी २-२ फलंदाज बाद केले.