Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९

टीएमटीच्या तिजोरीत खडखडाट
ठाणे/प्रतिनिधी :

तिकीट दरवाढ नाही
४१३ नव्या बसेस
ठाणेकर प्रवाशांवर कोणत्याही प्रकारची तिकीट दरवाढ नसलेला व वर्षभरात ४१३ नव्या बसेस ताफ्यात दाखल करण्याचे आश्वासन देणारा ठाणे परिवहन सेवेचा सन २००९-२०१० चा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. सुमारे १३० कोटी रुपयांच्या या अर्थसंकल्पात परिवहनच्या तिजोरीत सध्या खडखडाट असल्याने महापालिकेकडे ४३ कोटी अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.

मागासवर्गीय निधी घोटाळा प्रकरण अखेर बासनात
संजय बापट

ठाणे : ठाणे महापालिकेतील मागासवर्गीय निधी अफरातफर प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांना चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच आयुक्तांनी पुन्हा सेवेत घेतले आहे. हा निधी पळविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी आयुक्तांवर दबाव वाढत होता. परिणामी, आता हे प्रकरणच बासनात गुंडाळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाणे महापालिकेतील २३ कोटी रुपयांच्या मागासवर्गीय निधीचे वाटप वस्त्या व प्रभाग समितीनिहाय करण्यात आले होते. मात्र महापालिकेतील काही पदाधिकारी आणि वजनदार नगरसेवकांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणून परस्पर मागासवर्गीय निधीतून करावयाच्या कामाच्या फायली तयार केल्या.

दामू शिंगडा यांनाही हवा भिवंडी मतदारसंघ!
ठाणे/प्रतिनिधी

चार वेळा लोकसभेवर निवडून गेलेले खासदार दामू शिंगडा यांना मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या पालघर (राखीव)मधून निवडून येणे सहजशक्य नसल्याने ते आता भिंवडीतून निवडणूक लढण्यास उत्सुक असून काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी मात्र त्यास जोरदार विरोध दर्शविला आहे. पूर्वीच्या डहाणू लोकसभा मतदारसंघातून दामू शिंगडा विजयी होत ते प्रामुख्याने भिवंडीतील मतांमुळेच. डहाणू मतदारसंघ आता इतिहासजमा झाला असून नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघात वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व आहे.

काँग्रेसला धूळ चारण्यासाठी शिवसेनेची ३६ तास पाणीकपातीवर ‘समाधी’!
कल्याण/प्रतिनिधी

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत आठवडय़ातून ३६ तास पाण्याची कपात सुरू झाल्यामुळे त्याची झळ शहरातील नागरिकांना बसण्यास सुरुवात झाली आहे. पाणी पुरवठय़ाच्या शेवटच्या भागाला सर्वाधिक पाण्याची झळ बसत आहे. या भागातील रहिवासी पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत. या पाणीकपातीचे शिवसेनेने राजकारण सुरू केले असल्याचे राजकीय वर्तुळातील चर्चेतून समजते. डोंबिवलीतील कुंभारखाणपाडा, चिंचोळ्याचा पाडा, नवापाडा, देवीचा पाडा, महाराष्ट्रनगर, कोपर, गांधीनगर, कल्याणमधील खडेगोळवली परिसर, गंधारे, उंबर्डे परिसर, मोहने परिसरातील शेवटच्या टोकापर्यंत राहत असलेल्या वस्तीला पाणीटंचाईचे चटके बसत आहेत.

जिल्हा बँक निवडणूक राष्ट्रवादी व काँग्रेसने केली प्रतिष्ठेची; शिवसेनेचेही स्वतंत्र पॅनल
ठाणे/प्रतिनिधी

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३० संचालकांसाठी होणारी निवडणूक राष्ट्रवादी व काँग्रेसने प्रतिष्ठेची केली असून या रिंगणात शिवसेना प्रथमच संपूर्ण ताकदीनिशी उतरली आहे. भटक्या विमुक्त जातीच्या एका जागेकडे साऱ्यांचे लक्ष लागले असून त्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, विद्यमान संचालक बाबासाहेब दगडे आणि शिवसेनेचे विजय चौगुले यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

कपातीच्या संकटात भन्नाट भरती
ठाणे/प्रतिनिधी : सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजपर्यंत सेवाप्रवेश नियमच तयार केले नसून उपनिबंधकांचे मनाई आदेश धुडकावून बँकेने १६० जणांची कोणतीही प्रक्रिया न करता थेट नोकरभरती केली आहे. ही भरती आणि खरेदी करण्यात आलेल्या खुच्र्यांमध्ये कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष तथा बँकेच्या संचालकपदाचे उमेदवार सीताराम राणे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला.

हत्येप्रकरणी बाप-लेकासह तिघांना अटक
बदलापूर/वार्ताहर : अंबरनाथ येथे किरकोळ कारणावरून खून झाल्याप्रकरणी बाप-लेकासह अन्य एकास अटक करण्यात आली. कैलासनगर भागात डायमंड टॉवर येथे चंद्रशेखर कुलकर्णी (४४) हा बांधकामावर सुपरवायझरचे काम पाहात होता. त्याची बाळकृष्ण सोनगरे या वॉचमनबरोबर किरकोळ वादावादी झाली. याचा राग येऊन सोनगरे याने मंगळवारी आपला मुलगा राजेश (२६) याला हा प्रकार सांगितला. राजेश सोनगरे आपल्या वडिलांना शिवीगाळ करणाऱ्या चंद्रशेखरचा राग मनात धरून जयंतच्या मदतीने चंद्रशेखरच्या डोक्यात सिमेंट काँक्रीटचा वजनी गोळा फेकून मारला. त्यात चंद्रशेखर जागीच मरण पावला, असे पोलिसांनी सांगितले.मृत चंद्रशेखरचा लहान भाऊ अजय याने तक्रार देताच बाळकृष्ण सोनगरे, राजेश सोनगरे आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले. सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. डी. डांगे अधिक तपास करीत आहेत.

विद्याभारती संस्थेच्या वतीने पालक परिषद
बदलापूर/वार्ताहर

विद्याभारती शैक्षणिक संघटनेच्या वतीने पालक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयामध्ये रविवार, ८ फेब्रुवारी रोजी ९ ते ५ या कालावधीमध्ये होणाऱ्या परिषदेमध्ये बालरोग आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप केळकर, आयोजक राजीव तांबे, पुनरुत्थान न्यासाच्या संस्थापिका इंदुमती काटदरे, विद्याभारतीचे पश्चिम क्षेत्र मंत्री दिलीप बेतकेकर यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेस डोंबिवली ते बदलापूर परिसरातील सुमारे १५०० पालक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा विद्याभारतीचे मंत्री प्रशांत आठल्ये यांनी व्यक्त केली. विविध विषयांवरील व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रांद्वारे समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे, असे आयोजकांनी सांगितले.

शिवसेनेने केलाज्येष्ठ महिलांचा सन्मान
ठाणे/प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चितळसर-मानपाडा विभागातील शिवसेनेचे नगरसेवक रामभाऊ फडतरे यांनी विभागातील ज्येष्ठ महिलांचा जाहीर सन्मान केला. फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी महापौर इंदुलकर, आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच महाराष्ट्रनगर येथे दिवंगत माजी नगरसेवक शरद मिंडे यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी हळदीकुंकू समारंभाचेही आयोजन करण्यात आले होते.

स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण धनेश्वर यांचे निधन
बदलापूर/वार्ताहर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लक्ष्मण धनेश्वर यांचे नुकतेच वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. क्रांतिकारक भगतसिंग तसेच राजगुरू यांच्यासमवेत सशस्त्र दलात शस्त्र चालविण्याचे धनेश्वर यांनी प्रशिक्षण घेतले होते. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सहवासात काही काळ असलेल्या धनेश्वर यांनी गोविंदभाई श्रॉफ यांच्या समवेत मराठवाडा मुक्तिसंग्रामात काम केले होते. याशिवाय त्यांनी प्रजा समाजवादी पक्षातर्फे १९६२ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यांच्या पश्चात मुलगा अरविंद धनेश्वर व अन्य परिवार आहे.