Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९

विविध

बाबरीबद्दल मुस्लिम कल्याणना कधीही माफ करणार नाहीत - बर्क
लखनऊ, ५फेब्रुवारी/पी.टी.आय.

कल्याणसिंह यांच्याशी हातमिळवणी केल्याबद्दल समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांच्यावर जोरदार टीका करतानाच समाजवादी पार्टीचे बंडखोर खासदार शफीक उर रहमान बर्क यांनी बाबरी मशीद पाडण्यात आल्याबद्दल या देशाचे मुस्लिम नागरिक कल्याणसिंह यांना कधीही माफ करणार नाहीत, असे म्हटले आहे. बाबरीच्या गुन्ह्याबद्दल कल्याणसिंह यांना कधीही माफी नाही.

वाघांची शिकार करणाऱ्या टोळ्या सक्रिय; १७ राज्यांना सतर्कतेचा इशारा
नवी दिल्ली, ५ फेब्रुवारी / पी.टी.आय.
गेल्या तीन महिन्यांपासून पट्टेदार वाघांच्या शिकारीचे प्रमाण वाढल्याची अत्यंत गंभीर दखल घेऊन केंद्र सरकारने १७ राज्यांना सतर्कतेचा इशारा जारी केला. वाघांचे वास्तव्य असलेल्या राज्यांनी या राष्ट्रीय प्राण्याची शिकार रोखण्याची पुरेपूर काळजी घेण्याची सूचना यात करण्यात आली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे सदस्य सचिव राजेश गोपाल यांनी पीटीआयला ही माहिती दिली.

देशभरात दहशतवाद्यांसाठी स्वतंत्र तुरुंग बांधण्याबाबत सर्वोच्च न्यायालय अनुकूल
नवी दिल्ली, ५ फेब्रुवारी/पीटीआय

देशभरातील तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी डांबून ठेवलेले असून, तेथील सुरक्षेला बाधा येऊ नये यासाठी सर्व राज्यात दहशतवाद्यांसाठी स्वतंत्र तुरुंग बांधले जावेत या मताला सर्वोच्च न्यायालयानेही अनुकूलता दर्शवली आहे. दहशतवाद्यांना पळून जाण्यासाठी तुरुंगतील कर्मचारीच मदत करतात असा आरोप करण्यात येतो.

‘सत्यम’ला मिळाले नवे ‘सीईओ’
हैदराबाद, ५ फेब्रुवारी/पी.टी.आय.

कोटय़ावधी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर ‘सत्यम कम्प्यूटर्स’वर सरकारने नियुक्त केलेल्या संचालक मंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आज सत्यममधील ए.एस. मूर्ती यांच्या नावाची घोषणा केली. कंपनीला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी ६०० कोटी रुपयांचे कर्ज उभारले जाणार असल्याची माहितीही संचालक मंडळाने दिली. मंडळाच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप आज करण्यात आला.

व्हॅलेंटाइन साजरा करणाऱ्या जोडप्यांचे लग्न लावणार श्रीराम सेना
मंगलोर, ५ फेब्रुवारी/पी.टी.आय.

मंगलोरमधील पबमध्ये मुलींवर हल्ला करणाऱ्या श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’ला विरोध दर्शवत सार्वजनिक ठिकाणी ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करणाऱ्या तरुण-तरुणींचे तिथल्या तिथे लग्न लावून देवू, अशी धमकी दिली आहे.श्रीराम सेनेचे कार्यकर्ते शहरातील हॉटेल्स, कॉलेज आणि वसतीगृह परिसरात तैनात करण्यात येणार असून त्यांच्याकडून ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करणाऱ्यांचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात येणार असल्याचे मुतालिक यांनी सांगितले. साजरा करण्यावर संपूर्ण कर्नाटक राज्यात बंदी घालण्यात यावी अशी मागणी श्रीराम सेनेने केली आहे. हे लग्न लावून देण्यासाठी श्रीराम सेनेने कर्नाटकमध्ये छुपा कॅमेरा असणारी ‘पाच पथके’ तैनात केली असून त्यांच्यासोबत एक भटजी दिला जाणार आहे.

भारताच्या पुराव्यांवर पाककडून अद्याप उत्तर नाही-चिदंबरम
नवी दिल्ली, ५ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी भारताने सोपविलेल्या पुराव्यांवर पाकिस्तानकडून अजून कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचे आज केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याचा कट पाकिस्तानात रचण्यात आल्याचे ठोस पुरावे भारताने यापूर्वीच दिले आहेत.या पुराव्यांविषयी पाकिस्तानने भारताकडे अनेक प्रतिप्रश्न केले असल्याचे विधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायण यांनी केले होते. नारायणन यांचा हा दावा नंतर परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी खोडून काढला. याबाबत कुठलीही संभ्रमाची स्थिती नसून भारताने दिलेल्या पुराव्यांवर पाकिस्तानकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे आपण व प्रणव मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे, असे चिदंबरम यांनी पत्रकारांना सांगितले.

हरीभाऊ राठोड यांचा आज काँग्रेस प्रवेश
नवी दिल्ली, ५ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

माजी खासदार हरीभाऊ राठोड उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. गेल्या वर्षी लोकसभेतील विश्वासमतादरम्यान राठोड यांनी भाजपचा व्हिप झुगारुन मतदानादरम्यान अनुपस्थित राहिल्यामुळे लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राठोड यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. पक्षांतरबंदी कायद्याखाली लोकसभा अध्यक्षांनी राठोड यांना अपात्र ठरविण्यापूर्वीच त्यांची काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी धडपड सुरु होती. अखेर उद्या, सायंकाळी ४ वाजता काँग्रेस मुख्यालयात त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करण्यात येणार आहे.

दिल्लीत अनामी रॉय यांची ज्येष्ठ नोकरशहांशी चर्चा
नवी दिल्ली, ५ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर राज्याचे पोलीस महासंचालक अनामी रॉय यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिव मधुकर गुप्ता आणि अन्य ज्येष्ठ नोकरशहांशी चर्चा केल्याचे समजते. आज निवडणूक आयोग आणि गृह मंत्रालयातील बैठकींसाठी रॉय दिल्लीत होते. पण त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले.आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्या मुद्यावर सर्व राज्यांचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांची निर्वाचन सदन येथे मुख्य निवडणूक आयुक्त गोपालस्वामी व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा सुरु असतानाच अनामी रॉय यांना चार आठवडय़ांच्या आत बदलण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे वृत्त पोहोचले. ही बैठक संपवून निर्वाचन सदनातून पत्रकारांच्या नजरा चुकवून बाहेर पडणारे रॉय दिल्लीतील मालवीय नगरमधील आपल्या निवासस्थानी गेल्याची चर्चा होती. दुपारी गृह मंत्री पी. चिदंबरम यांनी बोलविलेल्या नक्षलग्रस्त राज्यांच्या ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक सुरु असताना ते नॉर्थ ब्लॉकमध्ये पोहोचले. पण त्यांनी या बैठकीत ते सहभागी झाले नसल्याचे समजते. त्यांच्याऐवजी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख डी. शिवानंदन यांनी केल्याचे सांगण्यात आले. रॉय यांनी केंद्रीय गृह सचिवांसह ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ते मागच्या दाराने निघून गेल्याचे समजते.

गयेत दोघा तरुणांची निर्घृण हत्या
गया, ५ फेब्रुवारी / पी. टी. आय.

गोळ्यांनी चाळण झालेले दोघा तरुणांचे मृतदेह आज गया मोफ्युसील पोलीस चौकीच्या हद्दीत आढळून आले. २५ ते ३० वयाच्या या तरुणांच्या निर्घृण हत्येमुळे पोलीस संभ्रमात आहेत. कारण येथे कालच स्फोटकांनी भरलेली एक गाडी पकडण्यात आली होती. यातील एखाची ओळख पटली असून, त्याचे नाव रवी गुप्ता आहे.

श्रीलंकेतील हिंसाचाराविरोधात बर्लिनमध्ये आंदोलन
बर्लिन, ५ फेब्रुवारी/ए.पी.

श्रीलंका लष्कराकडून तामिळ वंशियांच्या होत असलेल्या हत्या रोखण्यासाठी बर्लिनमध्ये ४ हजारांहून अधिक नागरिकांनी आज निदर्शने केली. येथील डाऊनटाऊन भागातील ब्रॅण्डेनबर्ग गेट परिसरात सुमारे ४ हजार नागरिकांनी श्रीलंकेत तामिळांच्या हत्याकांडाला थांबविण्याचे आवाहन केले. ‘वांशिक हत्या थांबवा’, ‘अडचणीत असलेल्या तामिळ नागरिकांना वाचवा’ या आशयाच्या घोषणा करीत श्रीलंकेवर दबाव आणावा, अशा मागण्या निदर्शकांनी केल्या. श्रीलंकेत सध्या तामिळ बंडखोरांसोबत सुरू असलेल्या लष्कराच्या संघर्षांत अडीच लाखांहून अधिक तामिळ नागरिक अडकले आहेत. गेल्या २५ वर्षांंपासून तामिळ बंडखोरांचा स्वतंत्र राष्ट्रासाठी लढा सुरू आहे. या कालावधीत ७० हजारांहून अधिक तामिळ वंशीय नागरिक ठार झाले आहेत.

‘सरकारला धोरणात्मक निर्णयाचे स्वातंत्र्य’
नवी दिल्ली, ५ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

संसदेत लेखानुदान प्रस्ताव मांडताना अर्थव्यवस्थेत प्राण फुंकण्यासाठी धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यास कोणताही घटनात्मक अडथळा नाही, असे आज केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अनुपस्थितीत परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी १६ फेब्रुवारी रोजी लेखानुदान प्रस्ताव मांडणार आहेत. संसदेच्या या अधिवेशनानंतर लगेच लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार असल्यामुळे या लेखानुदानात धोरणात्मक निर्णयांची घोषणा होणार नाही, असे मानले जात होते. मात्र निवडणुकांना सामोरे जाताना लेखानुदानात सरकारला धोरणात्मक निर्णयांची घोषणा करता येणार नाही, असे घटनेत कुठेही नमूद नसल्याचे चिदंबरम यांनी निदर्शनाला आणून दिले. कररचनेत बदल होण्याच्या शक्यतेवरही त्यांनी भाष्य करण्याचे टाळले. चालू वित्तीय वर्षांच्या अखेर आणखी एका बेलआऊट पॅकेजची सरकारतर्फे घोषणा होण्याच्या शक्यतेविषयी त्यांनी उत्कंठा कायम राखली. १६ फेब्रुवारी रोजी काहीही होऊ शकते, असे ते म्हणाले.