Leading International Marathi News Daily
शनिवार ७ फेब्रुवारी २००९
  सुरेल योग
  मुलांचे ताई-दादा
  सॉलिड टीम!
  एवढा पुरुषासारखा पुरुष!
  घर आणि व्यवसायाचा समतोल महत्त्वाचा!
  विज्ञानमयी
  जेंडर बजेटची अर्थपूर्णता
  खेळ, व्यायाम आणि आरोग्य
  चीनचे वृषभ वर्ष
  ‘दा’, मी आणि कबीर
  एलिनला लिहिलेली पत्रं
  वटवृक्षाच्या छायेखाली
  यमुनातीरीचे बुलबुल
  माझंही ‘चेंजिंग’!
  प्रतिसाद
  सिडनी सेतुआरोहण
  गुलाबी मौसम, उबदार प्रावरण

 

‘सारेगमप लिटिल चॅम्पस्’ ही लोकप्रिय स्पर्धा उद्या संपत आहे. या स्पर्धेतील सर्व मुलांनी मराठी मनांत घर केलं आहे. या कार्यक्रमाने प्रेक्षकसंख्येचे उच्चांक गाठले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात अनेकांचे अमूल्य योगदान आहे. ‘टीम सारेगमप’तील अशा काहींची ओळख-
‘लिटिल चॅम्प्स’ना थेट गानप्रभूंना भेटवायला ‘प्रभुकुंज’मध्ये नेणं, पंडित हृदयनाथांनी स्वत:हून या मुलांकडून गाणी बसवून घेणं, शंकर महादेवनने या मुलांवर कौतुकाचा वर्षांव करून त्यांचं मनोबल अस्मानापर्यंत उंचावणं.. कार्यक्रमाची उंची वाढवणारे हे घटक होते. ‘सारेगमप’साठी हे सारं जुळवून आणलं अजया भागवत यांनी. त्यातही अजयाताईंनी या मुलांना लतादीदींची आकस्मिक भेट घडवून आणली तो तर त्यांच्या योगदानाचा कळसाध्याय होता. ‘प्रभुकुंज’त शिरेपर्यंत या मुलांना ते सरप्राईझ होतं. लतादीदींकडे असं अकस्मात धडकण्याचा धक्का त्या मुलांना नि:शब्द करून गेला. मुलांनी लतादीदींकडे ‘ऑटोग्राफ’ मागण्याचा आगाऊपणाही केला नाही. मुलं एकदम भांबावलीच होती; गुणी मुलांसारखी चिडीचूप बसली होती. आणि अजयाताई समाधानाने ही
 

मजा अनुभवत होत्या.
आठवतं, आधीच्या युवक-युवतीच्या पर्वाची बक्षिसं प्रदान करताना लहान वयातच त्या मुलांना एकदम ‘महागायक’ पद बहाल करण्याबद्दल हृदयनाथांनी त्यांच्या वक्तव्यातून नाराजीचा सूर व्यक्त केला होता. आज तेच हृदयनाथ ज्युरी म्हणून आले, तेव्हा लिटिल चॅम्प्सचं तोंड भरून कौतुक करून गेलेच, शिवाय ‘श्रद्धांजली’च्या एपिसोडनंतर मी या मुलांचा वीररसपूर्ण गाण्यांचा भाग बसवून घेतो, असंही त्यांनी पुढाकार घेऊन सांगितलं. हृदयनाथांचं हे मनपरिवर्तन झालं ते जेव्हा सेटवर आले आणि आयोजनातील पारदर्शकता व मुलांची तयारी पाहून भारावून गेले तेव्हा! अजयाताईंनी हृदयनाथांना गळ घातली की, तुम्ही एकदा तरी या मुलांसाठी ज्युरी म्हणून या! अजयाताईंचे आणि हृदयनाथांचं हृदयस्थ नातं आहे. त्यामुळे ते आग्रहाला बळी पडले आणि मग ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या प्रेमात पडले.
अजया भागवत ‘सारेगमप’च्या ‘गेस्ट को-ऑर्डिनेटर’ आहेत. त्यांनी स्वत: कधीही सुरावट छेडलेली नाही, पण त्या संगीताच्या अस्सल दर्दी. गाणं त्यांच्या स्वत:च्या गळ्यात नाही तरी घरात आणि मनात होतंच. अरुण दाते हे अजया भागवत यांचे मामा. रामूभय्या दाते म्हणजे त्यांच्या आईचे वडील. रामूभय्या यांची ही नात अगदी लहानपणापासून संगीताच्या मैफिलींना जाऊ लागली. त्यांची ती सवय आणि आवड आजपर्यंत टिकलीय. त्या राहतात वरळीला. मुंबईतल्या उत्तमोत्तम संगीत मैफिलींना त्या आवर्जून जात असतात. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंतांशी त्यांचा परिचय आहे, जवळीकही आहे. या अनुबंधाचे पुढे व्यवसायसंधीत रूपांतर होऊ शकते, हे अजयाताईंच्या कधी ध्यानीमनीही नव्हते.
१९९५ दरम्यान त्या (अरुण दाते यांचे पुत्र) अमोल यांना म्हणाल्या की, माझ्यासाठी काहीतरी काम बघ ना! आणि योगायोगाने त्यांना ‘झी सारेगम हिंदी’साठी गजेंद्र सिंग यांनी गेस्ट को-ऑर्डिनेटर म्हणून काम देऊ केलं. सात र्वष त्यांनी हिंदी सारेगमपसाठी काम केलं. संगीत क्षेत्रातील दिग्गजांशी असलेले बंध दृढ होत गेले. नवे बंध निर्माण होऊ लागले. पुढे त्यांनी ‘झी म्युझिक’साठीही वर्षभर काम केलं. मग काही काळ त्यांनी वैयक्तिक कारणास्तव ब्रेक घेतला आणि तीन वर्षांपूर्वी पुन्हा तशीच संधी चालून आली. राजन डांगे आणि अजय भाळवणकर यांनी ‘मराठी सारेगमप’साठी विचारणा केली. अजया भागवत पुन्हा ‘सारेगमप’मय झाल्या.
संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी परिचय वा दोस्ती असल्यामुळे त्या कोणालाही बेधडक आमंत्रण देऊ शकतात. आग्रह करू शकतात. गळ घालू शकतात. त्यांना सेटवर परकं वाटू नये आणि मुलांनाही त्यांच्यासोबत अवघडलेपण येऊ नये, हेही अजयाताई जातीने पाहतात.
लतादीदी, उषाताई, हृदयनाथ, हरिप्रसाद चौरसिया या पिढीशी जसं त्यांचं नातं आहे, तसेच हक्काचे संबंध शंकर महादेवनशीही आहेत आणि नव्या पिढीतील श्रेया घोषालशीही. श्रेयाचं हिंदी सारेगमपसाठी ऑडिशनही अजयाताईंनी केलं होतं.
संगीतात मन:पूत रमणाऱ्या अजयाताई या लिटिल चॅम्पस्च्या संगतीतही पुरेपूर रमल्या होत्या. या निरागस मुलांची कोवळी गायकी, त्यांच्या लीला, त्यांचा साधेपणा आणि गाण्याबद्दलची बांधिलकी हे सर्व अजयाताईंनी खूप एन्जॉय केलं. या गुणी मुलांना संगीत क्षेत्रातील दिग्गजांचे आशीर्वाद मिळवून देता आले, याचं समाधान अजयाताईंना आज वाटतंय.
उद्यापासून ही मुलं वरचेवर भेटणार नाहीत, याची हुरहुर त्यांनाही वाटतेय. या मुलांना पुढे जाऊन या ज्युरींपैकी कोणाचं मार्गदर्शन घ्यावंसं वाटलं, तर माझं सहकार्य अर्थातच राहील, हे त्या निरलसपणे सांगतात.
सारेगमपच्या व्यासपीठाने लिटिल चॅम्पस्ना जे मोठं अवकाश मिळालंय त्यात भरारी मारताना अजयाताईंसारख्यांचं पाठबळ त्यांच्या पंखांत आणखी बळ येण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. हेच संचित बरोबर घेऊन ही मुलं उद्या या व्यासपीठावरून पुढे झेपावणार आहेत!
शुभदा चौकर