Leading International Marathi News Daily

शनिवार, ७ फेब्रुवारी २००९

भटक्या कुत्र्यांची समस्या घटकाभर बाजूला ठेवू. तुमच्याकडे कुत्रा आहे का किंवा कधी होता का? तसं असेल तर डेव्हिड फ्रँकेल दिग्दर्शित ‘मार्ली अ‍ॅण्ड मी’ हा चित्रपट तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या टॉमी/ मोती/ टिपू/ पिंटू/ सीझर/ ब्लॅकी/ व्हाइटी/ ब्राउनीबरोबर मनोमन जगायला लावील! ‘मार्ली अ‍ॅण्ड मी’ जॉन ग्रोगन लिखित पुस्तक म्हणजे जॉन ग्रोगनच्या मार्ली या कुत्र्याच्या १३ वर्षांच्या आयुष्याचं, त्याच्या सहवासाचं हृदयस्पर्शी निवेदन आहे. जॉन ग्रोगन या व्यक्तिरेखेच्याच प्रथम पुरुषी निवेदनातून या पुस्तकावरचा याच नावाचा हा चित्रपट सुरू होतो.
‘कुत्रा पाळणाऱ्या’ माणसाला साधारणपणे वाटत असतं, आपण कुत्र्याला फिरायला घेऊन आलोय. प्रत्यक्षात कुत्र्यानं त्यांना अक्षरश: खेचत आपल्याबरोबर फिरायला आणलेलं असतं. ‘मार्ली अ‍ॅण्ड मी’ आणि त्याचा नायक अगदी तसंच प्रेक्षकाला आपल्याबरोबर दोन तास खेचत नेत राहतो. कुत्र्यापासून एरवी दूर राहणाऱ्या प्रेक्षकांनादेखील!
जॉन ग्रोगन आणि जेनिफर ग्रोगन हे नवपरिणीत दाम्पत्य- दोघंही पत्रकार- एक छोटं कुत्र्याचं पिल्लू पाळतात. आपल्या कामाच्या व्यग्रता सांभाळून या लॅब्रॉडोर जातीच्या कुत्र्याचं संगोपन करणं ही आपली कसोटीच आहे, हे त्यांना लवकरच कळून चुकतं, पण त्याच वेळी या अतिव्रात्य पण गोड आणि त्यांच्यावर पहिल्या क्षणापासूनच माया करू लागलेल्या मार्लीत दोघं गुंतत जातात. मार्ली ही जणू जगण्यातली प्राथमिकता ठरते. स्वत:च्या अपत्याची वाट पाहणाऱ्या या दाम्पत्यावर जेव्हा निराशेची वेळ येते, तेव्हा हा अतिव्रात्य मार्ली जेनिफरचं दु:ख समजून घेतो आणि मग एकापोठोपाठ तीन अपत्ये घरात येतात तेव्हा मार्ली आणि पॅट्रिक-कॉनॉर-कॉनेली अशा एकूण ‘चार’ अपत्यांचं संगोपन करताना तारांबळ होते, ताण येतात, मार्लीच्या व्रात्यपणामुळे, त्यानं त्याच्या श्वानस्वभावानुसार ‘माणसां’पुढे वाढून ठेवलेल्या समस्यांमुळे एकाच वेळी ताण आणि तणावमुक्ती असे अनुभव येत असतात. मुलं मार्लीच्या सहवासात वाढतात आणि आपसूकच प्रेम, माया करायला शिकतात; तसंच मार्लीमुळे जेनिफर आणि जॉनही ‘पालक’ म्हणून वाढतात, ‘माणूस’ म्हणून वाढतात.
लहान मुलांकडून अभिनय करून घेताना दिग्दर्शकाची कसोटी लागत असते. चित्रपटाचा नायकच इथे एक लॅब्रॉडोर कुत्रा आहे. त्याची व्यक्तिरेखा व्रात्य, ‘हायपर अ‍ॅक्टिव्ह’ कुत्र्याची आहे! पटकथेतली दृश्यं चित्रित करण्यासाठी ज्या ‘पेशन्स’ची, धीराची गरज होती, त्याची कल्पना प्रेक्षकानं करावी. १३ वर्षांचा काळ, त्यातली वाढती वयं- मार्लीचं तर वाढतंच, जेनिफर व जॉन यांची- याचं भानही जेनिफर अ‍ॅनिस्टन आणि विल्यम ओवेन यांच्या अभिनयातून, देहबोलीतून अतिशय प्रभावीपणे व्यक्त झालं आहे. हा १३ वर्षांचा काळ विविध घटना, स्थित्यंतरं यातून चित्रित करताना कुठे तुटकपण जाणवू नये किंवा ते ‘एपिसोडिक’ वाटू नये, हे या पटकथेचं मोठं वैशिष्टय़ म्हटलं पाहिजे. आणि या केवळ मार्लीच्या रंजक लीला नव्हेत. जगणं, अधिक भावसमृद्ध आणि मूल्यसमृद्ध जगण्याची एक रीत उलगडतानाच मार्ली आणि त्याच्या या मानवी कुटुंबाच्या कथेत भावनिक ताण आणणारे आणि तणावमुक्ती देणारे चढउतारही येतात.
मार्ली अ‍ॅण्ड मी
मूळ पुस्तकाचे लेखक- जॉन ग्रोगन.
पटकथा- स्कॉट फ्रँक, डॉन रूस,
कलावंत- ओवेन विल्यम, जेनिफर अ‍ॅनिस्टन.

विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा
प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ स्टुडंट्स वेल्फेअर अ‍ॅण्ड युनिव्हर्सिटीज् इन्फॉर्मेशन ब्युरो आणि मिती क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने जव्हार येथे आज, ७ फेब्रुवारीला विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी अरविंद नाडकर्णी यांची व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा होईल. दुसऱ्या दिवशी तरुणांना उद्योजकीय सल्ला देणारी कार्यशाळा होणार असून त्याचे उद्घाटन मराठी व्यापारी मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष विजय कामेरकर करतील.
यात पद्मा दिवाणे, श्वेता इनामदार या उद्योजकही मार्गदर्शन करणार आहेत. उद्योगासाठी आवश्यक कौशल्ये कशी जोपासावीत याचे मार्गदर्शन आर्थिक सल्लागार सुनील वालावलकर करतील. जव्हार तसेच बोर्डी, वाडा, मोखाडा, विक्रमगड परिसरातील ९ महाविद्यालयातील विद्यार्थी यात सहभागी होतील.