Leading International Marathi News Daily

शनिवार, ७ फेब्रुवारी २००९

लोकमानस

‘आयडिया सारेगमप लिटल् चॅम्पस्’ या कार्यक्रमाच्या महाअंतिम फेरीच्या आदल्या दिवशी हे खास लोकमानस त्याच विषयावरील पत्रांचे!

संस्कार, मेहनत आणि सत्यता

 

संजय पेठे यांनी लिहिलेला व्हिवा पुरवणीतील लेख (४ फेब्रुवारी) वाचला. त्यांनी व्यक्त केलेले विचार योग्य आहेत. या लहानग्या ‘चॅम्पस्’साठी पाठविण्यात येणारे एसएमएस (२े२) चा अर्थ माहित आहे का? ११ व १२ ऑगस्ट २००८ रोजी या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणून मी होतो तेव्हा त्याचा अर्थ होता ‘संस्कार, मेहनत आणि सत्यता’ (anskar, mehanat, satyatta).
उल्हास बापट
www.santoorulhas.com

अनोखा योगायोग!
मी स्वत: झी सारेगमप कुटंबातील सदस्य असल्याने आणि स्पर्धकांची अंतिम निवडही मीच केल्याने आपल्याच घरातल्यांचे कौतुक कसे करणार अशा प्रामाणिक विचाराने आजपर्यंत जाहीर कौतुक करू शकलो नाही. परंतु माझे श्रद्धास्थान असलेल्या पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्याबरोबरच्या कार्यक्रमात सर्व मुलांची गाणी उत्तम झाली. आजही ही मुलं सुरुवातीला निवड चाचणीच्या वेळी होती तितकीच निरागस आणि जमिनीवर आहेत, याचा अनुभव मी चार-पाच दिवसांपूर्वीच त्यांच्यासाठी जी कार्यशाळा घेतली, त्या वेळी आला. ही माझी कौतुकाची भावना, शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी माझ्या एका नावबंधूने (त्यातही तो माझ्याच गावचा) पत्रातून व्यक्त करावी आणि ते पत्र ‘लोकसत्ता’त छापून यावे, हा अनोखा योगायोगच!
संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी,
कोथरूड, पुणे

सावरकरांविषयी गैरसमज पसरविणारे पत्र
चंद्रकांत केळकर यांचे झी मराठी वाहिनीचा औचित्यभंग’ (४ फेब्रुवारी) हे पत्र वाचकांची दिशाभूल करणारे आहे. ‘भारतीय लोकशाहीवर सावरकरांचा विश्वास नव्हता’ हा जावईशोध कुठला?
भारतीय राजबंदी कोणत्या अवस्थेत तुरुंगात खितपत पडले होते याच्या हकीकती सर्वात प्रथम जगासमोर आल्या त्या स्वत: स्वा. सावरकरांनी लिहिलेल्या ‘माझी जन्मठेप’ या ग्रंथातूनच! चंद्रकांत केळकरांनी ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकातील पृष्ठ २८५ वरील ‘निदान अितरांना तरी सोडा’ या शीर्षकाखाली लिहिलेला मजकूर नीट वाचावा. त्यात असे म्हटले आहे की, ‘मी हेही स्पष्टपणे सांगितले होते की, हे आवेदन धाडण्यात माझा मुख्य उद्देश राजबंदीवान वर्गाची मुक्तता हाच असल्याने, मला स्वत:ला न सोडले तरी मी असंतुष्ट राहणार नाही, उलट मला सोडावे लागेल म्हणूनच क्वचित राजबंदीवानास सर्वसाधारण क्षमा करण्यात येत नसेल तर मला न सोडता, ज्या शेकडो लोकांस सोडणे शक्य आहे त्यांस जरी सरकार सोडील, तरी त्यात मला खरोखर आनंदच होईल.’
शुद्ध मनाने संपूर्ण ‘माझी जन्मठेप’ वाचले तर फारच चांगले. वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रातील जनतेला युद्धज्वर नव्हे तर शौर्य आणि पराक्रम या जगण्यासाठी आत्यंतिक गरजेच्या गुणांची प्रेरणा स्वा. सावरकरांसारख्या अनेक देशभक्त कवींच्या प्रतिभेतून मिळते ही गोष्ट टीका नव्हे तर अभिनंदन करण्याच्या योग्यतेची आहे. एखाद्याबद्दल आपली मते मांडायची असल्यास त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती घेण्याची तसदी घ्यावी, अन्यथा लेखकाचे अज्ञानच जगजाहीर होते!
शीला रानडे
ग्रंथपाल, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई

नाडकर्णी यांच्या पत्राला ताजा कलम
२६ व २७ जानेवारीचा ‘.सारेगमप’ कार्यक्रम बघताना माझ्यासारख्याला वाटलेली अस्वस्थता कमलाकर नाडकर्णीनी शिष्टाचारोचित शब्दरूप केली आहे. तरीही त्यांच्या पत्राला मी ताजा कलम जोडू इच्छितो.
२ फेब्रुवारी रोजी दूरचित्रवाणीवरून प्रसारित झालेल्या, २६-२७ जानेवारी रोजी चित्रीकरण झालेल्या कार्यक्रमावर दृष्टिक्षेप टाकला तर त्या कार्यक्रमाचा उद्देश सावरकरवादाचा प्रसार करणे, हा असावा अशी शंका बळावली.
पल्लवी जोशी, अवधूत गुप्ते, वैशाली सामंत व पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यावर ‘निरागसपणा’चा आरोप करणे म्हणजे त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा उपमर्द होईल. परंतु सारेगमपतील स्पर्धक मुले निखालसपणे निरागस आहेत. म्हणूनच त्यांच्या शिक्षकांनी व पालकांनी अनिष्ट विचार-भावना-संस्कारांना ती मुले बळी पडू नयेत, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्या सर्व मुलांना ‘स्वातंत्र्यवीर’ सावरकर आणि ‘हिंदुराष्ट्रवीर’ सावरकर यांच्यातील फरक समजावून दिला पाहिजे.
या सूचनेचे गांभीर्य लक्षात येण्यासाठी द. न. गोखले यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर : एक रहस्य’ (मौज प्रकाशन, १९८९) या पुस्तकातील पान क्र. ७१ वरील पुढे दिलेला उतारा पुरेसा आहे: ‘सहा सोनेरी पाने हा त्यांचा (सावरकरांचा) शेवटचा ग्रंथ (प्रकाशन, १ला भाग १९५६, दुसरा भाग १९६३; ग्रंथाचे लेखन सात-आठ वर्षे चालू होते; बाळाराव, खंड ४, २४६) त्यांच्या सूडाच्या भावनांची स्पष्ट साक्ष देतो. तेथे त्यांनी अहिंदूंच्या अत्याचारांना उत्तर म्हणून प्रत्याचाराचा उघड पुरस्कार केला आहे. (विशेषत: ‘सदगुणविकृती’ आणि . क्रूरकर्मा टिपू’ ही प्रकरणे)
सु. प्र. देसाई, वाशी, नवी मुंबई

विरोधाभास
‘सारेगमप लिटल् चॅम्पस्’ या रिअ‍ॅलिटी शोच्या प्रजासत्ताक दिनी सादर झालेल्या कार्यक्रमावर आलेली पत्रे फारच कठोर टीका करणारी होती. वाचून सखेदाश्चर्य वाटले. प्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे की हा एक रिअ‍ॅलिटी शो आहे. तसेच हृदयनाथ मंगेशकर हे या कार्यक्रमाला मान्यवर परीक्षक आले होते. अल्प वेळेत हा कार्यक्रम बसवायचा असल्याने हृदयनाथ यांनी ‘शिवकल्याण राजा’ आणि ‘ने मजसी ने’ ही गाणी बसवली, एवढे ध्यानात घेऊन हेत्वारोप करणे टाळले असते तर बरे झाले असते.
‘शिवकल्याण राजा’मधील गाणी म्हणताना मुलांना धाप लागत होती असे चांदवणकर म्हणतात. (मला तसे दिसले नाही) तर कमलाकर नाडकर्णी जेव्हा शाहीर उमप यांनी पहाडी आवाजात गायिलेली बाबासाहेब आंबेडकरांवरची गाणी का घेतली नाहीत असे विचारतात, तेव्हा तो विरोधाभास नव्हे काय? महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर ही उत्तुंग व्यक्तिमत्त्वे होती हे निर्विवाद. एखाद्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये त्यांच्यावर गाणी म्हटली नाहीत म्हणून त्यांच्या कार्याची महती कमी होत नाही, हे लक्षात घ्यावे. याउलट उठताबसता फुले, आंबेडकर व महात्मा गांधींचे नाव घेणारे आमचे शासनकर्ते, प्रत्यक्षात दाऊद इब्राहीमचे बेकायदा सारा-सहारा उभे करू देते यावर या पत्रलेखकांनी आसूड ओढावेत ही अपेक्षा!
‘या कार्यक्रमाच्या आयोजकांनी नाव सावरकरांचे घेतले तरी उच्चार नथुराम गोडसें’चा होता ही टीका अन्यायकारक आहे. आयोजक सावरकरांची गाणी निवडताना पूर्वग्रहदूषित होते असे म्हणणारे वा सूचित करणारे सूत्रसंचालिका पल्लवी जोशी व परीक्षक वैशाली सामंत यांच्या वेषभूषेवरही टीका करतात. असा उल्लेख करणं हे पूर्वग्रहदूषित नाही काय? प्रामाणिकपणे कलागुण सादर करणाऱ्या कलाकारांना एका विशिष्ट विचारसरणीशी जोडण्याचा अट्टहास कशासाठी?
आयोजक या बालकलाकारांची पिळवणूक करतात, असे म्हणणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की याच आयोजकांनी या छोटय़ांची लतादीदी, आशा भोसले, नाना पाटेकर, निळू फुले या दिग्गजांशी भेट घडवून आणली. या दिग्गजांनी सांगितलेल्या ‘गोष्टी युक्तीच्या चार’ त्यांना भावी आयुष्यात शिदोरी म्हणून उपयोगी पडणार आहे.
अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत परीक्षक म्हणून या कलाकारांना योग्य मार्गदर्शन करताना आपली कामगिरी चोख बजावत आहेत, पण रिअ‍ॅलिटी शोचे खरे यशापयश हे सूत्रसंचालकावर अवलंबून असते आणि स्वत: उत्तम कलाकार असलेल्या पल्लवी जोशी यांची कामगिरी केवळ अप्रतिम! पल्लवी जोशी यांचे स्टेजवरील वावरणे व संवादफेक दाद देण्यासारखे. परीक्षक व मान्यवर परीक्षकांकडून कलाकारांना व त्यांच्या पालकांना मौलिक टिप्स द्यायला सांगताना पल्लवी कल्पकता दाखवतात व गाणे सुरू करण्याआधी बाल कलाकारांच्या मनावरील दडपण कमी होण्यास मदत करतात. निमंत्रित मान्यवर परीक्षकांशी त्या नम्रपणे सुसंगत संवाद साधतात. छोटय़ा कलाकारांबद्दल काय बोलायचे? दैवी देणगी घेऊन आलेले हे बालगंधर्वच आहेत.
या सर्वामुळेच मान्यवर परीक्षक म्हणून आले असताना शंकर महादेवन म्हणाले होते की, ‘एवढा उत्तम रिअ‍ॅलिटी शो केवळ मराठीतच नव्हे तर हिंदीतही नाही.’ कौतुकाची ही थाप मराठी मनाला सुखावून जाते.
दिलीप नाबर, बोरिवली, मुंबई

पंचमहाभूतांच्या तपश्चर्येला न्याय द्या
‘लिटल् चॅम्प्स्’च्या खुमासदार, लज्जतदार कार्यक्रमांनी इतिहास घडविला आहे. लोकाग्रहास्तव ‘झी मराठी’च्या कार्यकारी समितीने एकाही स्पर्धकाला बाहेर न घालविण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला, त्यांना आमचा सलाम!
अशा या झी मराठीच्या समितीला आणखी एक कळकळीची विनंती करावीशी वाटते की, या पंचरत्नांना अंतिम फेरीत ‘विजयी’ घोषित करावे. कारण झी मराठीचा टेक्निशियन हा एक देह आहे, वाद्यवृंद चमू हे डोके आहे, अवधूत गुप्ते व वैशाली सामंत त्यांचे डोळे आहेत, श्रोते व सर्व परीक्षक त्यांचे कान आहेत, पल्लवी जोशी ही ओघवत्या वाणीचे मुख आहे आणि ही पाच मुले हाताची बोटे आहेत- प्रथमेश लघाटे अंगठा, रोहित राऊत दुसरे बोट, आर्या आंबेकर मधले बोट, कीर्ती गायकवाड अनामिका व मुग्धा वैशंपायन करंगळी!
या पाच जणांना झी मराठीपासून कोणीही वेगळे करूच शकत नाही. प्रत्येकाचा गाण्याचा बाज वेगळा आहे आणि म्हणूनच जे काही बक्षीस आहे ते पाचही जणांत सारखे वाटून आगळावेगळा इतिहास घडवावा. झी मराठीचे हे चौथे पर्व! झी मराठीच काय, पण सर्व चॅनल्सवर आजतागायत इतका सुंदर कार्यक्रम झाला नाही आणि यापुढे होणार नाही. या पर्वाबरोबर अन्य कार्यक्रम स्पर्धा करूच शकत नाही.
श्रद्धा चाफेकर, दादर, मुंबई
‘आयडिया सारेगमप लिटल् चॅम्पस्’ या कार्यक्रमासंबंधातला तसेच शुरा मी वंदिले या कार्यक्रमावरील पत्रव्यवहार येथेच थांबवित आहोत.
-संपादक