Leading International Marathi News Daily

शनिवार, ७ फेब्रुवारी २००९

जमावबंदी झुगारून टोपवासीयांचा कचरा डेपोविरोधात धडक मोर्चा
पोलीस व पालिका प्रशासनावर शिवराळ भाषेत टीका
कोल्हापूर, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी
पोलीस प्रशासनाची ठोकशाही येथून पुढे सहन केली जाणार नाही, तसेच कोल्हापूर महापालिकेचा कचऱ्याचा एक ट्रकही प्रकल्पाकडे फिरकू देणार नाही, असा इशारा टोप आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या धडक मोर्चाने आज जिल्हा प्रशासनाला देण्यात आला. जमावबंदी आदेश पायदळी तुडवून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अडवल्यानंतर तेथेच झालेल्या सभेत काही वक्त्यांनी पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांना उद्देशून शिवराळ आणि चिथावणीखोर भाषा वापरली.

राजारामबापू वस्त्रोद्योग उतरणार खुल्या गारमेंट बाजारात
जॉन अब्राहमच्या हस्ते १६ रोजी उद्घाटन
सांगली, ६ फेब्रुवारी / गणेश जोशी
संरक्षित क्षेत्रातच सहकारी उद्योग भरारी घेतो, असा सार्वत्रिक समज असतानाच राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाने गारमेंटसारख्या स्पर्धात्मक बाजारात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक दर्जाची पुरूषांची अंतर्वस्त्रे ‘जयंत’ या ब्रँडखाली अभिनेता जॉन अब्राहम याच्या हस्ते दि. १६ फेब्रुवारी रोजी बाजारात आणण्याचा सहकार क्षेत्रातील देशातील पहिलाच उपक्रम ठरणार आहे. सध्या सहकारी चळवळ केवळ साखर, दूध, सूत व अर्थ या क्षेत्रापुरतेच मर्यादित ठरली आहे. सरकारी मदतीची कवचकुंडले ज्या उद्योगांना आहेत, तेथेच सहकारी उद्योग बहरला जातो.

एकच मालमत्ता दोन संस्थांना तारण; फौजदारी दाखल होणार
कोल्हापूर जिल्हा बँकेचे आणखी एक प्रकरण
कोल्हापूर, ६ फेब्रुवारी / राजेंद्र जोशी
एकच मालमत्ता तारण ठेवून विविध वित्तीय संस्थांकडून कर्जे घेतल्याचे शेतीमाल प्रक्रिया संस्थेचे प्रकरण गाजत असतानाच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत अंबाई शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्थेचे दुसरे एक प्रकरण प्रकाशात आले आहे. विशेषत: या प्रकरणात संस्थेने जिल्हा बँकेकडे तारण असलेली मालमत्ता राज्य शासनाकडे तारण ठेवून दुहेरी कर्जाची उचल केली असून या फसवणुकीबद्दल संस्थेच्या सर्व संचालकांविरूध्द फौजदारी खटला दाखल करण्याच्या तयारीने जिल्हा मध्यवर्ती बँकेत वेग घेतला आहे.

काँग्रेस नगरसेवकाच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर
कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया बोगस प्रमाणपत्र
सांगली, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी
पत्नीच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक साजिद पठाण यांच्या पत्नी सबिना यांना येथील जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. तिसरे अपत्य झाल्याने पती साजिद पठाण यांचे नगरसेवकपद धोक्यात येऊ नये, यासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे बोगस प्रमाणपत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते.

पंढरपुरात माघी यात्रेला तीन लाख भाविक
पंढरपूर, ६ फेब्रुवारी/वार्ताहर

सोलापूर जिल्ह्य़ासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे तीन लाख भाविकांच्या उपस्थितीत माघी एकादशीचा भक्तीमय सोहळा संपन्न झाला. मधुर घुमणारे टाळ- मृदंगाचे स्वर, डौलाने फडकणारी भागवत धर्माची पताका यामुळे सारे वातावरण भक्तीमय झाले होते.पहाटेपासूनच एकादशीची पर्वणी साधून वारकऱ्यांनी चंद्रभागा नदीवर स्नासाठी गर्दी केली होती, तर प्रत्येक फडावर भजन, कीर्तनाचे कार्यक्रम चालू होते. पहाटेपासूनच प्रत्येक मठातून नगर प्रदक्षिणेसाठी दिंडय़ांचा ओघ चालू होता.श्रीविठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी दर्शनाची रांग मंदिरापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर गोपाळपूरजवळ गेली होती, तर मुखदर्शनाची रांग संत तुकारामभवनपासून दोन कि.मी. अंतरावर होती. ज्ञानेश्वरदर्शन मंडपातील दर्शन रांगेत उभ्या असलेल्या वारकरी भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय समितीने केली होती. मंदिरातील व्यवस्थेबाबत कार्यकारी अधिकारी संजीव पलांडे, व्यवस्थापक अतुल म्हेत्रे, पी. एन. पवार, सुभेदार, माऊली बडवे हे दक्ष होते.मंदिर व परिसरात जास्त वेळ गर्दी होणार नाही याची दक्षता पोलीस दलाचे कर्मचारी व अधिकारी घेत होते. मंदिर परिसरातील भ्रमणध्वनीच्या कॅमेऱ्यातून फोटो घेणाऱ्या भाविकांना पोलिसांनी दंड केला.माघी यात्रेनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जनावरांचा बाजार भरला असून, सर्व प्रकारची सुमारे एक हजार जनावरे विक्रीस आली आहेत. या निमित्ताने या आवारात कृषी प्रदर्शनही भरविण्यात आले आहे.

दारूच्या रसायनात पडून बालकाचा मृत्यू
कोल्हापूर, ६ फेब्रुवारी / प्रतिनिधी
गावठी दारूसाठी तयार करण्यात आलेल्या रसायनाच्या टाकीमध्ये पडून मंथन दिपक अपंगे हा अडीच वर्षे वयाचा मुलगा मरण पावला. एस.एस.सी.बोर्डाच्या समोरच असलेल्या मोतीनगर परिसरात आज दुपारी घडलेला प्रकार सायंकाळी उघडकीस आला. मंथन अपंगेच्या घराच्या समोरच जमिनीमध्ये दोन फूट बाय चार फूट या आकाराच्या टाकीत हे रसायन होते.

पतसंस्था फेडरेशनचा सोमवारी सांगलीत मोर्चा
सांगली, ६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नागरी सहकारी पतसंस्थांच्या रिझव्‍‌र्ह फंडाची रक्कम परत मिळावी, या मागणीसाठी नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने सोमवार दि. ९ फेब्रुवारी रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष बी. यू. मुलाणी व व्यवस्थापक अरूण गडचे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.सांगली जिल्ह्य़ातील बहुतांश पतसंस्थांची आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे. ठेवीदारांचा अशा पतसंस्थांमागे सतत तगादा लागला असून राज्य शासनही पतसंस्थांना मदतीचा हात देत नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेत सर्व पतसंस्थांची कोटय़वधी रूपयांची रक्कम जमा असतानाही ती बँकेकडून परत केली जात नाही. त्यासाठीच या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पतसंस्थांच्या मागणीनुसार पाच टक्के व्याजदराने कर्जपुरवठा व्हावा व नागरी सहकारी पतसंस्थांच्या इतर बँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने पुढाकार घ्यावा आदी मागण्याही करण्यात येणार आहेत.या आंदोलनाचे नेतृत्व आमदार विलासराव शिंदे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, डी. के. पाटील, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, महासचिव गिरीश तुळपुळे, मिरज तालुका फेडरेशनचे अध्यक्ष नगरसेवक हणमंत पवार व वाळवा तालुका अध्यक्ष शहाजी पाटील आदी करणार असल्याचेही मुलाणी व गडचे यांनी सांगितले.

‘स्थापत्य-२००९’ प्रदर्शनासाठी सोलापूरकरांचा अपूर्व उत्साह
सोलापूर, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स, सोलापूर या संस्थेच्यावतीने स्थापत्य-२००९ प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा अपूर्व उत्साहात पार पडला असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी सोलापूरकरांनी एकच गर्दी केली आहे. भाग्यलक्ष्मी स्टीलचे कार्यकारी संचालक प्रवीण गोयल यांच्या हस्ते आणि सोलापूर पालिकेचे आयुक्त रणजितसिंह देओल व नगर अभियंता सुभाष सावस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत नॉर्थकोट मैदान येथे स्थापत्य-२००९ या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सिव्हिल इंजिनिअर्स संस्थेचे अध्यक्ष किरण कदम, उपाध्यक्ष वैभव ढोनसळे, सचिव प्रभाकर चिप्पा, खजिनदार प्रकाश तोरवी, मोहन चवडेकर, इफ्तेकार नदाफ आदी पदाधिकारी उपस्थित होते. कदम यांनी प्रास्ताविक व स्वागत करून स्थापत्य प्रदर्शन भरविण्यामागचा हेतू विशद केला. बांधकाम क्षेत्रातील नवीन माहिती ग्राहकांना मिळण्यासाठी अशा प्रदर्शनाची आवश्यकता असल्याचे पालिका आयुक्त देओल यांनी सांगितले. सोलापुरात पोलादाचे काम स्थापत्याच्या माध्यमातून सुरू झाल्याबद्दल गोयल यांनी समाधान व्यक्त केले. नगर अभियंता सावस्कर यांनी सोलापूर शहर आता प्रगतीच्या दिशेने झेप घेत असून नागरिकांना त्याची जाणीव होण्याकरिता विविध माध्यमांतून माहिती मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास अतुल जोशी, अभय भन्साळी, अजय पाटील, ओमप्रकाश दरक, गोकुळ चितारी, सुनील फुर्डे, एन.जी. म्हेत्रस आदी उपस्थित होते.

पाच नाटकांच्या खर्चात दहा नाटके पाहण्याची संधी
सांगली, ६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

सांगलीकर नाटय़ व संगीत रसिकांसाठी येथील चैतन्य रसिक कला मंचने पाच नाटकांच्या खर्चात दहा नाटकांचा कार्यक्रम पाहण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेचा अधिकाधिक सांगलीकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कला मंचचे अध्यक्ष निशांत घाटगे यांनी केले आहे.गेल्या आठ वर्षांपासून चैतन्य रसिक कला मंचच्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे. गतवर्षी या योजनेचा सुमारे ५०० हून अधिक रसिक सभासदांनी लाभ घेतला. ही योजना केवळ सांगली महापालिका क्षेत्रातील रसिकांसाठी मर्यादित आहे. त्यात ‘अ’ वर्ग सभासदांसाठी १८०० रुपये, ‘ब’ वर्ग सभासदांसाठी १३०० रुपये, तर ‘क’ वर्ग सभासदांसाठी ८०० रुपये शुल्क असून या तिकिटांवर प्रत्येकी दोन व्यक्तींना पास दिले जाणार आहेत. या शुल्कात रसिकांना दहा कार्यक्रम पाहण्याची संधी मिळणार आहे. या योजनेंतर्गत दि. १४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता ‘फायनल ड्राफ्ट’ हे नाटक दाखविण्यात येणार आहे. त्यात मुक्ता बर्वे व गिरीश जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच दि. १५ फेब्रुवारी रोजी हाच कार्यक्रम मिरज येथील रसिकांसाठी दाखविण्यात येणार आहे. या योजनेद्वारे वर्षभर विविध कार्यक्रमांचा आनंद रसिकांना लुटता येणार आहे. तरी या योजनेचा नाटय़रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चैतन्य रसिक कला मंचचे अध्यक्ष घाटगे व संचालक कुलकर्णी यांनी केले आहे.

‘परोपकारी भावनेने जगल्यास जगण्यात शांतता लाभते’
माळशिरस ६ फेब्रुवारी/वार्ताहर

जीवन हे क्षणभंगुर असून पाण्यावरील बुडबुडय़ाप्रमाणे त्याची हमी नाही. मात्र, परोपकारी जीवन जगण्याने त्या जगण्यासही शांतता लाभते. असे मत स्वामी महेशानंद यांनी व्यक्त केले.
अकलूज येथील विजय चौकात ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान त्यांचे प्रवचनाचे आयोजन स्व. शंकरराव मोहिते पाटील पुण्यतिथी समारंभ समितीच्या वतीने केले असून त्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समितीचे अध्यक्ष आ. प्रतापसिंह मोहिते पाटील, श्री शंकर सह साखर कारखान्याचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, जनसेवा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महादेव गायकवाड, सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, माजी पं. स. सभापती रावसाहेब पराडे पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी श्री शंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली. पुण्यतिथी समारंभ समितीच्या वतीने दरवर्षी बडय़ा राजकीय नेत्यांच्या मुख्य उपस्थितीत शेतकरी मेळावा होत असून व त्या माध्यमातून राजकीय नेत्यांकडून शेतकऱ्यांच्या पदरात काही तरी पाडून घेतले जायचे. परंतु सध्याच्या अराजक परिस्थितीसाठी धार्मिक भावना वाढीस लागण्याचे दृष्टीने गेल्या वर्षीपासून या सत्संग सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. मात्र त्यास प्रचंड प्रतिसाद मिळून अध्यात्मिक भावना वाढीस लावताना दिसत आहेत. त्यामुळेच रोजच्या वाढत्या गर्दीस विजय चौकासारख्या चौकातील जागाही कमी पडत असल्याचे दिसत आहे.

अधिवेशनाच्या नावाखाली शिक्षक संघाच्या नेत्यांकडून दिशाभूल
आटपाडी, ६ फेब्रुवारी/वार्ताहर

लाखो रुपये मिळविण्याच्या उद्देशाने शिक्षक संघाचे राज्यव्यापी अधिवेशन घेत असल्याचे दाखवून व दिशाभूल करून शिक्षक संघाच्या नेत्यांनी लाखो रुपये गोळा केल्याची टीका शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस जगन्नाथ कोळपे यांनी केली.समितीच्या कार्यकर्त्यांसमोर आटपाडी येथे बोलताना कोळपे म्हणाले की, प्राथमिक शिक्षक समितीचे अधिवेशन दि. २४ फेब्रुवारी ते दि. ३ मार्च दरम्यान शिर्डी येथे होणार असल्याचे समितीच्या नेत्यांनी जाहीर केले. त्यामुळे या अधिवेशनाला शिक्षक जाणार हे गृहीत धरून शिक्षक संघाच्या नेत्यांनी राज्य शासनाने कोणतीही रजा मंजूर केली नाही. तरीसुद्धा प्रतिशिक्षक शंभर रुपयाप्रमाणे वर्गणी जमा करून लाखो रुपये उकळण्यात आले आहेत.या वेळी शिक्षक समितीच्या शिर्डी अधिवेशनात सहावा वेतन आयोग लागू होणार आहे. त्यासंदर्भातील त्रुटी, शिक्षणसेवक योजना रद्द करून कायमस्वरूपी शिक्षक नेमणुका व वस्तिशाळा शिक्षकांना शिक्षक म्हणून सामावून घेणे व अन्य प्रश्नांबाबत चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या अधिवेशनास राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, शिक्षणमंत्री डॉ. पतंगराव कदम, गृहमंत्री जयंत पाटील व अर्थमंत्री दिलीप वळसे-पाटील आदी उपस्थित राहणार असून, सांगली जिल्ह्य़ातील सर्व शिक्षकांनी या अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहनही कोळपे यांनी केले आहे.