Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

जमावबंदी झुगारून टोपवासीयांचा कचरा डेपोविरोधात धडक मोर्चा
पोलीस व पालिका प्रशासनावर शिवराळ भाषेत टीका
कोल्हापूर, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

पोलीस प्रशासनाची ठोकशाही येथून पुढे सहन केली जाणार नाही, तसेच कोल्हापूर महापालिकेचा कचऱ्याचा एक ट्रकही प्रकल्पाकडे फिरकू देणार नाही, असा इशारा टोप आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या धडक मोर्चाने आज जिल्हा प्रशासनाला देण्यात आला. जमावबंदी आदेश पायदळी तुडवून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अडवल्यानंतर तेथेच झालेल्या सभेत काही वक्त्यांनी पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांना उद्देशून शिवराळ आणि चिथावणीखोर भाषा वापरली.
टोप गावच्या हद्दीत विघटित न होणाऱ्या कचऱ्याच्या डेपोला ग्रामस्थांचा कडवा विरोध आहे. या विरोधातूनच के.एम.टी.च्या दोन प्रवासी बसगाडय़ा काहीजणांनी अडवून या मार्गावरील बससेवा बंद पाडली होती. चारच दिवसांपूर्वी अशा प्रकारे गाडय़ा अडविणाऱ्या श्रीपती पाटील, बाबासाहेब पाटील, प्रकाश पाटील, बाळासाहेब पोवार या ग्रामपंचायत सदस्यांना अटक करण्यात आली होती. या चौघांनाही पोलीस अधीक्षक चंद्रकांत कुंभार आणि पोलीस उपअधीक्षक भरत तांगडे या दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ, तसेच या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी आज टोप आणि आसपासच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता. या धडक मोर्चाला जोडूनच वडगावचे आमदार राजीव आवळे यांनी लाक्षणिक उपोषण केले होते.
टोप, शिये, संभापूर, शिरोली या गावचे ग्रामस्थ मोठय़ा संख्येने वाहनांमधून ताराराणी चौकात आज एकत्र आले. तेथून या धडक मोर्चाची सुरुवात झाली. या मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या धिक्काराच्या घोषणा देत हा मोर्चा शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यापूर्वी ग्रामस्थांची निषेध सभा झाली. इथे लोकशाही आहे की ठोकशाही आहे? पोलीस अधिकाऱ्यांनी चौघांना कोणाच्या आदेशावरून मारहाण केली? कचरा डेपोसाठी टोप गावची खाणच कशासाठी पाहिजे? रंकाळा तलाव बुजवा आणि तिथे कचरा डेपो करा, टोप गावामध्ये कचरा आणाल तर रक्ताचे पाट वाहतील, अशा शब्दांत काही वक्त्यांनी जिल्हा प्रशासनाला इशारा दिला.
या वेळी बोलताना आमदार राजीव आवळे यांनी टोप ग्रामस्थांचा सहनशीलतेचा अंत बघण्याचा प्रयत्न करू नका. कचरा डेपोविरुद्धच्या आमच्या प्रक्षुब्ध भावना मोडून काढण्याचा प्रयत्न म्हणजे आमच्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी केलेली मारहाण आहे. सामान्य नागरिकांचे रक्षण करण्याऐवजी त्यांना मारहाण होते. ही लोकशाही आहे की नोकरशाही आहे, असा सवाल उपस्थित केला.
राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जयवंतराव आवळे यांनी या वेळी बोलताना कोल्हापूरची घाण टोप गावाच्या हद्दीत टाकू दिली जाणार नाही. लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्यांना मारहाण होते हा अन्याय आहे. मी यासंदर्भात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भेटून वस्तुस्थिती स्पष्ट करणार आहे, असे सांगितले. या वेळी हातकणंगले पंचायत समितीच्या उपसभापती सुचित्रा खवरे, महेश चव्हाण, शिवाजी पोवार, विठ्ठल पाटील, हणमंत पाटील, अवघडी गांजणे, आनंद पाटील आदींची भाषणे झाली. पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, बापू पोवार, श्रीपती पाटील यांना पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात आणून त्यांना अर्वाच्च शिविगाळ करत मारहाण करणाऱ्या पोलीस अधीक्षक चंद्रकांत कुंभार यांची सीआयडीमार्फत उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना व पोलीस उपअधीक्षक भारत तांगडे यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ जमावबंदी आदेशाचा भंग करून काढण्यात आलेल्या या धडक मोर्चावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चा काढणाऱ्यांविरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाण्यात जमावबंदी आदेशाचा भंग केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.