Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

राजारामबापू वस्त्रोद्योग उतरणार खुल्या गारमेंट बाजारात
जॉन अब्राहमच्या हस्ते १६ रोजी उद्घाटन
सांगली, ६ फेब्रुवारी / गणेश जोशी

 

संरक्षित क्षेत्रातच सहकारी उद्योग भरारी घेतो, असा सार्वत्रिक समज असतानाच राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाने गारमेंटसारख्या स्पर्धात्मक बाजारात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक दर्जाची पुरूषांची अंतर्वस्त्रे ‘जयंत’ या ब्रँडखाली अभिनेता जॉन अब्राहम याच्या हस्ते दि. १६ फेब्रुवारी रोजी बाजारात आणण्याचा सहकार क्षेत्रातील देशातील पहिलाच उपक्रम ठरणार आहे.
सध्या सहकारी चळवळ केवळ साखर, दूध, सूत व अर्थ या क्षेत्रापुरतेच मर्यादित ठरली आहे. सरकारी मदतीची कवचकुंडले ज्या उद्योगांना आहेत, तेथेच सहकारी उद्योग बहरला जातो. स्पर्धात्मक बाजारात सहकार टिकत नाही, असे बोलले जात असतानाच गृहमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे माजी अध्यक्ष व राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी मात्र धाडसी निर्णय घेत सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळावी व ग्राहकांना उच्च दर्जाची अंतर्वस्त्रे पुरवून या उद्योगाला नफ्याचे नवे गणितच उमजवून दाखविण्यासाठी बाजारात उतरण्याची हिंमत दाखवली आहे.
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या सहवासात सहकार उद्योगाचा श्री गणेशा करणाऱ्या दिलीप पाटील यांनी इस्लामपूर येथील जवळपास बंद पडलेली सूतगिरणी मोठय़ा हिमतीने व्यवसायाची जोड देत सुरू करून दाखवली. मूल्यवर्धित प्रकल्पाची जोड सहकारी उद्योगाला दिल्यास त्याचा लाभ हा निश्चित मिळतो, हे लक्षात घेऊन या सूतगिरणीची २० हजार चात्यांपर्यंत क्षमता वाढवून घेतली. सूत व्यवसाय हा कमी नफ्याचा म्हणून ओळखला जातो. केवळ सूत निर्माण करूनच तुटपुंज्या नफ्यावर हा उद्योग वाढविता येणार नाही, हे ब्रीदवाक्य सामोरे ठेवून या उद्योगातूनच विविध उत्पादने निर्माण केली जावीत, असा ध्यास घेतला. उत्पादनाचा दर्जा अच्युत्तम ठेवणे व मिळालेल्या कामाची वेळेत पूर्तता करणे, या बळावरच त्यांनी इटली व हाँगकाँगसह युरोपमधील अनेक नामवंत कंपन्यांना पुरूषांची अंतर्वस्त्रे पुरविण्याची जबाबदारी पार पाडली.
आपण तयार केलेल्या उत्पादनाची मागणी परदेशात वाढती आहे. लुईफिलीप, कॉटन कौंटी, रिलायन्स, हाँगकाँगची फोर्डस, इटलीची सोमेट, रोपीअर लूम्स, जर्मनीच्या मायर अँड सी व टेरॉट यांसारख्या जागतिक दर्जाच्या अनेक नामवंत कंपन्या सातत्याने आपल्याकडून उत्पादनाची आयात करतात. अगदी सुतापासून ते उत्पादित वस्तूच्या पॅकिंगपर्यंतची जबाबदारी राजारामबापू वस्त्रोद्योग पार पाडतो, यामुळे मागासवर्गीय समाजातील ४०० महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. आता हीच जागतिक दर्जाची उत्पादने स्वतच्या ‘जयंत’ ब्रँडने भारतीय बाजारपेठेत आणल्यास वस्त्रोद्योग समूहाला त्याचा अधिक फायदा निश्चितच मिळणार आहे. त्यासाठी स्पर्धात्मक बाजारात उतरण्याची हिंमत आपण दाखवली पाहिजे, या ध्येयानेच दिलीप पाटील यांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे व येत्या दि. १६ फेब्रुवारी रोजी म्हणजेच गृहमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवशी ‘जॉयस’ या नावाने चित्रपट अभिनेता जॉन अब्राहम याच्या हस्ते सहकाराला स्पर्धात्मक बाजारात उतरण्याची तयारीही केली आहे.
सूत निर्माण करण्यापासून ते थेट कापड निर्मितीपर्यंतचे सर्व मूल्यवर्धित प्रकल्प एकाच छताखाली उभारल्याने या प्रकल्पाला अतिरिक्त नफा मिळू शकतो. निव्वळ सूत उत्पादनावर न थांबता त्यावर प्रक्रिया करून नवनवीन उत्पादने निर्माण करून ती थेट बाजारात आणल्यास नफा, तर निश्चितच मिळतो. पण स्वतचा ब्रँडनेमही तयार होतो. आपल्या उत्पादनाची सध्या वार्षिक ३० ते ३५ कोटी रूपयांची बाजारपेठ असल्याचे विषद करून दिलीप पाटील यांनी पुरूषांची अंडरवेअर व बनियन ही कूलफिलींगची अंतर्वस्त्रे बाजारात निश्चितच लोकप्रिय होतील, असा दावाही केला आहे. रिलायन्स कंपनीला एक लाख टी- शर्ट पुरविण्याची तसेच मुंबई महापालिकेच्या विविध शाळांतील ११ लाख विद्यार्थ्यांना युनिफॉर्म पुरविण्याची जबाबदारी राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाने यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यामुळे भविष्यात बाजारातील मागणीही पूर्ण करण्यात आपणाला कोणतीही अडचण येणार नाही.
भारतीय गारमेंट बाजारात सुमारे २५० ते २६० टक्के नफा मिळू शकतो. आपली उत्पादने थेट बाजारपेठेत उतरविल्यानंतर ग्राहकांचाही अधिक फायदा व्हावा व जागतिक दर्जाची उत्पादने त्यांच्यापर्यंत पोहोचावीत, यासाठी आपण व्यावसायिकदृष्टय़ा बाजारात उतरणार आहे. या उत्पादनाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी जाहिरातीचे नवे तंत्रही आत्मसात केले जाणार आहे. प्रथम पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठेत ही उत्पादने लोकप्रिय ठरल्यानंतर ती मुंबई, दिल्ली व इतर महानगरातील बाजारपेठेत उतरवली जाणार आहेत. सहकार क्षेत्राने आता केवळ उत्पादन करून चालणार नाही, तर मार्केटिंग क्षेत्रातही उडी घ्यावी, तरच या क्षेत्राला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होणार आहे, असा विश्वासही दिलीप पाटील यांनी व्यक्त केला.