Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

माढा लोकसभा मतदारसंघासाठी आमदार बबनराव शिंदे इच्छुक!
जयप्रकाश अभंगे
सोलापूर, ६ फेब्रुवारी

 

माढा लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा विचार न झाल्यास आपला विचार करण्यात यावा, अशी मागणी माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांनी केली आहे. श्री. शिंदे यांनी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यातून राष्ट्रवादीकडे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आली आहे.
शुक्रवारी मुंबईत प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात सोलापूर जिल्ह्य़ातील सोलापूर लोकसभा (राखीव) मतदारसंघ आणि पंढरपूरऐवजी नव्याने झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आर.आर. पाटील, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, जलसंपदामंत्री अजित पवार, तसेच शहर आणि जिल्ह्य़ातील आमदार, पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांसह माजी मंत्री दिलीप सोपल, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, बळीराम ऊर्फ काका साठे, जि.प.च्या अध्यक्षा सुमन नेहतराव, उपाध्यक्ष संजय शिंदे, जि.प.चे पदाधिकारी, दीपक साळुंखे-पाटील आदी उपस्थित होते.
माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी आपण इच्छुक असल्याचे जाहीर करतानाच विजयसिंह मोहिते-पाटील यांचा माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यामुळे त्यांना मतदारसंघ शिल्लक राहिला नाही. ते जर माढा लोकसभा मतदारसंघात उभे राहणार असतील तर आपली हरकत नाही; परंतु त्यांना उमेदवारी नको असेल तर आपल्या नावाचा विचार व्हावा, असे पक्षश्रेष्ठींना सांगितले. त्याचबरोबर या लोकसभा मतदारसंघासाठी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाचीही चर्चा आहे. ते तरुण आहेत. त्यांना भविष्यात आणखी संधी मिळण्याची शक्यता आहे. तेव्हा विजयदादा नसतील तर आपला विचार व्हावा, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
पंढरपूरचे आमदार सुधाकर परिचारक आणि मंगळवेढय़ाचे आमदार डॉ. रामचंद्र साळे यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी तरुण नेतृत्व रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारीची मागणी केली. पक्षाचे शहराध्यक्ष कय्युम बुऱ्हाण, शफी इनामदार यांनीही रणजितसिंहांना उमेदवारी द्यावी, असे पक्षश्रेष्ठींना सांगितले.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात गटबाजीमुळे दोन वेळा काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. या लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ हे विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्याचप्रमाणे दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यांतही राष्ट्रवादीचा प्रभाव वाढला आहे. तेव्हा हा मतदारसंघ काँग्रेसकडून राष्ट्रवादीच्या ताब्यात घ्यावा, अशी मागणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांनी केली. श्री. डोंगरे यांच्या मागणीचे समर्थन आमदार परिचारक, मोहोळचे आमदार राजन पाटील, शफी इनामदार यांनीही केले. माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी, आपण यापूर्वी पंढरपूर आणि उस्मानाबाद या दोन मतदारसंघांतून लोकसभेला उभे होतो; परंतु आपणास यश मिळाले नाही. आता सोलापूर लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती राष्ट्रवादीच्या दृष्टीने अनुकूल असल्यामुळे या मतदारसंघासाठी आपला विचार व्हावा, अशी मागणी केली.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी अचानकपणे माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांनी आपण इच्छुक असल्याचे सांगताच बैठकीत काही वेळ खळबळ उडाली. श्री. शिंदे यांनी अचानकपणे असा का पवित्रा घेतला याबाबत शहर आणि जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांत उलटसुलट चर्चा होती.