Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

काँग्रेस नगरसेवकाच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर
कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया बोगस प्रमाणपत्र
सांगली, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

पत्नीच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक साजिद पठाण यांच्या पत्नी सबिना यांना येथील जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. तिसरे अपत्य झाल्याने पती साजिद पठाण यांचे नगरसेवकपद धोक्यात येऊ नये, यासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे बोगस प्रमाणपत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते.
साजिद पठाण यांना तीन अपत्ये असल्याने त्यांची निवड रद्द करावी, अशी याचिका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक इद्रिस नायकवडी यांनी न्यायालयात दाखल केली होती. या वेळी पठाण यांनी दोन अपत्यांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केली असल्याचा दाखला येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातून मिळवून तो न्यायालयात सादर केला होता. हा दाखला बोगस असल्याचे निदर्शनास येताच नायकवडी यांनी शासकीय रुग्णालयाकडे तक्रार केली. हे प्रकरण अंगलट येणार असे दिसताच दाखला देणाऱ्या प्रसूतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भास्कर कृष्णमूर्ती यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात पठाण व त्यांची पत्नी सबिना यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीनुसार रजिस्टरमध्ये खाडाखोड करून सबिना पठाण यांची कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाल्याची नोंद करणारा शासकीय रुग्णालयाचा कर्मचारी मोहन घाडगे याला पोलिसांनी अटक केली होती, तसेच काल साजिद पठाण यांचीही कसून चौकशी केली होती. सबिना पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अटकेच्या हालचालीही सुरू झाल्या होत्या. दरम्यान, श्रीमती पठाण यांनी या प्रकरणी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीनही मंजूर केला आहे.