Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

किरकोळ रॉकेल विक्री केंद्रासाठी दोन बचतगटांचे शक्तिप्रदर्शन
शाहूवाडी, ६ फेब्रुवारी/वार्ताहर

 

शासनमान्य किरकोळ रॉकेल विक्री केंद्र आपणालाच मिळावे यासाठी शाहूवाडी तालुक्यातील आकुर्ळे या गावात थेट दोन महिला बचतगटांनी शक्तिप्रदर्शन केले. गावात महिलांची ग्रामसभा झाली. त्यावेळी या बचतगटांना थेट गायकवाड-पाटील असा राजकीय रंग प्राप्त झाल्याने दोन्ही महिला बचतगटांनी रॉकेल विक्री केंद्र आपल्याच बचतगटाला मिळावे यासाठी पदर खोचला आहे. आता पुरवठा खात्याकडील अधिकाऱ्यांची भूमिका निर्णायक ठरणार असून, रॉकेलबाबत काहीही निर्णय झाला तरी तो आगीत तेलच ठरण्याची शक्यता आहे.
या गावात शिधापत्रिकाधारकांची संख्या २९२ एवढी आहे. सध्या या गावचे रॉकेल विक्री केंद्र एक महिलाच चालवते. शासनाच्या नव्या धोरणानुसार महिला बचतगटाला हे केंद्र देणे आवश्यक बनले आहे. याबाबत महिलांची खास ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या वेळी या गटांना राजकीय रंग चढला. सध्या ग्रामपंचायतीवर आमदार सत्यजित पाटील गट, अर्थात शिवसेनेची सत्ता आहे, तर गावात विरोधी गट कृष्णा सावंत व माजी सरपंच सखाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली गायकवाड गट सक्रिय आहे. गायकवाड-पाटील हे शाहूवाडी तालुक्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात.
या वेळी सरपंच ज्योती वाघ यांनी आजचा ज्योतिर्लिग महिला बचतगट हा सर्वात जुना असल्याने याच गटाला रॉकेल विक्री केंद्र चालवण्यास मिळायला हवे, असा दावा केला, तर विरोधी गटाचे सखाराम पाटील यांना गावातील बहुतेक महिलांनी एका ठरावाद्वारे गणेश महिला बचतगटाकडे केंद्र असावे, अशी मागणी केल्याने तो आम्हालाच मिळावा, असा प्रतिदावा केला आहे. निमित्त रॉकेल विक्री केंद्राचे असले तरी शक्तिप्रदर्शन मात्र राजकीय गटांचे अशी स्थिती असून, दोन्ही गटांना शासनाचा निर्णय काय होणार याची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, महिला बचतगटांनी गावात शक्तिप्रदर्शन केले असले तरी गावकारभारी आपापल्या गटाच्या नेत्यांमार्फत पुरवठा विभागांकडे ताकद लावून बसले आहेत. रॉकेलच्या प्रश्नावरून राजकीय ठिणगी पडली असली तरी याचे पर्यवसान काय होणार याची प्रतीक्षा सर्वाना आहे. महिला बचतगटांनी प्रश्न प्रतिष्ठेचा केला असून, बचतगटही राजकारणात सक्रिय झाल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे. महिला आत्मनिर्भर बनाव्यात हा उदात्त हेतू या अशा काटाकाटीच्या राजकारणाने कुठेतरी मागे पडेल की काय, अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहे.