Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

सांगली तालुका निर्मितीचा मिरज पंचायत समितीत ठराव
मिरज, ६ फेब्रुवारी / वार्ताहर

 

सर्वसामान्य जनतेची गैरसोय टाळण्यासाठी स्वतंत्र सांगली तालुका निर्मितीचा प्रशासकीय प्रस्तावास मिरज पंचायत समितीने मंजुरी दिली. सभापती अनिल आमटवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत सांगली तालुका निर्मितीचा ठराव आवाजी मतांनी मंजूर करण्यात आला.
सध्याचा मिरज तालुका विस्तारित असून मध्य व पश्चिम विभागातील जनतेची गैरसोय होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नवीन सांगली तालुका निर्मितीचा प्रस्ताव मिरज पंचायत समितीकडे आला होता. मासिक सभेत गटविकास अधिकाऱ्यांनी तो वाचून दाखविल्यावर चर्चा झाली. मिरज तालुक्यातून स्वतंत्र सांगली तालुक्यासाठी प्रस्तावित होणाऱ्या गावांच्या नावाची यादी वाचून दाखविण्यात आली. कवलापूर मंडलातील गावे सांगलीला जोडण्याची मागणी अण्णासाहेब कोरे व प्रवीण पाटील यांनी केली.
सांगलीसोबतच स्वतंत्र आष्टा तालुक्याची निर्मिती प्रस्तावित आहे. आष्टय़ासाठी पश्चिम भागातील कसबे डिग्रज मंडलातील जोडण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत ही गावे सांगलीला जोडण्याची मागणी अजयसिंह चव्हाण यांनी केली. एरंडोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी सदस्या श्रीमती शालन भोई यांनी केली. जवाहर विहिरीसाठी अनुदान वाटपाच्या गोंधळाबाबत सभागृहात गरमागरम चर्चा झाली. श्री. चव्हाण यांनी याबाबतची वस्तुस्थिती सभागृहासमोर मांडण्याची मागणी केली. प्रशासन व छोटे पाटबंधारे विभागात समन्वय नसल्याचा आरोप करण्यात आला. लाभधारकांना तात्काळ अनुदान वाटण्यात कोणत्या अडचणी आहेत, याची विचारणाही सदस्यांनी केली. मात्र प्रशासकीय पातळीवरून ठोस कृतीचे कोणतेही आश्वासन न देताच हा विषय गुंडाळण्यात आला. सत्याप्पा नाईक, श्रीमती मनोरमा कुंभार, शालन भोई व प्रवीण पाटील आदींनी या चर्चेत भाग घेतला.