Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘उच्च व तंत्रशिक्षणाचे सोलापूर मध्यवर्ती केंद्र बनले पाहिजे’
सोलापूर, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

सोलापूर जिल्हय़ात तीर्थक्षेत्र व कृषी पर्यटनाबरोबर उच्च व तंत्रशिक्षणाच्या विकासासाठी मोठय़ा प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. येथील भौगोलिक परिस्थती व दळणवळणाची अनुकूलता पाहता सोलापूर हे उच्चशिक्षणाचे विशेषत: तंत्रशिक्षणाचे मध्यवर्ती केंद्र बनले पाहिजे, असा आग्रही मतप्रवाह सोलापूर महोत्सवांतर्गत परिसंवादात मांडण्यात आला.
जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर महोत्सवांतर्गत आयोजित ‘सोलापूरच्या पर्यटन व शैक्षणिक विकासाच्या पाऊलवाटा’ या विषयावरील परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी मान्यवर वक्त्यांनी भाग घेऊन चर्चा केली. ‘तंत्रशिक्षणाचा विस्तार : गरज आणि अपेक्षा’ या विषयावर येथील शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य एफ. ए. खान यांनी मते मांडताना तंत्रशिक्षण विभागाची रचना स्पष्ट केली. तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात चांगल्या शिक्षकांची कमतरता असून, शासनापेक्षा खासगी तंत्रशिक्षण संस्थांकडे पगारी जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी तंत्रशिक्षक आकर्षिले जात आहेत. सोलापुरात तंत्रशिक्षण संस्था विकसित करायच्या असतील तर चांगले शिक्षक आणले गेले पाहिजेत. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम व्हावेत. सोलापुरात मध्यमवर्गीय व गरीब विद्यार्थी आणि पालकांसाठी माफक दरात विश्रामगृहाची सोय करायला हवी, अशा विविध सूचना मांडताना त्यांनी तंत्रशिक्षणाच्या सर्व अंगांना स्पर्श केला.
वालचंद इन्स्टिटय़ूटचे प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे यांनी ‘तंत्रशिक्षणाच्या भावी दिशा’ या विषयावर संवाद साधताना सोलापुरात तंत्रशिक्षण व अभियांत्रिकी संस्थांची स्थिती उत्तम असली तरी त्यावर समाधान मानून चालणार नाही. तर नजीकच्या काळात सोलापूर हे तंत्रशिक्षण क्षेत्रात मध्यवर्ती केंद्र बनण्यासाठी येथे तंत्रशिक्षण विद्यापीठाचा आग्रह धरला पाहिजे, अशी उपयुक्त सूचना मांडली. सोलापूरची भौगोलिक परिस्थती व दळणवळणाची अनुकूलता तसेच स्वस्त जागा, बांधकामे, महानगरांच्या तुलनेने स्वस्ताई, मुले बिघडणार नाहीत अशी संस्कृती या सर्व बाबी विचारात घेता येथे उच्च व तंत्रशिक्षणाला भरपूर वाव आहे. उत्तर प्रदेश व आसपासच्या भागातून मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी आले तर येथील शैक्षणिक पर्यटनाला चालना मिळू शकेल, असेही मत डॉ. हलकुडे यांनी नोंदविले. तत्पूर्वी, सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. ए. शेजूळ, महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे अध्यक्ष आर. सी. बाळापुरे आदींनीही चर्चेत सहभाग नोंदविला.
या परिसंवादाचा समारोप जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील व सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर फडतरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.