Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘मार्गदर्शक तत्त्वांच्या आधाराने अधिकाऱ्यांनी उत्तम काम करावे’
सांगली, ६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

विकास योजना राबविताना अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे उत्तम काम करावे, अशी अपेक्षा सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव तथा सांगली जिल्ह्य़ाच्या पालक सचिव श्रीमती लीना मेंहदळे यांनी व्यक्त केली.
सर्वसाधारण जिल्हा वार्षकि योजना सन २००९- २०१० च्या नियोजन आराखडय़ाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हाधिकारी राजेंद्र चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी गोकुळ मवारे, महापालिका आयुक्त दत्तात्रय मेतके व जिल्हा नियोजन अधिकारी बी. आर. पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांचे अधिकाऱ्यांनी योग्य व सुयोग्य नियोजन करावे, अशी सूचना करुन पालक सचिव श्रीमती लीना मेंहदळे म्हणाल्या की, या योजनेतील कामांचा तपशील मांडून त्या कामांचे एकत्रिकरण करावे. या योजना राबविताना मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करण्याबरोबरच या तत्त्वांच्या आधारे चांगले काम करावे. तसेच नियोजन विभागाने प्रत्येक महिन्यास जिल्हास्तरावर अशा बैठका घ्याव्यात. सांगली जिल्ह्य़ात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी खास प्रयत्न करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.
कार्यान्वयीन यंत्रणांनी आपल्याकडील योजनांची कामे पूर्ण करताना या कामांची गुणवत्ता चांगली राहील याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. महत्त्वांच्या कामांना प्राधान्य देण्याबरोबर अपुऱ्या कामाचेही सुयोग्य नियोजन करावे. गावातील नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम महिला बचतगटांना देताना या कामांचे प्रशिक्षण संबंधित गावातील महिलांना द्यावे. तसेच पाणीपट्टी वसुलीबाबत विद्यार्थ्यांना अकौंटिंगचे प्रशिक्षण देण्यात यावे. इयत्ता आठवीनंतर शाळेत न गेलेल्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याबाबत प्रयत्न व्हावेत. क्रीडा खात्याने विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील मुलांना क्रीडा योजनांचा लाभ देण्याबाबत प्रयत्न करावेत, अशी सूचनाही श्रीमती मेंहदळे यांनी केली. जिल्हा नियोजन अधिकारी बी. आर. पाटील यांनी आभार मानले.