Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

जतमध्ये निर्मलग्राम योजनेचा फज्जा
जत, ६ फेब्रुवारी / वार्ताहर

 

जत शहर निर्मलग्राम करण्याचे नियोजन गेली दोन वर्षे केले जात आहे. त्याला मूर्तस्वरूप येण्याचे वाटत असतानाच पुन्हा ही योजना बासनात गुंडाळली गेली आहे. कोणीही उघडय़ावर शौचास बसू नये, म्हणून पहाटेची गस्तही घालण्याचे ठरले. त्याप्रमाणे जेमतेम दहा दिवसच ही गस्त घालण्यात आली व त्यानंतर ती बंद पडली. त्यामुळे निर्मलग्राम योजनेचा जत शहरात फज्जा उडाला आहे.
जत तालुक्यातील २१ गावे निर्मलग्राम झाली आहेत. त्यासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती अरूणा इटाई यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. पण या अधिकाऱ्यांना तालुक्याचे मुख्यालय असलेल्या जत शहर पहिल्यांदा निर्मल करा. मगच आम्हाला उपदेशाचे डोस द्या, असे अनेक गावच्या ग्रामस्थांनी सुनावले.
त्यामुळे गटविकास अधिकारी श्रीमती इटाई यांनी पुढाकार घेऊन जत शहर निर्मलग्राम करण्याचा विडा उचलला. त्यांना शहरातील प्राथमिक, माध्यमिक व अंगणवाडीचे शिक्षक व सेविका यांची चांगली मदत झाली. शहरातील कुटुंबांचा सव्र्हे करण्यात आला. यात एक हजार ९०० कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे आढळून आले. शौचालय बांधण्याबाबत त्याची जनजागृती करण्यात आली. त्याला अल्पसा प्रतिसाद मिळाला. शिवाय पुढील मोहीमसुध्दा थंडावली.
गेल्या महिन्यात पुन्हा याबाबत बैठक झाली. ही योजना आक्रमकपणे राबविण्याचे ठरले. उघडय़ावर शौचास बंदी घालण्यात आली. तशी रोज पहाटे व सायंकाळी दवंडी पिटण्यात आली. कोणीही उघडय़ावर शौचास बसू नये म्हणून शिक्षक, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी यांची गस्ती पथके ठेवण्यात आली. सुमारे १६ पथके विविध प्रभागांत ठेवण्यात आली. त्याला प्रारंभी बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळाला. पण १५ दिवसात ये रे माझ्या मागल्यासारखा प्रकार सुरू झाला. सध्या ही पथकेही गायब झाली आहेत व नागरिकांनाही मोकळीक मिळाली आहे. तसेच शौचास उघडय़ावर बसणाऱ्यांचे रेशन व गॅस बंद करण्याच्या इशाऱ्यालाही कोणी भीक घातली नाही. त्यामुळे जत शहर निर्मलग्राम योजनेचा पूर्णत फज्जा उडाला आहे.