Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

ग्रामीण कारागिरांसाठी छोटी आरायंत्रे निर्मितीचा निर्णय
कोल्हापूर, ६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

ग्रामीण भागातील शेती अवजारे बनविण्यासाठी उपयुक्त असणारे तसेच सुतारकाम व तत्सम काम करणाऱ्या कारागिरांना स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी निर्माण करणारी छोटी आरायंत्रे पुन्हा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी घेतला आहे. या संदर्भात ओबीसी सेवासंघाने ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जाऊन पाचपुते यांना निवेदन दिले होते.
ग्रामीण भागातील आरायंत्रे बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याविरोधी आंदोलने करण्यात आली होती. ओबीसी सेवासंघाने ग्रामीण भागातील हा रोजगाराशी निगडित असलेला प्रश्न हाती घेऊन आरायंत्रे पुन्हा सुरू करण्यास मान्यता द्यावी यासाठी प्रयत्न चालवले होते. प्रा.एन.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप ढोबळे, दिगंबर लोहार, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, आमदार राजीव आवळे, आरायंत्र संघर्ष कृती समितीचे आनंदराव सुतार, नामदेव सुतार, सतीश सुतार, अरविंद पवार आदींच्या शिष्टमंडळाने वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्याशी निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी मुख्य वनसंरक्षक सिन्हा, काकोडकर हे उपस्थित होते.
दिनांक ४ जून १९९३ चा आरायंत्रे बंद करण्याबद्दलचा आदेश रद्द करण्याचा तसेच वनखात्याने जप्त केलेल्या आरायंत्रांचे साहित्य परत देण्याचा यावेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
आता पुन्हा आरायंत्रे सुरू होणार असल्यामुळे स्थानिक कारागिरांना रोजगार मिळणार आहे. या शासननिर्णयाबद्दल सर्वत्र समाधान पसरले आहे.