Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

इनायत तेरदाळकर यांना यंदाचा युवा गौरव पुरस्कार
सांगली, ६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

नेहरू युवा केंद्राच्या वतीने क्रीडा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या राज्य शरीरसौष्ठव पंच इनायत तेरदाळकर यांना यंदाचा युवा गौरव सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी दिली.
इनायत तेरदाळकर यांच्यासह उत्तम पाटील (कुस्ती), नाना सिंहासने (वेटलिफ्टींग), आनंदराव नलवडे (तायक्वाँदो) व आनंदराव धुमाळ (कुस्ती) यांना या युवा क्रीडा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात सोमवार दि. ९ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता आयोजित एका कार्यक्रमात ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर व खासदार प्रतीक पाटील यांच्या हस्ते या सर्वाना गौरविण्यात येणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोकुळ मवारे हेही उपस्थित राहणार आहेत.
शरीरसौष्ठव स्पर्धेत १९९० पासून सहभागी होणाऱ्या इनायत तेरदाळकर यांनी राज्यस्तरावरील अनेक पारितोषिके मिळवली आहेत. १९९४ पासून शरीरसौष्ठवच्या प्रसार व प्रचारासाठी जिल्हाभर प्रयत्न करून ग्रामीण भागातील युवकांच्यात या खेळाविषयी आवड निर्माण केली आहे. सांगली शहरातील अत्याधुनिक अशा व्यायामशाळांच्या उभारणीतही त्यांचा मोलाचा वाटा आहे. बोस्टनमध्ये पाच वर्षे, तर सध्या ब्ल्यू स्टार जीममध्ये तेरदाळकर हे मार्गदर्शन करीत आहेत. शरीरसौष्ठवला आधुनिक ज्ञानाची जोड देण्यासाठी त्यांनी पुणे येथे के- ११ हा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.