Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

पंढरपूरच्या पद्मशाली धर्मशाळेत आज पल्ली, मिठ्ठापेल्ली यांचा अर्धपुतळा अनावरण सोहळा
सोलापूर, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

पंढरपूर येथील अखिल भारतीय पद्मशाली धर्मशाळेत धर्मशाळेचे संस्थापक-अध्यक्ष गणतराव विठोबा पल्ली (सोलापूर) आणि धर्मशाळेचे माजी अध्यक्ष मल्लय्या रामय्या मिठ्ठापेल्ली (पुणे) यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण उद्या दि. ७ रोजी करण्यात येणार आहे.पद्मशाली धर्मशाळेच्या सांस्कृतिक भवनात उद्या दि. ७ रोजी सकाळी ११ वाजता धर्मशाळेचा सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभ सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिला आहे. यावेळी गणपतराव पल्ली यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते तर धर्मशाळेचे माजी अध्यक्ष मल्लय्या मिठ्ठापेल्ली यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती धर्मशाळेचे अध्यक्ष विठ्ठलराव कोंडा आणि उपाध्यक्ष चंद्रकांत मिठ्ठापेल्ली यांनी दिली.
१९५६ मध्ये ५३ वर्षांपूर्वी पंढरपूर येथे पद्मशाली समाजाने धर्मशाळेची स्थापना केली. या स्थापनेत पल्ली आणि मिठ्ठापेल्ली यांनी मोठे योगदान दिले. त्यामुळे त्यांचे पुढील पिढीला स्मरण राहावे म्हणून सांस्कृतिक भवनात त्यांचा अर्धपुतळा बसविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हणमंतू परभय्या मद्दा हॉलचे उद्घाटन माजी खासदार धर्मण्णा सादूल यांच्या हस्ते, सुवर्ण महोत्सव स्मरणिका ‘निर्मितीपर्व’ चे प्रकाशन आमदार सुधाकर परिचारक यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास माजी खासदार गंगाधर कुचन, भागवताचार्य वा.ना. उत्पात, वेदान्ताचार्य हरिभाऊ महाराज पाटील, ह.भ.प. दा.का. थावरे, ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.