Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांविरुद्ध कारवाईची मागणी
सोलापूर, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील कामकाजाच्या संदर्भात कामगारांना फसविणाऱ्या दलालांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी विडी व यंत्रमाग कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी यांनी केली आहे.
भविष्य निर्वाह निधी सोलापूर विभागीय कार्यालयाचे सहायक आयुक्त आशिष कुमार यांची भेट घेऊन त्यांनी कार्यालय परिसरातील दलालांविरुद्ध संतप्त भावना व्यक्त करून कारवाईची मागणी केली. या वेळी त्यांच्यासमवेत पद्मा महंता, श्रीनिवास चिलवेरी, दशरथ नंदाल, शोभा साळवे, लक्ष्मीबाई इप्पा, नरेंद्र कोंडा आदी उपस्थित होते.
शहरात विडी, यंत्रमाग आणि विविध कारखान्यांत काम करणाऱ्या असंघटित कामगारांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यांना व्यवस्थापनाकडून योग्य मोबदला मिळत नाही. तरीही ते उपजीविकेचे साधन नसल्याने नाईलाजास्तव काम करतात आणि बहुतेक कामगार या अशिक्षित महिला असून, त्यांना किमान वेतन व इतर कायदेशीर लाभ मिळत नाहीत. निवृत्तीनंतर त्यांचे हाल होतात. त्यात भरीस भर म्हणून भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून मिळणारे सर्व कायदेशीर फायदेही त्यांना मिळत नाहीत. कार्यालयाकडून उपेक्षा केली जाते. तेथील दलाल कामगारांची फसवणूक करीत आहेत. तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. त्याचप्रमाणे या कामगारांना पिवळे रेशनकार्ड मिळण्यासाठी भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा करून घेत असल्याचा दाखला द्यावा, एखाद्या कामगाराला फसवून काही दलाल वारस म्हणून आपले नाव लावून घेतल्यास कामगारांच्या मागणीनुसार वारसदाराचे नाव कमी करून नवीन वारसदारांचे नाव लावावे, प्रॉव्हिडंड फंडाची माहिती कामगारांना त्वरित द्यावी, कामगारांच्या वयाच्या तफावतीबाबत सिव्हिल सर्जनचा दाखला ग्राह्य़ धरावा, भविष्य निर्वाह निधी जमा करण्यासाठी कामगारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी अभियान राबविण्यात यावे, निधीच्या पावत्या वेळोवेळी विनाअडथळा देण्यात याव्यात, दलालाची प्रथा बंद करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन सहायक आयुक्त आशिष कुमार यांना देण्यात आले.