Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मारवाडी युवा मंचच्या प्रदेशाध्यक्षपदी ललित गांधी
कोल्हापूर, ६ फेब्रुवारी / विशेष प्रतिनिधी

 

अखिल भारतीय मारवाडी युवा मंचच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी ललित गांधी (कोल्हापूर) यांची निवड झाल्याची घोषणा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र गुप्ता यांनी दिल्ली येथे राष्ट्रीय मुख्यालयात केली.
रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण केलेली अखिल भारतीय मारवाडी युवा मंच ही समस्त मारवाडी समाजाची राष्ट्रीय स्तरावरील शिखर सामाजिक संस्था असून यामध्ये जैन, माहेश्वरी, अगरवाल, चौधरी, पुरोहित आदी सर्व घटक समाजांचा समावेश असून राष्ट्रीय एकात्मता जोपासणे, शैक्षणिक विकास करणे, व्यापार उद्योग वृध्दीसाठी प्रयत्न करणे हे युवा मंचचे प्रमुख उद्देश आहेत.
मारवाडी युवा मंचच्या माध्यमातून देशभरात २१० रूग्णवाहिका, ३५० शीतल जलपान केंद्र यासह दोन कृत्रिम अवयव निर्माण केंद्रे, ऑक्सिजन पार्क यासारखे स्थायी प्रकल्प चालविण्यात येत असून गेल्या २४ वर्षांत ६५००० अपंगांना मोफत कृत्रिम अवयव प्रदान करण्यात आले असून विकलांग मुक्त भारत हा रौप्यमहोत्सवी वर्षांतील राष्ट्रीय उपक्रम जाहीर केला असून कन्या भ्रृण संरक्षण या राष्ट्रीय योजनेच्या माध्यमातून देशभरात जनजागरण अभियान राबवून मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.युवा मंचच्या महाराष्ट्रात ५४ शाखा असून २००९ ते २०११ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत ललित गांधी यांची बिनविरोध निवड झाली. माजी प्रदेशाध्यक्ष सुदेश अट्टल (कल्याण) यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले तर राजेश सोनी व विष्णू चेचाणी (जालना) यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
युवा मंचचे गेल्या १४ वर्षांपासून सदस्य असलेले ललित गांधी हे विविध सहकारी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी संबंधित असून भारत सरकारच्या प्राणी कल्याण समितीचे सदस्य म्हणून विविध शैक्षणिक संस्थांवर शासकीय प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत.