Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

कांतिलाल जाधवला ‘अंबाबाई तालीम केसरी’बहुमान
मिरज, ६ फेब्रुवारी/वार्ताहर

 

सलग २६ मिनिटांची कडवी झुंज देऊन गंगावेस तालीमच्या कांतिलाल जाधव याने सांगलीच्या कुलदीप यादव याला एकेरी कस डावावर अस्मान दाखवित पहिला श्री अंबाबाई तालीम केसरी बहुमान पटकावला. मल्लसम्राट कै. युवराज पाटील यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या चांदीच्या गदेवर कांतिलाल जाधव याने नाव कोरले. त्यावेळी दहा हजार कुस्तीशौकिनांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.
श्री अंबाबाई तालीम शिक्षण संस्थेच्या लोकमान्य टिळक मैदानावर झालेल्या या कुस्ती मैदानात ८० कुस्त्या झाल्या. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या उपस्थितीत हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्या हस्ते या मैदानाचे पूजन करण्यात आले. दुपारपासूनच या मैदानावर कुस्त्यांना प्रारंभ झाला. पहिली मानाची कुस्ती पाच वर्षांच्या सिद्धार्थ भोकरे (अंबाबाई तालीम) व योगेश चोरमुले (आद्य बजरंग तालीम) यांच्यात झाली. बाळू इंडी (भोसले तालीम) याने धनाजी इटकर (निमगाव) याच्यावर मात केली. प्रदीप चव्हाण याने शाहू आखाडय़ाचा मल्ल श्रीकांत घुले याच्यावर विजय मिळविला. रामदास पवार, कुमार दीडवाघ, रणजित सावर्डेकर (सांगली), श्रीपती कर्नवर (मोतीबाग) व नाना जाधव (आटपाडी) यांनी चटकदार कुस्त्या करीत प्रेक्षकांची वाहवा मिळविली. शेवटच्या पाच कुस्त्या प्रेक्षणीय झाल्या.
श्री अंबाबाई तालीमचा मल्ल श्रावण पडळकर याने शाहुपुरीच्या शिवाजी पाटील याच्यावर एकेरी पट घेऊन विजय मिळवला. आद्य बजरंग तालीमचा मल्ल गौतम पवार याने गंगावेस तालीमचा मल्ल फहाद बिनअली चाऊस याच्यावर घुटना डाव करून विजय संपादन केला. त्यावेळी अवघ्या मैदानात जल्लोष झाला. चौथ्या क्रमांकाची कुस्ती दत्ता मोटे (पवार तालीम, सांगली) व सुरेंद्रसिंह देसपाल (चंदगीराम यांचा पठ्ठा) यांच्यात झाली. मात्र १३ मिनिटांच्या लढतीनंतर ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. आटपाडीच्या अनिल कोळेकर याला पंजाबच्या गोल्डनसिंग याने अस्मान दाखवून विजय मिळविला.
अंबाबाई केसरी पदासाठी कुलदीप यादव (सांगली) व कांतिलाल जाधव (कोल्हापूर) यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती झाली. सलग २६ मिनिटे या दोघांत लढत सुरू होती. पंच म्हणून काम करणारे कवठेमहांकाळ पंचायत समितीचे सदस्य तानाजी यमगर यांनी मैदानाबाहेर गेलेली ही लढत तीनवेळा मैदानाच्या मध्यभागी आणली. तेव्हा प्रेक्षकांनी निकाली कुस्तीचा आग्रह धरला. २७ व्या मिनिटाला एकेरी कस डावावर कुलदीप यादव याला अस्मान दाखवून कांतिलाल जाधव छातीवर बसला. त्यावेळी अवघ्या प्रेक्षागारातून टाळ्यांचा कडकडाट झाला.
सांगली जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश परांजपे यांच्या हस्ते कांतिलाल जाधव याला चांदीची गदा व अंबाबाई केसरी पदक बहाल करण्यात आले. या मैदानास पोलीस उपअधीक्षक दीपक देवराज, हिंदकेसरी मारुती माने, गणपतराव आंदळकर, दीनानाथसिंह, महाराष्ट्र केसरी आप्पा कदम, मुन्नालाल शेख, रावसाहेब मगर, महापौर मैनुद्दीन बागवान, नगरसेवक इद्रिस नायकवडी, महंमद मणेर, सुरेश आवटी, पांडुरंग कोरे, युवराज बावडेकर, सचित तासगावकर, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रकांत पाटील व सुबोध गोरे आदींसह सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, इंदापूर व मंगळवेढा आदी ठिकाणचे कुस्तीशौकिन मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी डबल महाराष्ट्र केसरी बहुमान पटकाविल्याबद्दल चंद्रहार पाटील याचा माजी आमदार संभाजी पवार यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. कोथळीचे शंकर पुजारी यांचे शहारे आणणारे निवेदन, शिरोळच्या राजीव आवळे यांच्या हलगीच्या कडकडाटाने या कुस्ती मैदानात खरी जान आणली.