Leading International Marathi News Daily                                शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

क्रीडा

अग्रलेख

त्रिकालवेध

लोकमानस

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत
निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

झाडाझडती
पुढचा पंतप्रधान कोण याबाबत दिल्लीत खलबते चालू झाली असतानाच मुळात दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी ठिकठिकाणचे ‘सरदार’, ‘जहागिरदार’ कामाला लागले आहेत. आपापले गड-किल्ले आणि त्यावरील शिबंदीची झाडाझडती घेण्याचे आणि डागडुजीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी आणि मतभेद संपुष्टात आणून कार्यकर्त्यांना एकजुटीने कामाला जुंपण्यासाठी दस्तुरखुद्द शरद पवार यांनी एक बैठक आयोजित केली. प. महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. तो अभेद्य राखण्यासाठी बैठकीत विशेष जोर देण्यात आला. दुसरीकडे राज ठाकरे यांनी निवडणुकीला सामोरे जाताना कार्यकर्त्यांच्या ‘व्यक्तिमत्वविकासा’कडे गांभीर्याने लक्ष दिले. चांगले कपडे घाला, दारू-सिगारेटच्या नादी लागू नका, सोन्याच्या साखळ्यांचे प्रदर्शन मांडू नका, असा ‘बॅक टू बेसिक्स’ उपदेश करीत त्यांनी निवडणूक तयारीची नांदी केली.

राज यांचे ‘बॅक टू बेसिक्स’
संदीप आचार्य
मुंबई, ६ फेब्रुवारी
ठाणे लोकसभा मतदार संघातील उपविभागाअध्यक्षांपासून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नवी मुंबई येथील बंद सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. ठाणे येथील प्रचंड जाहीर सभेनंतरही मनसेच्या ठाण्यातील दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला तर आणखीही काही पदाधिकारी जाण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या वर्षभरात मनसेतून अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्या प्रत्येक वेळी कोणी गेले तरी मला त्याची पर्वा नाही.

प. महाराष्ट्र राखण्यावर शरद पवारांचा भर
मुंबई, ६ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

प. महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला असल्याने तेथील सर्व वाद मिटवून कार्यकर्त्यांना निवडणुकीला तयार करण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी आज केला. पवारांना महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत. मात्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाच्या यशावर परिणाम होऊ शकतो. यामुळेच पवारांनी कोल्हापूर, हातकणंगले, माढा, सातारा, सांगली मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.

भारतीय खेळाडू नाराज
मुंबई, ६ फेब्रुवारी / विशेष प्रतिनिधी

केविन पीटरसन, अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफ, यांच्यासह अन्य आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना लिलावात वारेमाप किमतीत विकत घेतल्याबद्दल आयपीएलमधील भारतीय क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रामुख्याने विविध संघाचे ‘आयकॉन’ असणाऱ्या खेळाडूंपेक्षाही पीटरसन, फ्लिन्टॉफ यांना अधिक पैसे मिळणार आहेत. भारतीय क्रिकेटपटूंच्या मते, ‘आयपीएल’ला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे तो आमच्या प्रतिमेमुळे, आमच्या खेळामुळे.

पुन्हा मनमोहनच!
सोनिया गांधी यांचे संकेत
नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी
पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांच्या नावावरून प्रतिस्पर्धीभाजप-रालोआच्या गोटात अनुत्साह व नाराजी दिसत असतानाच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सत्ताधारी युपीएमध्ये मात्र वर्तमानातच काय, भविष्यात पंतप्रधानपदाची खुर्ची रिक्त नसल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिले आहे. नुकत्याच झालेल्या बायपास सर्जरीनंतर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हेच पुढची अनेक वर्षे पक्षाचे व देशाचे नेतृत्व करीत राहतील, असे सोनिया गांधी यांनी काँग्रेस संदेशच्या फेब्रुवारीच्या अंकात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.

अमेरिकेत दोन महिन्यांत अकरा लाखाहून अधिक बेकार
३४ वर्षांतील सर्वात विपरित स्थिती
न्यूयॉर्क, ६ फेब्रुवारी/वृत्तसंस्था
जागतिक मंदीच्या तडाख्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था डळमळीत झाली असून त्याच्या परिणामी गेल्या जानेवारी महिन्यामध्ये ५ लाख ९८ हजार जणांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तर गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये ५ लाख २४ हजार जणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. म्हणजे गेल्या दोन महिन्यांत अमेरिकेत ११ लाख २३ हजार जण बेकारीच्या खाईत लोटले गेले. १९७४ साली अमेरिकेत मोठय़ा प्रमाणावर नोकरकपात झाली होती.

नाटय़संमेलनात मंत्र्यांची मांदियाळी!
मुंबई, ६ फेब्रुवारी/नाटय़ प्रतिनिधी

बीड येथे १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या ८९ व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाचा उद्घाटन सोहळा आणि सांगता सोहळ्यात आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री तसेच राज्याचे मंत्री मिळून दोन्ही कार्यक्रमांत प्रत्येकी डझनभर मंत्री व्यासपीठावर हजेरी लावणार आहेत. त्यामुळे हे नाटय़संमेलन आहे की, राजकीय संमेलन, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. लोकसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा नारळच जणू या संमेलनात फुटणार, असंच चित्र आहे.

गोव्यासाठी मुंबईहून ‘वन स्टॉप’ सुपरफास्ट एक्स्प्रेस
मुंबई, ६ फेब्रवारी / प्रतिनिधी

मुंबईहून ओव्हरनाईट प्रवास करून वीकेण्डनिमित्त गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना आणि कोकणात जाणाऱ्या प्रवासांना आता कोकणकन्या एक्स्प्रेसने अवघडलेल्या अवस्थेत प्रवास करावा लागणार नाही. येत्या १३ ते २२ फेब्रुवारी या काळात रेल्वेने मुंबई-मडगावदरम्यान विशेष ‘वन स्टॉप’ सुपरफास्ट एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतल्याने कोकणवासियांचा आणि पर्यटकांचा प्रवास आरामदायी होण्यास मदत होणार आहे. कोकणकन्या एक्स्प्रेसवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रयोग यशस्वी ठरल्यास ही विशेष गाडी कायमस्वरुपी चालविली जाण्याची दाट शक्यता रेल्वे सूत्रांनी वर्तविली आहे.

म्हाडा अनामत रकमेवर व्याज देणार!
अर्ज स्वीकृतीला ११ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई, ६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

म्हाडाच्या मुंबईतील सुमारे तीन हजार ८६३ घरांना लोकांकडून मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहून या घरांसाठी अर्ज दाखल करावयाच्या मुदतीत ११ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय येत्या तीन महिन्यांत म्हाडाच्या घरांसाठी सोडत न काढली गेल्यास त्यानंतर होणाऱ्या विलंबासाठी अनामत रकमेवर व्याज देण्याची शिफारसही करण्यात आली आहे. प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर ही शिफारस अमलात येणार असली तरी ही औपचारिकता असते, असे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत तीन लाख ७७ हजार ८१९ अर्ज सादर झाले आहेत. आता मुदतवाढ दिल्यामुळे ही संख्या पाच लाखांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आता ११ फेब्रुवारीपर्यंत फक्त अर्ज स्वीकृत केले जाणार आहे. अर्ज विक्री बंद करण्यात आल्याचे मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी एच. के. जावळे यांनी सांगितले. यापूर्वीही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारीवरून ७ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली होती. आज दिवसभरात ३८ हजार ९३५ अर्ज सादर झाले. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मुदत वाढविण्याचा निर्णय मुंबई मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय येत्या तीन महिन्यांत या घरांसाठी सोडत न काढली गेल्यास अनामत रकमेवर बचत खात्याच्या दराने व्याज देण्यात यावे, अशी शिफारस मुंबई मंडळामार्फत प्राधिकरणाला करण्यात आली. या निर्णयाला प्राधिकरणाने मंजुरी देणे व ती शासनाच्या मंजुरीसाठी पाठविणे ही निव्वळ औपचारिकता असल्यामुळे लोकांना आता त्यांनी भरलेल्या अनामत रकमेवर तीन महिन्यांनंतर व्याजही मिळणार आहे.

वाजपेयी व्हेन्टिलेटरवर
नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी / पी.टी.आय.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्वास घेण्यास अत्याधिक त्रास होऊ लागल्याने त्यांना आज कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले. त्यांच्या श्वासनलिकेतील संसर्ग आज सकाळपासून अधिक वाढल्याने त्यांना श्वास घेणे कठीण झाले. त्यामुळे त्यांना कृत्रिम श्वसन यंत्राचा आधार देण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला, अशी माहिती अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेच्या डॉ. संपतकुमार यांनी सायंकाळी दिली. ८४ वर्षांच्या वाजपेयींवर अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेच्या अतिदक्षता विभागात गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू आहेत. त्यांच्या छातीतील कफ वाढतच चालला असला तरी रक्तदाब, यकृत आणि किडनीचे कार्य सामान्य आहे.

उत्तर मुंबईतून काँग्रेसची उमेदवारी मिळविण्याचे राज बब्बर यांचे प्रयत्न
मुंबई, ६ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

निवडून गेल्यानंतर गेली पाच वर्षे मतदारसंघाकडे पाठ फिरवलेल्या गोविंदा यांच्याबाबतचा अनुभव फारसा चांगला नसतानाच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रसिद्ध अभिनेते व सध्या उत्तर प्रदेशमधील आगरा मतदारसंघाचे खासदार असलेल्या राज बब्बर यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा काँग्रेसच्या नेत्यांजवळ व्यक्त केली आहे. अर्थात त्यांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी स्पष्ट केले आहे. नव्या रचनेत आगरा मतदारसंघाची विभाजन झाले आहे. त्यातच राज बब्बर यांचे समाजवादी पार्टीच्या नेत्यांशी बिनसले आहे. तेथे उमेदवारी मिळणे कठीण असल्याने त्यांचे लक्ष मुंबईवर गेले आहे. उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याची माहिती कृपाशंकर सिंग यांनी दिली. याबरोबरच प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते रवीकिशन यांचीही लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे.
मुंबईतील एका जागेवर राष्ट्रवादीने दावा केला असला तरी कोणती जागा सोडायची याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचेही कृपाशंकर सिंग यांनी स्पष्ट केले आहे.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८