Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

राज यांचे ‘बॅक टू बेसिक्स’
संदीप आचार्य
मुंबई, ६ फेब्रुवारी

 

ठाणे लोकसभा मतदार संघातील उपविभागाअध्यक्षांपासून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नवी मुंबई येथील बंद सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. ठाणे येथील प्रचंड जाहीर सभेनंतरही मनसेच्या ठाण्यातील दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला तर आणखीही काही पदाधिकारी जाण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या वर्षभरात मनसेतून अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्या प्रत्येक वेळी कोणी गेले तरी मला त्याची पर्वा नाही. दोनजण जरी माझ्याबरोबर शिल्लक राहिले तरी त्याचे मी दोन लाख करू शकतो, असा दुर्दम्य आत्मविश्वास राज ठाकरे वेळोवेळी व्यक्त करीत असले तरी ठाणे शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमधील सुंदोपसुंदीमुळे लोकसभेच्या चार जागांपैकी एका जागी तरी अनामत रक्कम वाचविणे शक्य होणार आहे का, हा प्रश्न आज पक्षासमोर निर्माण झाला आहे. मुंबई व ठाणे हे मनसेसाठी अत्यंत महत्वाचे असून या दोन्ही ठिकाणी पक्षबांधणीबाबत आनंदीआनंदच असल्याचे चित्र आहे. पक्षबांधणीसाठी ऑगस्टमध्ये आयोजित एका मेळाव्यात गटाध्यक्ष व इमारत प्रतिनिधींपर्यंत बांधणी करण्याचे व त्याबाबतच्या याद्या सादर करण्याचे आदेश राज यांनी दिले होते. मात्र मुंबईतील काही सरचिटणीस व विभाग अध्यक्ष हे ‘साहेब’ बनून गटबाजीचे ‘राजकारण’ करत असल्यामुळे लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना बांधणीच्या बाबतीत आनंदी आनंद असल्याचे पक्षातील काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शाखाप्रमुखांपासून तळातील कार्यकर्ते ‘मनसे’ काम करत असताना त्यांना चालना देण्यासाठी व मार्गदर्शनासाठी शाखा शाखांवर किती वेळा सरचिटणीस गेले आहेत, असा सवाल करण्यात येत आहे. पक्ष नवीन असल्यामुळे आणि लोकसभेसाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण मिळणे आवश्यक असताना काही अपवाद वगळता किती सरचिटणीस व विभाग अध्यक्ष यादृष्टीने काम करत आहेत, असाही मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत चमत्कार घडेल, असा आशावाद राज यांनी व्यक्त केला असला तरी मधल्या फळीतील ‘साहेबां’च्या स्वभावात बदल झाल्याशिवाय असा चमत्कार घडणे अशक्य आहे. या साऱ्याच्या परिणामी पक्षस्थापनेवेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जे मुद्दे राज मांडत होते तेच मुद्दे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मांडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसेचे अस्तित्वही मान्य करण्यासाठी आज काँग्रेस-राष्ट्रवादी तयार नाही. शिवसेना-भाजपतील काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार मुंबई व ठाण्यातही मनसेमुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही. गेल्या लोकसभेत मुंबईत केवळ सेनेचाच खासदार निवडून आला होता. यावेळी आमचे किमान तीन खासदार निवडून येतील, असा विश्वास सेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला तर चौथा खासदारही निवडून येईल, असा विश्वास भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मनसेचे काही सरचिटणीस स्वत:च्या प्रसिद्धीची काळजी घेण्यात गर्क असून दूरचित्रवाहिन्यांवर मुलाखती व लेख लिहिण्यात गर्क आहेत तर काही ‘अर्थपूर्ण राजकारण’ करण्यात गुंतून पडले आहेत परिणामी राज यांना अपेक्षित असलेली पक्षबांधणी करण्यासाठी या मंडळींकडे वेळच शिल्लक नाही. हे कमी ठरावे म्हणून की काय, विभाग अध्यक्षापासून प्रत्येकजण आपली छबी पोस्टरवर येते की नाही, आमंत्रण मिळते की नाही यासाठी भांडणे करण्यात व्यग्र असल्यामुळे मनसेवर ‘बे एक बे’चा पाढा पुन्हा म्हणण्याची वेळ आल्याचे पक्षातील काही ज्येष्ठांचे म्हणणे आहे.