Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

प. महाराष्ट्र राखण्यावर शरद पवारांचा भर
मुंबई, ६ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

 

प. महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला असल्याने तेथील सर्व वाद मिटवून कार्यकर्त्यांना निवडणुकीला तयार करण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी आज केला.
पवारांना महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत. मात्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाच्या यशावर परिणाम होऊ शकतो. यामुळेच पवारांनी कोल्हापूर, हातकणंगले, माढा, सातारा, सांगली मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. पश्चिम महाराष्ट्राचा गड राखतानाच मुस्लिम मतांवर डोळा ठेवून पवारांनी आज मुंबईत उलेमांची भेट घेतली. जागावाटपाबाबत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबद्दल पवारांनी राज्यातील नेत्यांशी चर्चा केली.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर वाद आहेत. विद्यमान खासदार सदाशिव मंडलिक विरुद्ध नगरविकास राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील वादाने सीमा गाठली आहे. अनेकदा प्रयत्न करूनही वाद आटोक्यात येऊ शकलेला नाही. मंडलिक यांनी मध्यंतरी पवारांवर तोफ डागली होती. या पाश्र्वभूमीवर यंदा मंडलिक यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मतदारसंघात मंडलिक यांच्याबरोबरच विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर, माजी मंत्री दिग्विजय खानविलकर व धनंजय महाडिक हे इच्छुक आहेत. विधानसभा मतदारसंघ नव्या रचनेत गायब झाल्याने कुपेकर यांना लोकसभेचे वेध लागले आहेत. धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांना उमेदवारीचे आश्वासन देऊन राष्ट्रवादीत दाखल करून घेण्यात आले आहे. पवारांनी जिल्ह्य़ाचा आढावा घेतल्यानंतर रात्री चारही इच्छुकांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. कोणत्याही स्थितीत कोल्हापूर मतदारसंघ कायम राखला गेला पाहिजे अशी तंबी पवारांनी सर्व नेत्यांना दिली.
माढा मतदारसंघातून ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र विजयदादा नवी दिल्लीत जाण्यास फारसे इच्छुक नाहीत. विजयदादांनी आपले पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे नाव सुचविले आहे. या मतदारसंघात जलसंपदामंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांचेही नाव चर्चेत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ कायम ठेवण्याचे आव्हान राष्ट्रवादीपुढे आहे. कराड मतदारसंघ नव्या रचनेत राहिलेला नाही. त्यामुळे कराडचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे साताऱ्याकडे लक्ष आहे. शिवाय साताऱ्याचे विद्यमान खासदार लक्ष्मण पाटील हे सुद्धा इच्छुक आहेत. साताऱ्यातून राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे उदयनराजे भोसले यांनी जाहीर केल्याने राष्ट्रवादीलाही तगडा उमेदवार उभा करावा लागेल. त्यामुळे राजघराण्यातीलच रामराजे नाईक-निंबाळकर यांचा साताऱ्याकरिता विचार होऊ शकतो. हातकणंगले म्हणजेच सध्याच्या इचलकंरजी मतदारसंघाच्या खासदार निवेदिता माने यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या पाश्र्वभूमीवर निवेदिताताईंनी आज मोठय़ा प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केले. त्यांनाच उमेदवारी द्यावी म्हणून पक्षाच्या मुख्यालाबाहेर मोठा फलक लावण्यात आला होता. तसेच त्यांचे समर्थकही मोठय़ा संख्येने तेथे उपस्थित होते. काँग्रेसला शह देण्याकरिता राष्ट्रवादीने सांगली मतदारसंघावर दावा करण्याचे ठरविले आहे. सांगलीची जागा १९६७ पासून काँग्रेस जिंकत आली आहे. तरीही दबावाचा भाग म्हणून सांगलीवर दावा करण्याचे ठरले आहे.