Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

भारतीय खेळाडू नाराज
मुंबई, ६ फेब्रुवारी / विशेष प्रतिनिधी

 

केविन पीटरसन, अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफ, यांच्यासह अन्य आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना लिलावात वारेमाप किमतीत विकत घेतल्याबद्दल आयपीएलमधील भारतीय क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रामुख्याने विविध संघाचे ‘आयकॉन’ असणाऱ्या खेळाडूंपेक्षाही पीटरसन, फ्लिन्टॉफ यांना अधिक पैसे मिळणार आहेत. भारतीय क्रिकेटपटूंच्या मते, ‘आयपीएल’ला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे तो आमच्या प्रतिमेमुळे, आमच्या खेळामुळे. ज्या इंग्लंड संघाला आम्ही धोपटून काढले त्याच संघांच्या पीटरसन, फ्लिन्टॉफ, बोपारा, ओवेस शहा, कॉलिंगवूड यांच्यासारख्या खेळाडूंना मोठय़ा किमतीत विकत घेण्यात आल्याबद्दल भारतीय खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
खरं तर आयपीएलच्या दुसऱ्या पर्वाच्या बोलीची प्राथमिक किंमत भारतीय क्रिकेट बोर्ड आणि आयपीएल यांनी संयुक्तरीत्या ठरविली होती. त्या किमतीवर बोली वाढत गेली. मात्र पीटरसन, फ्लिन्टॉफ, बोपारा यांच्या किमती वाढण्याइतपत त्यांचा खेळ होत आहे का? हा प्रश्न आहे. नेमक्या याच प्रश्नाने भारतीय खेळाडूंनाही सतावले आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला मिळालेली रक्कम सुमारे ६ कोटी आहे. त्याच्या हाताखाली खेळणाऱ्या फ्लिन्टॉफला मात्र सुमारे साडेसात कोटी रुपये वर्षांला मिळणार आहेत. चेन्नई सुपरकिंग्जचे मालक आहेत एन. श्रीनिवासन जे भारतीय क्रिकेट बोर्डाचे सरचिटणीसही आहेत. फ्लिन्टॉफला घेण्याबाबत त्यांनी धोनीशी निश्चितच चर्चा केली असणार, मात्र बोलीच्या या चढत्या कमानीबाबत धोनीला कल्पना दिली गेली नसणार. सेहवागच्या दिल्ली आणि युवराजच्या पंजाब संघाबाबतही तीच परिस्थिती असावी. विजय मल्ल्या यांच्या बंगलोर संघाने गतसाली फारशी प्रभावी कामगिरी केली नव्हती. संपूर्ण संघच ते यंदा विकणार अशीही आवई उठली होती. मात्र आज खरेदीच्या बाजारात मल्ल्या जातीने हजर राहिले. आश्चर्याची गोष्ट अशी, की बंगलोर संघाचा आयकॉन राहुल द्रविड या वेळी त्यांच्यासोबत नव्हता. मल्ल्यांनी पीटरसनला साडेसात कोटींना विकत घेतले ही गोष्ट त्यामुळे बऱ्याच जणांना लागली. गोऱ्या खेळाडूंच्या योग्यतेपेक्षा अधिक बोली लावण्याच्या प्रकाराबाबत त्यामुळे सर्वच प्रमुख खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. या परदेशी खेळाडूंच्या संघातील दुही पसरविण्याच्या कृतीमुळेही काही खेळाडू नाराज आहेत. ऑस्ट्रेलियाच्या गिलख्रिस्टने हैदराबाद संघातून व्ही. व्ही. एस. लक्ष्मणचा काटा काढल्यामुळे अन्य भारतीय खेळाडू आधीच नाराज झाले होते. धोनी, सेहवाग, युवराज आदी कर्णधारांची भावना आहे, की आयपीएल आमचे आहे. या स्पर्धेचे पुरस्कर्ते आमचे आहेत. ‘फॅन्चायझी’ आमच्या आहेत. स्पर्धेचे हीरो आमचे आहेत, असे असताना काही परदेशी खेळाडूंना त्यांनी त्यांची उपयुक्तता सिद्ध करण्याआधीच एवढी किंमत का दिली जाते?
मात्र या विरुद्ध ज्येष्ठ भारतीय खेळाडू काहीच करू शकत नाहीत. त्यांच्या मनात सध्या असंतोष धुमसत आहे. त्याचे पडसाद मैदानावर उमटणार का? हा प्रश्न आहे. आगामी न्यूझीलंड दौऱ्यातही या असंतोषाचे पडसाद उमटतील, अशीही शंका आहे. मात्र क्रिकेटचे सर्वोच्चपद पटकावायला निघालेल्या भारतीय संघाच्या मोहिमेला या लिलावाने अडसर निर्माण केला आहे एवढे मात्र निश्चित.