Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

पुन्हा मनमोहनच!
सोनिया गांधी यांचे संकेत
नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

 

पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांच्या नावावरून प्रतिस्पर्धीभाजप-रालोआच्या गोटात अनुत्साह व नाराजी दिसत असतानाच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सत्ताधारी युपीएमध्ये मात्र वर्तमानातच काय, भविष्यात पंतप्रधानपदाची खुर्ची रिक्त नसल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिले आहे. नुकत्याच झालेल्या बायपास सर्जरीनंतर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हेच पुढची अनेक वर्षे पक्षाचे व देशाचे नेतृत्व करीत राहतील, असे सोनिया गांधी यांनी काँग्रेस संदेशच्या फेब्रुवारीच्या अंकात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर प्रजासत्ताक दिनापूर्वी झालेल्या बायपास सर्जरीनंतर आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असतील यावर सुरु असलेली उरलीसुरली चर्चाही सोनिया गांधी यांच्या या विधानामुळे संपुष्टात आली आहे. डॉ. मनमोहन सिंग हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे सोनिया गांधींनी गेल्यावर्षी १५ ऑगस्टलाही म्हटले होते. तरीही काँग्रेस पक्षातील तसेच युपीएच्या घटक पक्षांतील अनेक नेते पंतप्रधानपदाचे दावेदार होऊ इच्छित आहेत. पक्षातील अन्य नेत्यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची चिंता करण्याची गरज नाही, असा ‘संदेश’ सोनियांनी संभाव्य इच्छुकांना दिला आहे. गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेसप्रणित युपीए सरकारचे समर्थपणे नेतृत्व केल्याबद्दल मनमोहन सिंग यांची सोनिया गांधींनी भरपूर प्रशंसा केली असून त्यांचे नेतृत्व तरुणांना प्रेरणादायी ठरेल, अशी आशा व्यक्त केली आहे.