Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

अमेरिकेत दोन महिन्यांत अकरा लाखाहून अधिक बेकार
३४ वर्षांतील सर्वात विपरित स्थिती
न्यूयॉर्क, ६ फेब्रुवारी/वृत्तसंस्था

 

जागतिक मंदीच्या तडाख्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था डळमळीत झाली असून त्याच्या परिणामी गेल्या जानेवारी महिन्यामध्ये ५ लाख ९८ हजार जणांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तर गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये ५ लाख २४ हजार जणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. म्हणजे गेल्या दोन महिन्यांत अमेरिकेत ११ लाख २३ हजार जण बेकारीच्या खाईत लोटले गेले.
१९७४ साली अमेरिकेत मोठय़ा प्रमाणावर नोकरकपात झाली होती. त्यानंतर गेल्या ३४ वर्षांमध्ये अमेरिकेत इतक्या मोठय़ा प्रमाणावर आता पहिल्यांदाच नोकरकपात झाली आहे. आता त्यानंतर इतक्या अमेरिकेत गेल्या तीन महिन्यांमध्ये १.८ दशलक्ष जण बेकारीच्या खाईत लोटले गेले आहेत. तर गेल्या वर्षीच्या प्रारंभीपासून अमेरिकेत ३.६ दशलक्ष लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. गेल्या जानेवारी महिन्यात ५ लाख ४० हजार लोकांच्या नोकऱ्या जातील असा अंदाज ब्रिफिंग डॉट कॉमने व्यक्त केला होता. पण या अंदाजापेक्षा विपरित स्थिती अमेरिकेत सध्या निर्माण झाली आहे.
अमेरिकेमध्ये बेकारीचा निर्देशांक ७.५ टक्के इतका असेल असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र त्यापेक्षाही कठीण काळ अमेरिकी नागरिकांच्या वाटय़ाला आला आहे. एकीकडे मोठय़ा प्रमाणावर नोकरकपात होत असताना लोकांना नवीन नोकऱ्या मिळणेही दुरापास्त झाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अमेरिकेतील २.६ दशलक्ष लोकांच्या हातांना कामच नाही. १९८३ नंतर पहिल्यांदाच लोकांच्या हाताना बराच काळ काम मिळालेले नाही अशी स्थिती सध्या उद्भवली आहे. अर्धवेळ काम करणारे पूर्णवेळ नोकऱ्यांच्या शोधात असून अशा लोकांची टक्केवारी १३.५ वरून १३.९ टक्क्यांवर गेली आहे. गेल्या जानेवारी महिन्यामध्ये मायक्रोसॉफ्ट, बोईंग, कॅटरपिलर, होम डेपो, स्टारबक्स यासारख्या बडय़ा अमेरिकी कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणावर नोकरकपात केली आहे. गेल्या जानेवारी महिन्यात उत्पादन क्षेत्रात २ लाख ७ हजार जणांची नोकरकपात झाली तर बांधकाम क्षेत्रातील १ लाख १० हजार, व्यवसाय व प्रोफेशनल सव्‍‌र्हिसेस कंपन्यांमधील १ लाख २१ हजार लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. रिटेलर क्षेत्रातील ४५ हजार जणांना तर हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील २८ हजार लोकांना बेकार व्हावे लागले आहे.