Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

नाटय़संमेलनात मंत्र्यांची मांदियाळी!
मुंबई, ६ फेब्रुवारी/नाटय़ प्रतिनिधी

 

बीड येथे १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या ८९ व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाचा उद्घाटन सोहळा आणि सांगता सोहळ्यात आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री तसेच राज्याचे मंत्री मिळून दोन्ही कार्यक्रमांत प्रत्येकी डझनभर मंत्री व्यासपीठावर हजेरी लावणार आहेत. त्यामुळे हे नाटय़संमेलन आहे की, राजकीय संमेलन, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. लोकसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा नारळच जणू या संमेलनात फुटणार, असंच चित्र आहे.
काल यशवंत नाटय़संकुलात नाटय़संमेलनातील कार्यक्रमांचा तपशील सांगण्यासाठी नाटय़संमेलनाचे कार्याध्यक्ष व बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकार परिषद घेतली; यावेळी वरील बाब स्पष्ट झाली. संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार असून, यावेळी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व प्रफुल्ल पटेल, राज्य मंत्रिमंडळातील जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, बबनराव पाचपुते, हर्षवर्धन पाटील, डॉ. विमला मुंदडा, सुरेश वरपूडकर हे मंत्रीगण उपस्थित राहणार आहेत. तर सांगता सोहळ्यास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, भाजपा नेते गोपीनाथ मुंडे, राज्याचे मंत्री सुनील तटकरे, हर्षवर्धन पाटील, बबनराव पाचपुते, डॉ. विमल मुंदडा, राजेश टोपे, राणा जगजितसिंह पाटील, सुरेश वरपूडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. जयदत्त क्षीरसागर हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, विद्यमान नाटय़संमेलनाध्यक्ष रमेश देव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनात नवे नाटय़संमेलनाध्यक्ष रामदास कामत अध्यक्षीय सूत्रे स्वीकारतील.
बीड जिल्ह्य़ातील कलावंतांना व्यासपीठ मिळावं म्हणून ५ ते १३ फेब्रुवारीपर्यंत संगीत, नृत्य, नाटय़, एकपात्री कार्यक्रम आदींच्या या योजनातून विविध कलांचा जागर करण्यात येणार आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर उद्घाटन सोहळ्यात शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी डॉ. दीपा क्षीरसागर संयोजित देशभक्तीपर नृत्यदर्शनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. नाटय़संमेलनातील मुख्य कार्यक्रम कै. केशरबाई क्षीरसागर नाटय़नगरीतील आद्यकवी मुकुंदराज रंगमंचावर होणार आहेत, तर यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, के. एस. के. महाविद्यालय येथील अन्य मंचांवरही मनोरंजनासह प्रबोधनकार कार्यक्रम सादर होतील.
उद्घाटन सोहळ्यास अभिनेते मकरंद अनासपुरे आणि श्रेयस तळपदे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर दिलीप प्रभावळकर, भार्गवी चिरमुले आणि नृत्यांगना संयोगिता पाटील यांच्या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा खास सत्कार करण्यात येणार आहे. ई टीव्हीवरील ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ हा कार्यक्रमही संमेलनात सादर होणार आहे. त्याचप्रमाणे बालनाटय़ प्रशिक्षण शिबीरही यानिमित्तानं आयोजित करण्यात येणार आहे.