Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

गोव्यासाठी मुंबईहून ‘वन स्टॉप’ सुपरफास्ट एक्स्प्रेस
मुंबई, ६ फेब्रवारी / प्रतिनिधी

 

मुंबईहून ओव्हरनाईट प्रवास करून वीकेण्डनिमित्त गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना आणि कोकणात जाणाऱ्या प्रवासांना आता कोकणकन्या एक्स्प्रेसने अवघडलेल्या अवस्थेत प्रवास करावा लागणार नाही. येत्या १३ ते २२ फेब्रुवारी या काळात रेल्वेने मुंबई-मडगावदरम्यान विशेष ‘वन स्टॉप’ सुपरफास्ट एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतल्याने कोकणवासियांचा आणि पर्यटकांचा प्रवास आरामदायी होण्यास मदत होणार आहे. कोकणकन्या एक्स्प्रेसवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रयोग यशस्वी ठरल्यास ही विशेष गाडी कायमस्वरुपी चालविली जाण्याची दाट शक्यता रेल्वे सूत्रांनी वर्तविली आहे. मुंबईहून वीकेण्ड साजरा करण्यासाठी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी अथवा शनिवारी रात्री मुंबईहून निघायचे. दोन-तीन दिवस गोव्यातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्यायचा आणि मुंबईला परतायचे असा कार्यक्रम बहुतांश पर्यटकांकडून आखला जातो. ओव्हरनाईट प्रवासासाठी बहुतांश पर्यटक रात्री मुंबईहून निघून सकाळी गोव्यात पोहोचविणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसला पसंती दर्शवितात. त्याचप्रमाणे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनाही ही गाडी सर्वाधिक सोयीस्कर वाटते. परिणामी दररोज कोकणकन्या एक्स्प्रेसला वर्षांच्या बारामाही तोबा गर्दी असते आणि वीकेण्डला परिस्थिती अधिक बिकट असते. या पाश्र्वभूमीवर कोकणकन्या एक्स्प्रेसवरील ताण कमी करण्यासाठी ही विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेस चालविण्याचा प्रयोग रेल्वेकडून करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गोव्यासाठी चालविण्यात येणारी विशेष गाडी १३ ते २२ फेब्रुवारी या काळात दर शुक्रवारी-शनिवारी सीएसटीहून आणि दर शनिवार-रविवार मडगावहून चालविली जाणार आहे. ही गाडी कोकणकन्या एक्स्प्रेसच्या सुमारे पाऊण तास आधी म्हणजे १०.१५ वाजता सीएसटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.०५ वाजता मडगावला पोहोचेल. या गाडीच्या परतीच्या प्रवासाच्या वेळा मात्र शनिवारी व रविवारी वेगवेगळ्या आहेत. शनिवारी सकाळी ८.४५ वाजता आणि रविवारी रात्री १९.१० वाजता मडगावहून निघून अनुक्रमे सायंकाळी १७.३५ आणि पहाटे ४.०५ वाजता सीएसटीला पोहोचतील. तीन वातानुकूलित आणि आठ स्लीपर्स क्लासचे डबे असणारी ही १५ डब्यांची गाडी दोन्ही दिशांच्या प्रवासात केवळ ठाणे स्थानकात थांबेल आणि मुंबई-मडगावदरम्यानचे अंतर केवळ आठ तास ५० मिनिटांत गाठेल. परिणामी पर्यटकांचे सुमारे साडेचार तास वाचतील.