Leading International Marathi News Daily

शनिवार, ७ फेब्रुवारी २००९

प्रादेशिक

हायकोर्ट जजेसची ‘ई-लायब्ररी’ आता सामान्यांनाही उपलब्ध
मुंबई, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयातील ‘जजेस लायब्ररी’मधील माहितीचा खजिना आता न्यायालयाच्या वेबसाइटवर सुरू करण्यात आलेल्या ‘ई-लायब्ररी’ या वेबपेजव्दारे वकीलवर्गाबरोबरच इंटरनेटची सोय असलेल्या सर्वसामान्यांनाही उपलब्ध झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या http:hcbom.mah.nic.in या वेबसाईटवर जाऊन ‘ई लायब्ररी’वर क्लिक केल्यास आपण उच्च न्यायालयाच्या इमारतीत न जाताही तेथील जजेस लायब्ररीमध्ये असलेल्या नानानिध ग्रंथांपर्यंत पोहोचू शकाल.

ठाणे न्यायालयात न्यायमूर्तीवरच आरोप
फिर्यादींना अटक
ठाणे, ६ फेब्रुवारी / प्रतिनिधी
ग्रामपंचायत सदस्याच्या खुनाच्या आरोपातून ठाणे जलदगती न्यायालयाचे न्या. जी. डी. शिरवाडकर यांनी आज १८ आरोपींची निदरेष मुक्तता केल्याने संतप्त झालेल्या फिर्यादी आणि त्याच्या नातेवाईकांनी न्यायालयातच न्यायमूर्तीवर आरोप करून गोंधळ घातला. ठाण्यातील न्यायमूर्ती बच्छाव यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर न्या. शिरवाडकर यांच्या विरोधात ठाणे जिल्हा न्यायाधिशांकडे तक्रार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ठाण्यातील अनधिकृत बांधकामांची होणार सीआयडी चौकशी
ठाणे, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयात असतानाही शहरातील अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरू आहे. त्यामुळे ही बांधकामे कोणामुळे होतात आणि त्याला कोण अभय देते, याची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय आज सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

व्हीआयपींच्या सुरक्षेवर पोलिसांचा भत्ता कुर्बान!
सोपान बोंगाणे
ठाणे, ६ फेब्रुवारी

राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार अशासारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची अहोरात्र काळजी वाहणाऱ्या विशेष सुरक्षा विभागातील (एसपीयू) जवानांना त्यांचे विविध भत्ते व इतर कायदेशीर हक्कांच्या सोयीसवलतींपासून मात्र वंचित ठेवण्यात येत आहे.

मराठा समाजाला राखीव जागा देताना मुस्लिमांचाही विचार व्हावा - शरद पवार
मुस्लिमांच्या सभेतील पवारांच्या उपस्थितीने राजकीय खळबळ
मुंबई, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी
सध्या राज्यात गरीब मराठा समाजाला शैक्षणिक व नोकऱ्यांमध्ये राखीव जागा देण्याबाबत विचार होत आहे. केंद्र सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती सच्चर आयोगाचा अहवाल पाहिला असता शैक्षणिक, आर्थिक सगळ्याच क्षेत्रामध्ये मुस्लिम मागासलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच मराठा समाजाला राखीव जागा देतानाच मुस्लिम समाजाचाही विचार व्हावा, असे प्रतिपादन आज केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

‘अनामी रॉयप्रकरणी फक्त राष्ट्रवादीवर दोषारोप करणे चुकीचे’
मुंबई, ६ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

अनामी रॉय यांची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय संयुक्त सरकारचा होता. त्यामुळे या प्रकरणी फक्त राष्ट्रवादीवर दोषारोप करणे चुकीचे ठरेल, असे मत गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज व्यक्त केले. तसेच व्हॅलेंटाईन डे ला शिवसेना व अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला असला तरी कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही, असा इशारा देतानाच यासाठी पूर्ण संरक्षण दिले जाईल, अशी ग्वाहीही दिली. अनामी रॉय यांच्या संदर्भातील उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत आजच प्राप्त झाली आहे. याबाबत सरकार पातळीवर अभ्यास करण्यात येत आहे. सर्व संबंधितांशी चर्चा करून मगच सर्वोच्च न्यायालयात जायचे की अन्य पर्यायांचा विचार करायचा याचा निर्णय घेतला जाईल, असेही पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रॉय यांची नियुक्ती करण्याचा निर्णय संयुक्त सरकारचा होता, असे सांगून अप्रत्यक्षपणे काँग्रेसलाही या वादात ओढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. व्हॅलेंटाईन डेला विरोध करण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असा इशाराही पाटील यांनी दिला. कायद्याचे राज्य असून, कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

कामगार भवनाचे सोमवारी उद्घाटन
मुंबई, ६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा, कामगार विभागाच्या अधिपत्याखालील कामगार आयुक्त, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे संचालक बाप्पके व धूम्र उपद्रव विभाग संचालक यांची कार्यालये असलेल्या ‘कामगार भवन’ या इमारतीचे उद्घाटन कामगारमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील सी-ब्लॉकमधील या इमारतीचा उद्घाटन सोहळा ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी राज्यमंत्री नितीन राऊत, सन्माननीय अतिथी म्हणून राज्यमंत्री सुरेश शेट्टी उपस्थित राहणार असून खासदार प्रिया दत्त, आमदार जनार्दन चांदूरकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास कामगार, मालक, त्यांच्या संघटना व संबधित वकीलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कामगार विभागाच्या सचिव कविता गुप्ता यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

अनामी रॉय रजेवर?
मुंबई, ६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

येत्या चार आठवडय़ात राज्याच्या नव्या महासंचालकाची नियुक्ती करण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर विद्यमान महासंचालक अनामी रॉय यांनी आज रजेचा अर्ज राज्याच्या गृहखात्याकडे सादर केल्याचे कळते. त्यांचा हा अर्ज मंजूर झाला किंवा नाही हे कळू शकलेले नाही. रॉय यांनी राजीनामा दिला अशी आज दिवसभर चर्चा होती. मात्र रात्री उशिरापर्यंत रॉय यांनी राजीनामा दिला नव्हता, असे कळते.

आमदार कीर्तिकर यांचे साह्य
मुंबई, ६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

महाड येथील शिवसेना मेळाव्याहून परतताना अपघाती मृत्यू आलेल्या दोन शिवसैनिकांच्या आप्तांना आमदार गजानन कीर्तिकर यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ केली.
२८ जानेवारी रोजीच्या मेळाव्याहून परतताना माणगाव-तिलोरे येथे जीपचा टायर फुटून झालेल्या दुचाकीच्या अपघातात बाळू बैलमारे व मधुकर वाघोळे यांचे निधन झाले. आमदार कीर्तिकर, आमदार देवेंद्र साटम, आमदार तुकाराम सुर्वे इत्यादींनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

‘किंगफिशर’ वैमानिकांच्या भत्त्यात ८० हजारांची कपात
मुंबई, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत क्रिकेटपटूंना आकर्षिण्यासाठी कोटी-कोटी डॉलरच्या बोली लावणारे विजय मल्ल्या आर्थिक मंदीचे कारण देत आपल्या ‘किंगफिशर एअरलाइन्स’मधील वैमानिकांच्या भत्त्यांमध्ये मात्र घसघशीत कपात करीत आहेत. किंगफिशरच्या वैमानिकांना आजवर मिळत असलेले दरमहा ४.३० लाख रुपयांचे वेतनमान नव्या कपातीनंतर ३.५० लाख रुपयांवर घसरले आहे. ही कपात ‘डेक्कन-किंगफिशर’ विलिनीकरणात निश्चित केल्या पॅकेज प्रारूपानुसारच असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. मात्र या कपातीने एकंदर वैमानिक समूहात मोठय़ा असंतोषाला तोंड फुटण्याचे संकेत मिळत आहेत.