Leading International Marathi News Daily

शनिवार, ७ फेब्रुवारी २००९

वर्दीतील पक्षीमित्र!
प्राजक्ता कदम

शहरातील एखाद्या झाडावर कावळा किंवा कबुतर अडकले तर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन त्याची सुटका करतात, हे दृश्य मुंबईकरांसाठी नवीन नाही. हा त्यांच्या सेवेचाच एक भाग आहे. पण कर्तव्यावर असताना आणि तेही २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर कडेकोट बंदोबस्तामुळे उसंत नसलेला एक पोलीस हवालदार एका जखमी घारीची पोटच्या मुलासारखी काळजी घेतानाचा अनुभव शुक्रवारी मुंबईकरांना पाहायला मिळाला. या निमित्ताने मुंबईकरांना पोलीस आयुक्तालयात कठोर कर्तव्यदक्ष ‘वर्दीतील पक्षीप्रेमा’ची एक अनोखी झलक पाहायला मिळाली..

इस्रो आणि नेहरु केंद्रातर्फे ‘वॉटर रॉकेट मेकिंग आणि लॉन्चिंग’ स्पर्धा
प्रतिनिधी

शालेय विद्यार्थ्यांमध्ये रॉकेटबद्दल प्रंचड उत्सुकता असते. रॉकेट कसे तयार होते, ते पृथ्वीच्या कक्षेबाहेर कसे जातात, अशा एक ना अनेक प्रश्नांनी त्यांच्या मनात घर केलेले असते. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि त्यांना रॉकेटचे प्राथमिक ज्ञान मिळावे यासाठी मुंबईत विद्यार्थ्यांच्या सहभागाने एक अभिनव प्रयत्न करण्यात येणार आहे. ‘इस्रो’ आणि नेहरु केंद्राच्या वतीने ‘वॉटर रॉकेट मेकिंग अ‍ॅण्ड लॉन्चिंग’ या आंतरशालेय स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

६ फेब्रुवारी
आजकाल कॅन्टिन खूप सुने सुने असते. वर्षभराच्या अभ्यासाप्रमाणेच वर्षभराच्या प्रेझेंटीज आता भरून काढल्या जातात. त्यामुळे झाडून सर्वजण लेक्चरला बसतात. पास व्हायला ३५ टक्के चालतात, पण अटेन्डन्स मात्र ७५ टक्के हवी. बहोत नाईन्साफी हैं. किती लेक्चर्स बसायची, किती बंक करायची याचे गणित वर्षांच्या सुरुवातीलाच मांडले होते. पण लालच बुरी बला हैं. त्यामुळे ‘नंतर भरून काढू’, असे म्हणत म्हणत बरीच लेक्चर्स बंक केली. आता भोगा. ‘लॉ’ची मिस ‘ब्रिच ऑफ कॉन्ट्रॅक्ट’ची व्याख्या सांगत होती. एखादे वाक्य किती मोठे असावे? सर्वात मोठी व्याख्या म्हणून ‘गिनिज बूक’ किंवा गेलाबाजार ‘लिम्का बूक’मध्ये नोंद करायला हरकत नाही, असो.

मनविसेच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेला उत्तम प्रतिसाद
प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने दहावीच्या पूर्वतयारीसाठी पाटीदार समाज हॉल, नॅन्सी कॉलनी, एस. टी. डेपो, बोरिवली पूर्व येथे भव्य व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेत दहावीच्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे सरचिटणीस प्रवीण दरेकर, प्रमुख संघटक संजय घाडी, उपाध्यक्षा संजना घाडी, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य प्रकाश दरेकर आदी उपस्थित होते.

भारताला यंदा ग्रॅमी मिळणार?
संगीतातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखले जाणारे ‘ग्रॅमी’ पुरस्कार घोषित होतात, तेव्हा भारतीयांना त्यात आपल्या देशातील नामांकनासाठी असलेलं नाव मागे पडल्याचं चित्रच नेहमी पाहायला मिळतं. आशा भोसले यादेखील पुरस्कारासाठी काही वर्षे स्पर्धेत होत्या, तरी ग्रॅमी काही मिळवू शकल्या नाहीत. पंडित रवी शंकर, तबला नवाझ झाकिर हुसेन आणि पंडित विश्व मोहन भट या तिघांखेरीज भारताला स्वतंत्र ग्रॅमी आजतागायत कुणीही मिळवून दिलेलं नाही. यंदा मात्र एकाच वेळी या पुरस्कारासाठी भारताला चार नामांकने आहेत.

परवडणारे घर मिळू शकते का?
मुंबईतल्या म्हाडाच्या घरांना ‘न भूतो, न भविष्यती’ अशी मागणी आल्यामुळे परवडणाऱ्या घरांची संकल्पना आता जोर धरू लागली आहे. अवघ्या पावणेचार हजार घरांसाठी चार ते पाच लाखांच्या घरात अर्ज येतील असा म्हाडा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. यापैकी खरोखरच गरजू किती याचा हिशेब मांडला तर तो खूपच कमी होईल. म्हाडाचे घर खासगी बिल्डरांपेक्षा स्वस्त असल्याचे कळल्यामुळे सगळ्यांनीच आपले नशीब अजमावून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. म्हाडाच्या घरांसाठी ज्या प्रमाणात अनामत रक्कम ठेवण्यात आली आहे ती पाहता अनेकांनी नंतर माघार घेतल्याचे स्पष्ट आहे. याचे कारण म्हणजे साडेसात लाख अर्जांची विक्री होऊनही तेवढे अर्ज दाखल झालेले नाही.

तणावपूर्ण वातावरणात स्पर्धकांमध्ये अनोखी मैत्री
प्रतिनिधी

शनिवारी ‘एलिमिनेशन राऊंड’ असल्यामुळे ‘इंडियन आयडॉल’चा सेटवरचा हा दिवस प्रचंड तणावात जातो. आता या स्पर्धेत अंतिम पाचच स्पर्धक उरले असल्यामुळे या शनिवारी स्पर्धेतून कोण बाहेर जाणार, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. राजदीप, तोर्षां, सौरभी, रेमो आणि कपिल हे सगळेजण खूप मेहेनत करुन येथपर्यंत पोहोचले आहेत. शनिवारचा ‘इंडियन आयडॉल’चा भाग या स्पर्धकांसाठी नेहमीपेक्षा अधिकच तणावपूर्ण ठरणार आहे. दिवसेंदिवस स्पर्धा वाढत असली तरी हे पाचजण एकमेकांना धीर देत आहेत. एकमेकांचे प्रतिस्पर्धी असूनही त्यांच्यात वैयक्तिक पातळीवर कोणतीही चढाओढ नाही. आता एकेक जण आपल्यातून दूर जाणार हे माहीत असूनही, त्यांनी भविष्याच्या दृष्टीने आताच काही विचार करुन ठेवला आहे. ‘इंडियन आयडॉल’ची स्पर्धा संपली की एकत्र येऊन संगीताच्या क्षेत्रात काही तरी महत्त्वपूर्ण कामगिरी करण्याचे या पाच स्पर्धकांनी ठरविले आहे. सध्या मात्र शनिवारी आपण स्पर्धेत राहणार की जाणार याचाच सगळेजण विचार करीत आहेत. सौरभी आतापर्यंत कायम सुरक्षित राहिली आहे. पण या शनिवारी काय होईल हे सांगता येत नाही. तोर्षां, राजदीप, कपिल की रेमो. कोण जाणार इंडियन आयडॉलमधून? हे शनिवारी रात्री ९.०० वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलीव्हिजनवर पहायला मिळेल.

मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे दर्जाकन व प्रशिक्षकांना प्रशिक्षण! परिवहन विभागाची योजना
कैलास कोरडे

रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी राज्यातील मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे दर्जाकन करण्याचा परिवहन विभागाचा विचार आहे. त्याचबरोबर तेथे शिकवणाऱ्या प्रशिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात याबाबतची मार्गदर्शक तत्वे निश्चित केली जाणार आहेत. मोटार ड्रायव्हिंग स्कूलची इमारत, वाचनालय व शौचालयासारख्या तेथील सोयीसुविधा, वाहनांचा ताफा, चांगले प्रशिक्षक, माहिती व प्रात्यक्षिकांवर आधारित चांगला प्रशिक्षणक्रम या मोटार वाहन कायद्यात नमूद किमान आवश्यक बाबींआधारे हे दर्जाकन केले जाणार आहे.

बोगस डॉक्टरांचा ‘कारखाना’ बंद करा; हायकोर्टात जनहित याचिका
प्रतिनिधी

गेली सुमारे १०० वर्षे अस्तित्वात असलेल्या परळ येथील ‘कॉलेज ऑफ फिजीशियन्स अ‍ॅण्ड सर्जनस ऑफ बॉम्बे’ (सीपीएस) या संस्थेतर्फे दरवर्षी सुमारे २,२०० विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या चार पदव्या आणि नऊ पदविकांना ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ तसेच भारत सरकारची कोणतीही मान्यता नसल्याने संस्थेचे हे अभ्यासक्रम ताबडतोब बंद केले जावेत, अशी विनंती करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली गेली आहे.

विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा
प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ स्टुडंट्स वेल्फेअर अ‍ॅण्ड युनिव्हर्सिटीज् इन्फॉर्मेशन ब्युरो आणि मिती क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने जव्हार येथे आज, ७ फेब्रुवारीला विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी अरविंद नाडकर्णी यांची व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा होईल. दुसऱ्या दिवशी तरुणांना उद्योजकीय सल्ला देणारी कार्यशाळा होणार असून त्याचे उद्घाटन मराठी व्यापारी मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष विजय कामेरकर करतील. यात सेंट अ‍ॅंजेलोज् कॉम्प्युटर एज्युकेशनचे राजेश अ‍ॅग्नेलो आणि आयडियल एज्युकेशनचे जगदीश वालावलकर वक्ते असतील. पद्मा दिवाणे, श्वेता इनामदार या उद्योजकही मार्गदर्शन करणार आहेत. उद्योगासाठी आवश्यक कौशल्ये कशी जोपासावीत याचे मार्गदर्शन आर्थिक सल्लागार सुनील वालावलकर करतील. जव्हार तसेच बोर्डी, वाडा, मोखाडा, विक्रमगड परिसरातील ९ महाविद्यालयातील विद्यार्थी यात सहभागी होतील. ग्रामीण भागातील तरुणांना उद्योजकीय कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास यासंदर्भात मार्गदर्शन करता यावे म्हणूनच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे मुंबई विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ स्टुडंट्स वेल्फेअर अ‍ॅण्ड युनिव्हर्सिटीज् इन्फॉर्मेशन ब्युरोचे संचालक मृदूल निळे यांनी पत्रकात म्हटले आहे.