Leading International Marathi News Daily

शनिवार, ७ फेब्रुवारी २००९

नवनीत

आपल्या देशाचे सर्वश्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळ यांना त्यांच्या काळातील डॉ. आंबेडकर हे सर्वश्रेष्ठ बुद्धिवंत वाटत होते; तर जगातील एका थोर राज्यशास्त्रज्ञाला, हॅरॉल्ड लास्की यांना, ते छुपे क्रांतिकारक वाटत होते. डॉ. आंबेडकर हे भारताच्या इतिहासाने पाहिलेले शेवटचे आणि श्रेष्ठ दर्जाचे समाज क्रांतिकारक होते यात संशय बाळगण्याचे कारण नाही. नव्या जगातसुद्धा माणूस धर्माशिवाय जगू शकणार नाही आणि जुने धर्म तर आधुनिक ज्ञानविज्ञानाने कालबाह्य़ ठरविले आहेत असे त्यांचे म्हणणे होते. इतर क्रांतिकारकांत आणि बाबासाहपेबांत एक मूलभूत फरक होता. त्यासाठी त्यांनी १९५० साली ‘महाबोधी’ हा नियतकालिकात एक लेख लिहून या नव्या धर्माच्या कसोटय़ा निश्चित केल्या होत्या. या धर्मात समाजाच्या अनुशासनाचे तत्त्व म्हणून नीतीला प्राधान्य असले पाहिजे; हा धर्म कृतिशील बनवायचा असेल तर तो तर्क आणि विवेकावर म्हणजेच विज्ञानावर आधारित असला पाहिजे; त्यातील सामाजिक नैतिकतेचा आधार स्वातंत्र्य, समता आणि बंधुता असला पाहिजे व त्या धर्माने कोणत्याही परिस्थितीत दारिद्रय़ाला पावित्र्य देता कामा नये. आंबेडकरांनी हेसुद्धा स्पष्ट केले की ‘‘आता संत-महात्म्यांच्या उदयाचा काळ संपला असून, आता नवा धर्म स्थापन होणे अशक्य आहे.’’ म्हणून त्यांनी या चार कसोटय़ांवर जुने धर्म तपासून त्या पूर्ण करू शकतील, असा बुद्धाचा धर्म निवडला. बुद्ध धम्माचा बायबलसारखा एक धर्मग्रंथ तयार करणे त्यात बुद्धाचे संक्षिप्त चरित्र, चिनी धम्मपद, बुद्धाचा महत्त्वाचा उपदेश आणि जन्म, धम्मदीक्षा, बावीस प्रतिज्ञा, याचा समावेश होता. या बावीस प्रतिज्ञा कितीही वादग्रस्त ठरल्या होत्या तरी; पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांत त्यामुळे नवचैतन्य संचारले होते हे कबूल केले पाहिजे. कारण त्या धिक्कारातच त्यांच्या मुक्तीचा प्रारंभ त्यांनी अनुभवला होता; परंतु भारत बौद्धमय करण्याच्या मार्गात या प्रतिज्ञा निदान त्यापैकी हिंदू धर्माचा निषेध नोंदविणाऱ्या आठ प्रतिज्ञा तरी; निश्चितच अडसर म्हणून उभ्या राहिलेल्या दिसतात. ज्या जातिग्रस्त हिंदुंना बौद्ध करण्याचे, त्यांना समतेची दीक्षा देण्याचे बाबासाहेबांच्या मनात होते, त्या हिंदू संस्कारात वाढलेल्या जनतेशी या प्रतिज्ञांमुळे संबंधच तुटला. ज्यांना बाबासाहेबांचे स्वप्न पुरे करायचे असेल, त्यांच्यावर हा तुटलेला संबंध, ही तुटलेली नाती नव्या परिस्थितीत नव्या दृष्टीने कशी जोडायची ही फार मोठी जबाबदारी आहे. ती प्रत्यक्ष आचरणाने, कृतिशीलतेनेच जोडावी लागतील.
डॉ. रावसाहेब कसबे

कोणकोणत्या ग्रहांना चुंबकत्व आहे? हे चुंबकत्व निर्माण होण्याची कारणे कोणती?
पृथ्वीवरील दिशा निश्चित करण्यासाठी चुंबकाचा सर्रास वापर केला जातो, त्याचे कारण पृथ्वीभोवती असलेले चुंबकीय क्षेत्र. मात्र असे चुंबकीय क्षेत्र सर्वच ग्रहांना लाभलेले नाही. विविध अवकाशयानांनी केलेल्या निरीक्षणानुसार शुक्र, मंगळ तसेच चंद्र, प्लुटो आणि इतर लघुग्रहांना चुंबकीय क्षेत्र नाही. हे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते ते अंतर्भागातील घडामोडींमुळे. पृथ्वीच्या अंतर्भागात लोह, निकेल व इतर धातू द्रवरूपात आहेत. प्रचंड दाब व अतिउच्च तापमानामुळे या धातूंना द्रवरूप प्राप्त झाले असावे. धातूंचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्यात असणारे मुक्त इलेक्ट्रॉन्स. ज्या वेळी हे मुक्त इलेक्ट्रॉन्स पृथ्वीच्या परिवलनामुळे व अंतर्भागातील द्रवाच्या अभिसरणामुळे फिरू लागतात, त्या वेळी चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. म्हणजेच चुंबकीय क्षेत्र निर्माण होण्यासाठी द्रवरूप गाभा व जलदगतीने परिवलन असण्याची आवश्यकता असते. शुक्र ग्रह स्वत:भोवती अत्यंत मंदगतीने परिवलन करतो. साहजिकच त्याच्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होत नाही. त्याचप्रमाणे मंगळ जरी जलद गतीने परिवलन करीत असला तरी त्याचे एकूणच वस्तुमान व आकार लहान असल्यामुळे त्याचा अंतर्भाग घनरूप आहे. म्हणून त्याच्याभोवती चुंबकीय क्षेत्राचा अभाव आहे. गुरू, शनि, युरेनस, नेपच्यून मात्र प्रचंड वस्तुमानासह जलद गतीने परिवलन करतात. तसेच जास्त दाबामुळे त्यांच्या अंतर्भागात द्रवरूप हायड्रोजन असण्याची शक्यता आहे. हायड्रोजन द्रवरूपात धातूप्रमाणे वागतो आणि म्हणूनच या सर्व ग्रहांना शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र आहे. मात्र पृथ्वीप्रमाणे युरेनस किंवा नेपच्यूनवर याचा दिशा दर्शविण्यासाठी उपयोग अजिबात नाही. कारण युरेनसचा चुंबकीय अक्ष त्याच्या परिवलन अक्षाशी जवळ जवळ साठ अंशांचा, तर नेपच्यूनचा चुंबकीय अक्ष त्याच्या परिवलन अक्षाशी सत्तेचाळीस अंशाचा कोन करतो. पृथ्वीवर अशी परिस्थिती असती तर चुंबकीय ध्रुव चीनमध्ये असता! बुधावरचे चुंबकीय क्षेत्र नेमके कशामुळे तयार झाले आहे, याबद्दल अजूनही शास्त्रज्ञ साशंक आहेत. २०११ साली बुधावर मेसेंजर यान पोहोचेल तेव्हा याबाबत अधिक माहिती मिळू शकेल.
महेश शेट्टी
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

चार्ल्स जॉन हफॅम डिकन्स यांचा जन्म इंग्लंडमध्ये ७ फेब्रुवारी १८१२ रोजी झाला. घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे लहानपणीच त्यांनी मजुरीकाम पत्करले. यावेळी कामगारांच्या भयाण जीवनाचे घडलेले दर्शन पुढे त्यांच्या साहित्याला कलाटणी देणारे ठरले. ‘पिकविक् पेपर्स’मधून त्यांनी एका चित्रकाराच्या चित्रांसाठी लेखन केले. यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ‘ऑलिव्हर ट्विस्ट’, ‘निकोलस निकलबी’, ‘बार्न बी रूज’ या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या. या कादंबऱ्यांवरील नाटकेही गाजली. ‘डेली न्यूज’ नावाचे वृत्तपत्रही त्यांनी सुरू केले होते. त्यांचे निबंधही खूप गाजले. आपल्या लेखनाच्या वाचनाचे कार्यक्रम डिकन्सनी सुरू केले आणि ते गाजले. सामाजिक जाणिवेतून सुरू केलेला भरकटलेल्या स्त्रियांसाठी आश्रमाचा त्यांचा उपक्रम यशस्वी झाला. त्यांच्या लेखनातून तत्कालीन समाजातील विषमतेचे दर्शन घडते. डिकन्स यांनी आपल्या साहित्यातून झोपडपट्टी, अनाथ मुले, गुन्हेगारी इत्यादी विषय हाताळून पांढरपेशी समाजाला आत्मचिंतन करायला लावले. नट म्हणूनही त्यांनी विशिष्ट उंची गाठली होती. ‘हार्ड टाइम्स’, ‘लिटल टोरिज’, ‘ग्रेट एक्सपेक्टेशन्स’, ‘अवर म्युच्युअल फ्रेंड’, ‘एडवीन ड्रड’ या त्यांच्या आणखी काही गाजलेल्या कादंबऱ्या. एके दिवशी आपल्या लेखनाचे जाहीर वाचन करत असतानाच ते कोसळले. त्यानंतर त्यांनी अंथरूण धरले. अखेर प्रकृती खालावत जाऊन ९ जून १८७० रोजी त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

‘जाते गं आई, आज शाळा लवकर सुटणार आहे बरं का!’ असं म्हणून साक्षी घराबाहेर पडली. शाळेला जाण्यासाठी पाच नंबर बस पकडून ती नेहमीप्रमाणे शाळेजवळच्या स्टॉपवर उतरली. दप्तर, डबा, पाण्याची बाटली सावरत शाळेच्या वाटेने चालायला लागली. ‘ए, ती बघ आली’ मागून आवाज आला, तसं साक्षीने मागे वळून पाहिलं आणि तिचा सावळा चेहरा घामाने डबडबला. शाळेतली शबाना, संगीता, रेचल आणि सुजाता तिच्या मागे पळत येत होत्या. घाबरून साक्षीने पळायला सुरुवात केली, पण त्या चौघींनी साक्षीला घेरले. रेचलने दंड पकडला. ‘कुठं पळतेस? कालही आम्ही बोलवत होतो तर पुढे निघून गेलीस’, रेचलने दरडावलं. ‘बघू, डबा उघड’- शबाना. ‘दप्तर पाहू’- सुजाता. साक्षीने प्रतिकार केला. त्याबरोबर संगीताने तिची वेणी खसकन ओढून एक धपाटा घातला. साक्षी कळवळली. तोपर्यंत शबानाने तिच्या दप्तरातले १५ रुपये बाहेर काढले. ते नाचवत ती म्हणाली,‘‘चला. हे पाहा मला काय मिळालं.’’ साक्षी रडवेल्या स्वरात म्हणाली, ‘‘मला वही आणायचीय. बाई शिक्षा करतील.’’ पण ऐकायला तिथे कुणीच नव्हते. साक्षीला रडू आलं. डोळे पुसून ती चालू लागली. झालेल्या प्रकाराने तिला स्वत:चा राग येत होता. वही नाही म्हणून बाई शिक्षा करणार होत्या ते वेगळेच! शिवाय पुन्हा आईकडे वहीसाठी पैसे कुठल्या तोंडाने मागणार? मधल्या सुटीत साक्षी सुन्नपणे बाकावर बसून होती. ‘काय गं? का बसलीस अशी? डबा नाही का खायचा?’ तिची स्नेहा प्रेमळपणे म्हणाली. साक्षीला रडू कोसळलं. तिला सांगावे की नको अशा भीतीने ती गप्प राहिली. स्नेहल म्हणाली, ‘‘चल, इथेच दोघीजणी डबा खाऊया. अशी उदास नको गं बसूस. सांग ना काय अडचण आहे ती.’’ स्नेहाच्या बोलण्याने साक्षीला धीर आला. तिने सारा प्रकार सांगितला. ‘आपण पांडेबाईंना सांगू या. त्या खूप चांगल्या आहेत’, स्नेहा म्हणाली. पांडेबाईंनी साक्षीने सांगितलेली घटना ऐकून घेतली. त्या तिला घेऊन मुख्याध्यापिका बाईंकडे गेल्या. साक्षीने जे होईल त्याला धीराने सामोरे जायाचं ठरवलं. घडला प्रकार समजल्यावर मुख्याध्यापिकाबाईंनी त्या मुलींच्या पालकांना बोलावून घेतले. मुलींची कानउघडणी केली. मुलींच्या वागण्यात बदल झाला नाही तर शाळेतून काढून टाकू, असं सांगितले. बातमी साऱ्या शाळाभर झाली. दंडेलशाही करणाऱ्या मुलींना तोंड दाखवायला जागा उरली नाही.
दादागिरी करून आपले वर्चस्व दाखवायला काहींना आवडते. कुणाची दंडेलशाही निमूटपणे सोसू नये. अशावेळी सामोपचाराने उपाय होऊ शकतो.
आजचा संकल्प : मनातली भीती घालवण्यासाठी आज मी एखाद्या व्यक्तीशी बोलेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com