Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘झंडु आणि लोकसत्ता’ प्रस्तुत आयुर्वेद अ‍ॅण्ड यू वाशीमध्ये
प्रतिनिधी : ‘झंडु आणि लोकसत्ता’ प्रस्तुत ‘आयुर्वेद अ‍ॅण्ड यू’ या कार्यक्रमाला मुंबई आणि ठाणे येथे प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, उपस्थितांनी आपली आरोग्यविषयक माहिती कार्यक्रमस्थळी उपलब्ध असलेल्या प्रश्नावलीमध्ये भरून द्यावी, कार्यक्रम संपल्यावर त्यांना प्रकृतीची ओळख स्पष्ट करणारी ‘आरोग्य कुंडली’ विनामूल्य देण्यात येणार आहे.
‘किडस् अ‍ॅण्ड यूथसाठी आयुर्वेद’ या विषयावर वैद्य प्रकाश ताथेड, वैद्य उदय कुलकर्णी आणि वैद्य मधुरा कुलकर्णी उपस्थितांबरोबर संवाद साधणार आहेत. तसेच प्रश्नोत्तराच्या सहाय्याने उपस्थितांच्या शंकांचे निरसन करणार आहेत.
कफ प्रकृतीच्या लहान मुलांमध्ये आढळून येणारी सर्दी, वात प्रकृतीच्या मुलांची होणारी चिडचिड, किंवा पित्त प्रकृतीच्या मुलांमधील नाकाचा घोळणा फुटण्यासारखे आजार, यामुळे तरुणपणी कधी कधी अस्थमा, डोकेदुखी आणि आम्लपित्तसारखे विकार जडतात. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीस ताण-तणावांमुळे शारीरिक आणि मानसिक त्रास होत असतात तर कफ प्रकृती असणाऱ्याला सर्दी, ताप असे विकार संभवत असतात. या विकारांचा करिअरमधील प्रगतीसाठी अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आपल्या प्रकृतीनुसार करिअरची निवड केल्यास हे प्रश्नचिन्ह राहत नाही. हे सर्व टाळण्यासाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून कोणते उपाय करता येणे सहज शक्य असते, यामुळे निरोगी आरोग्य मिळविता येते या विषयावर वैद्य उदय कुलकर्णी आणि वैद्य मधुरा कुलकर्णी स्लाइड शोच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. सोबत प्रकृतीची ओळख अगोदरच कळली तर करिअरची निवड असो किंवा व्यवहार करण्यासाठी आवश्यक असणारा संवाद सोबतच्या व्यक्तीची प्रकृती ओळखून तो यशस्वी कशा प्रकारे करता येतो ते वैद्य उदय कुलकर्णी आणि वैद्य मधुरा कुलकणी दाखवून देणार आहेत.
‘झंडु आणि लोकसत्ता’ प्रस्तुत ‘आयुर्वेद अ‍ॅण्ड यू’ कार्यक्रमाचा लहान मुलांमधील आजार आणि तरुणपणी जुने झालेले विकार या विषयावर सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. यशवंत आमडेकर कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा जोगळेकर- कुलकर्णी करणार असून, कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. उपस्थितांना ‘ऋतूमानानुसार कशा प्रकारे दिनचर्या करावी याबाबतची दिनदर्शिका विनामूल्य मिळणार आहे..