Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

शहरी भागात सातबाऱ्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड लागू करणार - पतंगराव कदम
बेलापूर/वार्ताहर : शहरी भागात सातबारा पद्धती बंद करून लवकरच प्रॉपर्टी कार्ड योजना लागू करण्यात

 

येणार असल्याचे प्रतिपादन महसूल व शिक्षणमंत्री पतंगराव कदम यांनी कोपरखैरणे येथे केले.
नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ब्रिटिश काळापासून अद्याप मुंबईतील मालमत्तांची मोजणी झाली नाही. त्यामुळे येत्या दोन वर्षांत ती प्रक्रिया पूर्ण करून ज्या मालमत्तांना सातबारा आहे, अशांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात सातबाऱ्यावर आतापर्यंत केवळ पतीचेच नाव लावले जात होते. आता येथून पुढे पतीसह पत्नीच्याही नावाचा त्यात समावेश करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे कदम म्हणाले.
पुण्याप्रमाणेच नवी मुंबई हेही विद्येचे माहेरघर म्हणून आता संबोधले जात असून, येथील साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त आहे. दहावीच्या सराव परीक्षेचा उपक्रम राज्यातील अन्य ठिकाणीही राबविला जाऊन विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवा, असे मत पालकमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केले.
सराव परीक्षेचे आयोजक डॉ. संजीव नाईक यांनी या उपक्रमाचा उद्देश यावेळी स्पष्ट केला. केवळ आत्मविश्वासाच्या अभावामुळे विद्यार्थी आत्महत्या करतात, ही महाराष्ट्राला लांच्छनास्पद बाब असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. या उपक्रमास यशस्वी करण्यास राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने नवी मुंबई मनपाचे स्थायी समिती सभापती संदीप नाईक, नगरसेवक अनंत सुतार यांनी विशेष मेहनत घेतल्याचे संजीव नाईक यांनी सांगितले. नवी मुंबईतील २० केंद्रांवर घेण्यात आलेल्या या परीक्षेस १३ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. इंग्रजी व मराठी माध्यमाच्या या परीक्षेत अनुक्रमे ऋतुजा कानेकर व वृषाली सादिगले यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना लॅपटॉप देऊन गौरविण्यात आले. सराव परीक्षेतील केंद्रनिहाय प्रथम आलेल्या २० विद्यार्थ्यांना रोख रकमेची एकूण तीन लाखांची पारितोषिके देण्यात आली.