Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

अमराठी फेरीवाल्यांसाठी पालिकेची ‘अभय योजना’!
पनवेल/प्रतिनिधी : पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून मराठी व अमराठी फेरीवाल्यांमध्ये पक्षपात

 

करण्यात येत असून मराठी व्यावसायिकांना कायद्याचा बडगा तर अमराठी फेरीवाल्यांसाठी ‘अभय योजना’ राबवली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल शहर चिटणीस विशाल सावंत यांनी केला आहे.
मराठी व परप्रांतीय फेरीवाल्यांवर होणाऱ्या कारवाईत पालिकेकडून भेदभाव होत असल्याचे निवेदन सावंत यांनी नगराध्यक्षांना दिले होते; परंतु त्यानंतरही पालिकेने कोणतीही कारवाई केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोळीवाडय़ातील मासेविक्री करणाऱ्या कोळी महिला तसेच भाजीचा व्यवसाय करणाऱ्या मराठी महिलांवर अतिक्रमणविरोधी पथकाकडून कारवाई करण्यात येते. मात्र एकाच परवान्यावर भेळपुरी तसेच अन्य गाडय़ा दिवसभर लावणाऱ्यांवर पालिकेची वक्रदृष्टी पडत नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. फिरत्या गाडीचा परवाना असूनही वर्षांनुवर्षे एकाच ठिकाणी भेळपुरीचा व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाई का होत नाही, अशी विचारणा केल्यानंतर या फेरीवाल्यांना दुपारी ४ ते ८ या कालावधीत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती आपणास पालिकेकडून देण्यात आली. मात्र फिरत्या गाडीचा परवाना असूनही अशी परवानगी कशी देण्यात आली व त्यासंबंधी ठराव करण्यात आला आहे का, असल्यास त्याची प्रत मिळावी असे सावंत यांनी म्हटले आहे.
बनावट सीडी विकणाऱ्या परप्रांतीय मंडळींनीही रस्त्यावरच दुकाने थाटली असून त्यांच्यावरही पालिकेकडून कारवाई होत नसल्याबाबत सावंत यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करताना मराठी-अमराठी असा भेद पालिकेने करू नये. तसेच परप्रांतीयांसाठीची ‘अभय योजना’ त्वरित बंद करावी, अन्यथा मनसेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा त्यांनी दिला आहे.