Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

सत्यम घोटाळा राजकीय वरदहस्ताखेरीज अशक्य - सुचेता दलाल
प्रतिनिधी : सत्यमचा घोटाळा राजकीय वरदहस्ताखेरीज अशक्य असून हिंसक दहशतवादाबरोबरच

 

आर्थिक दहशतवादही तितकाच भयंकर असल्याने या दोन्ही दहशतवादांचा मुकाबला आपल्या परीने वा संघटितपणे करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पत्रकार सुचेता दलाल यांनी केले. सेंट्रल बँक एम्प्लॉईज युनियन व सेंट्रल बँक ऑफिसर्स काँग्रेस यांनी संयुक्तरीत्या आयोजिलेल्या ३५ व्या त्रवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन दलाल यांच्या भाषणाने झाले.
अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक रामनाथ प्रदीप तर प्रमुख अतिथी म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक आर. एन. स्वामी उपस्थित होते. अन्य निमंत्रितांत सुभाष चौधरी (सरचिटणीस - आरसीबीओसी) आणि ओ. पी. शर्मा (उपसरचिटणीस - एसआयसीबी) यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सेंट्रल बँक एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस सुभाष सावंत यांनी केले. याप्रसंगी बोलताना दलाल म्हणाल्या २६ नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्याइतकाच सत्यम घोटाळाही भयानक असून हा घोटाळा राजकीय वरदहस्ताखेरीज अशक्य आहे.
या घोटाळ्यातील आरोपींबाबत सरकारची भूमिका आगामी निवडणुका लक्षात घेऊनच घेतली गेली असल्याचे एकूण घटनाक्रमावरून लक्षात येते. अशा घोटाळ्यांत सामान्य माणसांचाच पैसा जात असल्याने आपण जेथे कोठे काम करीत असू तेथे जर भ्रष्टाचार होत असेल तर त्याविरोधात आवाज उठवायला हवा.
जागतिक मंदी ही स्वार्थ आणि भ्रष्टाचारामुळेच ओढवली असून केवळ स्वत:चा स्वार्थ पाहणाऱ्या काही मोजक्या मंडळींनी म्युच्युअल फंड, स्टॉक एक्स्चेंज, बँक कर्जे, पेन्शन फंड आदींच्या माध्यमांतून कोटय़वधी रुपये लाटले आहेत. संघटनेचे सरचिटणीस सुभाष सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकात सेंट्रल बँक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांचा उहापोह केला. कांदिवली येथील समता नगर येथील वर्ग - ४ च्या सुमारे शंभर कर्मचाऱ्यांची वसाहत तेथून हलविण्यासाठी बँक व्यवस्थापनाने नोटिसा पाठवून ज्या कर्मचाऱ्यांवर भीतीची टांगती तलवार ठेवली आहे ती रामनाथ प्रदीप यांच्या नेतृत्वाखालील नव्या व्यवस्थापनाने त्वरित हटवावी, अशी मागणीही सावंत यांनी या वेळी केली.