Leading International Marathi News Daily

शनिवार, ७ फेब्रुवारी २००९

‘झंडु आणि लोकसत्ता’ प्रस्तुत आयुर्वेद अ‍ॅण्ड यू वाशीमध्ये
प्रतिनिधी : ‘झंडु आणि लोकसत्ता’ प्रस्तुत ‘आयुर्वेद अ‍ॅण्ड यू’ या कार्यक्रमाला मुंबई आणि ठाणे येथे प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, उपस्थितांनी आपली आरोग्यविषयक माहिती कार्यक्रमस्थळी उपलब्ध असलेल्या प्रश्नावलीमध्ये भरून द्यावी, कार्यक्रम संपल्यावर त्यांना प्रकृतीची ओळख स्पष्ट करणारी ‘आरोग्य कुंडली’ विनामूल्य देण्यात येणार आहे. ‘किडस् अ‍ॅण्ड यूथसाठी आयुर्वेद’ या विषयावर वैद्य प्रकाश ताथेड, वैद्य उदय कुलकर्णी आणि वैद्य मधुरा कुलकर्णी उपस्थितांबरोबर संवाद साधणार आहेत.

राज ठाकरे आज वाशीत मराठीविषयी भूमिका मांडणार
पत्रकार संघटनेचा कार्यक्रम असल्याने पालकमंत्री या नात्याने गणेश नाईक उद्घाटन समारंभाला हजर राहणार असले तरीही राज ठाकरे यांच्या भाषणाच्या वेळी ते तिथे नसतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मात्र शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे राज ठाकरे यांची मराठीविषयीची भूमिका ऐकून घेणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

शहरी भागात सातबाऱ्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड लागू करणार - पतंगराव कदम
बेलापूर/वार्ताहर : शहरी भागात सातबारा पद्धती बंद करून लवकरच प्रॉपर्टी कार्ड योजना लागू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महसूल व शिक्षणमंत्री पतंगराव कदम यांनी कोपरखैरणे येथे केले.
नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ब्रिटिश काळापासून अद्याप मुंबईतील मालमत्तांची मोजणी झाली नाही.

अमराठी फेरीवाल्यांसाठी पालिकेची ‘अभय योजना’!
पनवेल/प्रतिनिधी : पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून मराठी व अमराठी फेरीवाल्यांमध्ये पक्षपात करण्यात येत असून मराठी व्यावसायिकांना कायद्याचा बडगा तर अमराठी फेरीवाल्यांसाठी ‘अभय योजना’ राबवली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल शहर चिटणीस विशाल सावंत यांनी केला आहे.

शहिदांच्या श्रद्धांजली फलकावर धुळीचे थर
पनवेल/प्रतिनिधी : मुंबईवर २६ नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकावर धुळीचे थर जमा झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे हा फलक पनवेल शहर पोलीस ठाण्याबाहेरच पत्रकारांच्या एका संघटनेतर्फे लावण्यात आल्याने यातील गांभीर्य वाढले आहे.

सत्यम घोटाळा राजकीय वरदहस्ताखेरीज अशक्य - सुचेता दलाल
प्रतिनिधी : सत्यमचा घोटाळा राजकीय वरदहस्ताखेरीज अशक्य असून हिंसक दहशतवादाबरोबरच आर्थिक दहशतवादही तितकाच भयंकर असल्याने या दोन्ही दहशतवादांचा मुकाबला आपल्या परीने वा संघटितपणे करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पत्रकार सुचेता दलाल यांनी केले. सेंट्रल बँक एम्प्लॉईज युनियन व सेंट्रल बँक ऑफिसर्स काँग्रेस यांनी संयुक्तरीत्या आयोजिलेल्या ३५ व्या त्रवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन दलाल यांच्या भाषणाने झाले.

पनवेलमध्ये आज हिंदू धर्मजागृती सभा
पनवेल/प्रतिनिधी : हिंदू जनजागृती समितीतर्फे आज पनवेलमध्ये होणाऱ्या हिंदू धर्मजागृती सभेचा प्रचार टिपेला पोहोचला असून या सभेला विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. पनवेलमधील मिडलक्लास सोसायटीतील मैदानात संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या सभेत शिवसेनेचे खासदार मनोहर जोशी, शेकापचे आमदार विवेक पाटील, भाजप नेते विनोद तावडे, सनातन संस्थेचे अभय वर्तक, हिंदू जनजागृती समितीचे रमेश शिंदे, रामेश्वरशास्त्री महाराज यांची भाषणे होणार आहेत. या सभेची माहिती देणाऱ्या कमानी, फलक शहरभर लावण्यात आले असून सुमारे ५०० रिक्षांवरही हे फलक झळकत आहेत. मुंबईवर झालेला भीषण दहशतवादी हल्ला व आगामी निवडणुका यांच्या पाश्र्वभूमीवर ही सभा महत्त्वाची ठरणार आहे. नागरिकांमध्ये त्याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

गळफास घेऊन एकाची आत्महत्या
बेलापूर : कोपरखैरणे येथे गळफास घेऊन एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. ज्ञानोबा चव्हाण (४२) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. कोपरखैरणे सेक्टर-१० मधील सुयश सोसायटीत राहणारे चव्हाण एका पतसंस्थेत कामाला होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांना कामावरून कमी करण्यात आले होते. चव्हाण यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी मिळाली असून पोलिसांचा त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक तटकरे यांनी सांगितले.

सुरभी कौल एमबीबीएस डिग्रीने सन्मानित
उरण : नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचा तिसरा पदवीदान सोहळा राज्यपाल एस. सी. जमीर यांच्या उपस्थितीत ४ फेब्रुवारी रोजी झाला. यावेळी ७०० एमबीबीएस विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये उरणच्या सुरभी कौल या विद्यार्थिनीचाही समावेश होता. जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापक शिबेल कौल यांची सुरभी मुलगी होय.

राष्ट्रवादीतर्फे हळदीकुंकू समारंभ
उरण : उरण राष्ट्रवादीतर्फे नुकताच महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरापंथी सभागृहात आयोजित समारंभप्रसंगी महिला तालुका अध्यक्षा वंदना मुरुडकर, शहर अध्यक्षा वंदना लोणारे, न. पा. सदस्या पुष्पा म्हात्रे, माजी नगरसेविका नंदा माझगावकर, बबिता कुरुप, समीया बुबेरे, दर्शना शहा आदी महिला पदाधिकाऱ्यांसह सुमारे ७०० महिला सहभागी झाल्या होत्या.