Leading International Marathi News Daily

शनिवार, ७ फेब्रुवारी २००९

श्रमिक रिक्षा-टॅक्सी सेनेतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी रिक्षा.

नियमावर बोट ठेवणाऱ्या ‘आरटीओ’ विरोधात रिक्षा मोर्चा
प्रतिनिधी / नाशिक

नियमावर बोट ठेऊन काम सुरू केलेल्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यशैली विरोधात शुक्रवारी श्रमिक रिक्षा-टॅक्सी सेनेतर्फे रिक्षा, जीप आणि टॅक्सींचा भव्य मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी चालक आपापली वाहने घेऊन मोर्चात सहभागी झाल्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्था बराच काळ कोलमडून पडली. क्षमतेहून अधिक शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधातील धडक मोहीम थांबवावी, जप्त केलेली वाहने सोडून द्यावीत, खासगी बसेसना शहराच्या हद्दीबाहेर पाठवावे आदी मागण्या मोर्चेक ऱ्यांनी केल्या. तथापि, त्यातील बहुतांश मागण्या नियमाला धरून नसल्याने त्याचे स्वरूप प्रादेशिक परिवहन विभागाच्या आकलनापलिकडचे असल्याचे पाहावयास मिळाले. रिक्षा चालकांच्या आंदोलनाचा सर्वाधिक जाच शालेय विद्यार्थी, नागरिक आणि वाहनधारकांना सहन करावा लागला.

‘परिवर्तना’च्या दिशेने पाऊल पडण्याची गरज
अवैध फलकबाजीचे थैमान हा विषय सर्व बडय़ा शहरांसह आता छोटय़ा शहरांसाठीही डोकेदुखी ठरू लागला आहे. नाशिकमध्ये तर ज्यांच्याकडून या प्रकारास आळा घालण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते, त्यांचीच भूमिका दुतोंडी ठरत असल्याचे सिध्द होऊ लागल्याने या विळख्यातून नाशिकची सुटका होणे अवघडच दिसत आहे. फलकबाजीने शहरातील कायदा व सुव्यवस्थेलाच आव्हान देण्यास सुरूवात केल्यावर काही महिन्यांपूर्वी सध्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेत महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांसह सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घेत हा प्रकार बंद करण्यासाठी उपाययोजना करण्यास बजावले होते. त्या बैठकीत सर्वानीच होकारार्थी माना डोलावल्या. पुढे काही दिवस खरोखरच नाशिक फलकमुक्त होत असल्याचे दिसू लागले.

‘कॅलिग्राफी’ प्रात्यक्षिकाव्दारे अक्षरसौंदर्याची विद्यार्थ्यांवर मोहिनी
प्रतिनिधी / नाशिक
रंग, रेषा, अक्षराचे विविध आविष्कार एखाद्या निरक्षरालाही भूरळ घालतात. अक्षरांमध्ये लपलेल्या सौंदर्यामुळेच हे घडते. हे अक्षरसौंदर्य खुलविण्याचा प्रकार म्हणजेच ‘कॅलिग्राफी’ अर्थात सुलेखन. अक्षर वळणदार असणे हे ठीक, परंतु ते नेत्रसुखद, सौंदर्यशील कसे बनते, याचा अनुभव विद्यार्थ्यांसह अनेक ज्येष्ठांना नाशिक डिस्ट्रीक्ट बुकसेलर्स अ‍ॅन्ड स्टेशनर्स असोसिएशन व नवनीत यांच्या सहकार्याने गंगापूर रोड येथील डोंगरे वसतीगृह मैदानात आयोजित ‘नवनीत ज्ञानसागर २००९’ या प्रदर्शनात घेता आला.

आश्रमशाळा शिक्षक संघटनेतर्फे आजपासून धरणे आंदोलन
प्रतिनिधी / नाशिक

आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानीत आश्रमशाळांतील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आश्रम शाळा शिक्षक संघटनेने धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आखला आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, उपाध्यक्ष जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली शनिवारपासून कर्मचारी बेमुदत धरणे धरणार असल्याचे सरचिटणीस बी. एम. चौधरी यांनी कळविले आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या दर्जावाढ कार्यक्रमाचा आढावा
नाशिक / प्रतिनिधी

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा दर्जा उंचावण्यासाठी उद्योजकांच्या सहकार्याने प्रत्येक संस्थेत व्यवस्थापन समिती स्थापन करून त्यात उद्योजकांना स्थान दिले जाणार आहे. या अनुषंगाने नाशिक विभागातील २३ संस्थांच्या प्रगतीचा आढावा उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे सचिव सीमा ढमढेरे यांनी घेतला. या समितीस संस्थेचा विकास आराखडा तयार करणे, स्थानिक रोजगाराची मागणी लक्षात घेऊन नवीन अभ्यासक्रम सुरू करणे, प्रवेश क्षमतेत वाढ, अल्प मुदतीचे अभ्यासक्रम व त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, प्रशिक्षणाची गुणवत्ता वाढविणे व प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात व स्वयंरोजगारात सहकार्य करणे ही प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे.

संत रोहिदासांची शिकवण आजही प्रेरणादायी
राष्ट्रसंत शिरोमणी गुरू रोहिदास यांचा जन्म चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात अशा कालखंडात झाला की, भारतीय समाजव्यवस्थेत जातीयतेने थैमान घातले होते, प्रचंड भेदभाव होते. अशा सामजिक व्यवस्थेविरुद्ध संत रोहिदासांनी अध्यात्मिक वाणीने धार्मिक सहिष्णुता, सामाजिकता या उद्देशाने जनतेसाठी लढा उभारला. मानवता हाच खरा धर्म त्यांनी समाजासमोर मांडला. म्हणून ते मानवतेचे आद्य पुरस्कर्ते होते. संत रोहिदासांचे विचार आजही भारतीय समाजाच्या विकासासाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहेत. नऊ फेब्रुवारी हा रोहिदासांचा जन्मदिन, त्यानिमित्त त्यांच्या विषयी थोडसं..

विमा कर्मचारी संघटनेचीपरिषद
नाशिक / प्रतिनिधी

विमा कर्मचारी संघटनेतर्फे ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे पाचला खासगीकरण व परकीय थेट गुंतवणूक वाढीविरोधात परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सिटू संघटनेचे उपाध्यक्ष अजित अभ्यंकर हे मार्गदर्शन करणार आहे.

सीटू शिक्षक आघाडीचे शिक्षण मंडळ सभापतींना मागण्यांचे निवेदन
नाशिक / प्रतिनिधी

महापालिका शिक्षण मंडळ अंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर विचार करण्यासाठी सीटू शिक्षक आघाडीतर्फे शिक्षण मंडळ सभापतींना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मंडळातंर्गत काम करणाऱ्या शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला व्हावे, सहाव्या वेतन आयोगासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कार्यालयामार्फत अंदाजपत्रक तयार करण्यात येऊन तशी तरतूद करण्यात यावी, शिक्षकांच्या बदल्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला करण्यात याव्यात, फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात सेवाकाळ पूर्ण करणाऱ्या शिक्षण सेवकांना त्वरीत वेतनश्रेणी देण्यात यावी, ज्या शाळेत शिक्षक नाही, मुख्याध्यापक नाही, तेथे त्वरीत नेमणूक करण्यात यावी आदी मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत. सभापतींनी कार्यवाही करण्यासंदर्भात आश्वासन दिले. तसेच जे कर्मचारी कामकाजात दिरंगाई करत असतील, त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. सर्व शाळेत लवकर मुख्याध्यापक व शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल व शैक्षणिक सत्राच्या प्रारंभीच शिक्षकांच्या बदल्या केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी मुशीर सैय्यद, राहुल दिवे, शिक्षण मंडळ सदस्य उपस्थित होते. तसेच अनिल चव्हाण, नामदेव ठाकरे, युवराज ठाकरे, पोपट घाणे आदींसह कार्येकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

‘रेअर फेअर’ व्दारे विविध छंदांच्या संग्रहाचे प्रदर्शन
नाशिक / प्रतिनिधी

शहरातील छंदप्रेमींनी स्थापन केलेल्या कलेक्टर्स सोसायटी ऑफ न्युमॅसमॅटीक अ‍ॅन्ड रेअर आयटेमस् या संस्थेतर्फे सर्वसामान्यांना छंदांच्या विविध प्रकारची माहिती व्हावी यादृष्टीने सहा ते आठ फेब्रुवारी या कालावधीत येथे रेअर फेअर ०९ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. लिमये सभागृहात आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महापौर विनायक पांडे, उपमहापौर अजय बोरस्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत वर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी उपाध्यक्ष ज्योतीराज कौल, सचिव संजय मोरे, सहसचिव अनंत धामणे आदी उपस्थित होते.

प्रवासीदिन साजरा
नाशिक येथे राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्राहक पंचायत प्रवासी महासंघातर्फे प्रवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रवासी महासंघाचे राज्य अध्यक्ष रणजित श्रीगौड, महासचिव प्र. वि. कुलकर्णी, महासंघाचे राज्य उपाध्यक्ष मनोहर चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी अरूण येवला, हरिष गोगड, ग्राहक पंचायतीचे अरूण भार्गवे व्यासपीठावर उपस्थित होते. ग्राहक आणि प्रवाशांचे विविध प्रश्न लोकप्रतिनिधी या नात्याने शासन दरबारी मांडून सोडविण्याचे आश्वासन डॉ. बच्छाव यांनी दिले. येवला यांनी अत्याधुनिक साधनसामग्रीने परिपूर्ण असे आरटीओ कार्यालय तयार व्हावे, महत्वाच्या ठिकाणी ट्रॅफीक पार्क तयार करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी मांडण्यात आल्याचे सांगितले. गोगड यांनी आरटीओ कार्यालयात कर रूपाने जमा होणारा पैसा शहराच्या विकासासाठी वापरावा ही इच्छा व्यक्त केली.

युवा इंटकची मागणी
नाशिक शहर जिल्हा युवा मजदूर काँग्रेसची बैठक पंचवटी येथे नुकतीच शहर युवा इंटकचे अध्यक्ष राजकुमार जेफ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत पेट्रोल दर कमी झाल्याने परिवहन महामंडळ, रिक्षाचालक संघटनांनीही भाडय़ात कपात करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचा विचार न झाल्यास इंटकतर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शहर युवा इंटकचे उपाध्यक्ष प्रकाश जाधव, राजेश सैनी, संतोष शिंदे, गोपाल कुमावत उपस्थित होते.