Leading International Marathi News Daily

शनिवार, ७ फेब्रुवारी २००९

इतिवृत्ताच्या नोंदीअभावी धुळे पालिकेचे ठराव बेकायदा असल्याचा आरोप
वार्ताहर / धुळे

पालिकेच्या महासभेत झालेल्या निर्णयाची प्रोसिडींग बुकात नोंद करून त्यावर पीठासन अधिकाऱ्यांची स्वाक्षरी झाल्यानंतरच नियमाप्रमाणे ठरावाची अंमलबजावणी होते, मात्र अद्याप सचिवांनी इतिवृत्त लिहीलेलेच नसल्यामुळे महासभेत नुकतेच झालेले ठराव बेकायदा असल्याचा आरोप लोकसंग्रामचे गटनेते दिलीप साळुंखे यांनी केला आहे. या संदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, महापलिकेची महासभा गेल्या ३१ जानेवारी रोजी झाली.

भविष्यकाळ हा नॅनो तंत्रज्ञानाचा काळ : प्रा. जोग
‘रेनमा २००९’ राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन

वार्ताहर / शहादा

अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडील कल कमी झालेला असला तरी आजही करिअर करण्यासाठी विज्ञान क्षेत्रात मोठा वाव आहे, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागाचे प्रा. डॉ. डी. एस. जोग यांनी केले. पुढील २० ते ३० वर्षांतील काळ हा खऱ्या अर्थाने नॅनो तंत्रज्ञानाचा राहणार आहे. त्यामुळे युवा पिढीला विज्ञानाकडे आकर्षित करायला हवे, अशा चर्चासत्रांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या गुणांचे प्रकटीकरण होणे महत्वाचे असते, असेही जोग यांनी सांगितले.

विंचूर-प्रकाशा राज्य मार्गाच्या रुंदीकरणास अखेर प्रारंभ
सटाणा / वार्ताहर

शहरातील विंचूर-प्रकाशा राज्य मार्गाचे रूंदीकरण व दुभाजक टाकण्यासाठी शिवसेनेने दिलेला आंदोलनाचा इशारा, शिवसेना मंजूर असलेल्या व लवकरच सुरू होत असलेल्या कामाचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नात असल्याचा नगराध्यक्षांनी केलेला आरोप याकडे लक्ष न देता संयम राखून आ. संजय चव्हाण यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रस्ता रूंदीकरण व दुभाजकाच्या कामास प्रारंभ केल्याने शहरवासीयांना सुखद धक्का बसला आहे.

बालिकेवरील बलात्कार ; एकास कारावास
लासलगाव / वार्ताहर

चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या विजय बारहाते (२३) यास निफाड येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश एस. डी. दिग्रसकर यांनी १० वर्षे कारावास व एक हजार रुपये दंड ठोठावला आहे. वडील मनमाड येथे बाजारासाठी गेल्याने घराबाहेर खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या विजयने बलात्कार केल्याचा आरोप होता.

सार्वजनिक मराठी हायस्कूलचे संमेलन
नवापूर येथील श्रीमती प्र. अ. ओढा सार्वजनिक मराठी हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. संस्थेचे सचिव शांतीलाल अग्रवाल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. मनोगतात अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक दगदगीतून विश्रांती मिळावी, यासाठी मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावर आधारित मुलांनी मिशन ताज हा कार्यक्रम सादर केला. यासाठी संजीवकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले. ताज हॉटेलची प्रतिकृती सी. एस. पाटील यांनी तयार केली. यानंतर अनेक हिंदी-मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आला.

धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी वर्गातील कर्जदारांचे कर्ज माफ करावे व पुन्हा कर्ज घेण्यासाठी सुविधा निर्माण करून द्यावी, या मागणीसाठी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागास विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यातील सर्वच महामंडळांनी सुशिक्षित बेरोजगारांनी तसेच अन्य नागरीकांनी घेतलेले कर्ज माफ करावे, केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा आणि पुन्हा कर्जमाफीसाठी सुविधा उपलब्ध करून दिली. तसाच निर्णय घेऊन शासनाने विविध महामंडळांकडून कर्ज घेतलेल्या नागरीकांबाबतही घ्यावा, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तळोद्यात उद्या आदिवासी महासंघाची बैठक
तळोदा, ६ फेब्रुवारी / वार्ताहर

अखिल भारतीय आदिवासी महासंघाची आठ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता येथील गटसाधन केंद्राच्या सभागृहामध्ये बैठक होणार आहे. बैठकीत महासंघाचे अध्यक्ष डॉ. भरत वळवी, डॉ. राजेश वसावे, हिरामण पाडवी हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. महासंघाच्या आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी आणि तालुकानिहाय शाखा स्थापन करण्याबाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे. मोठय़ा संख्येने कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन महासचिव डॉ. जर्मनसिंग पाडवी यांनी केले आहे.