Leading International Marathi News Daily

शनिवार, ७ फेब्रुवारी २००९

विशेष

बेरोजगार भत्त्यासाठी एकांगी संघर्ष
आधीच व्यवस्थेविरुद्धची लढाई कठीण असते. त्यातच ती जर महात्मा गांधी यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून लढवायची म्हटलं तरी कठीण होते आणि ती लढणारे हात जर दीनदुबळे असतील तर मग व्यवस्था त्या लढाईत समोरच्याला सातत्याने चिरडूनच टाकण्याचा प्रयत्न करते. ही जी कथा आहे या कथेची सुरुवात १९८२ साली झाली आणि २००८ हे वर्ष संपले तरी न्यायालयाचे तेही उच्च न्यायालयाचे सर्व निकाल बाजूने असूनही प्रशासन त्याकडे बेमुर्वतखोरपणे दुर्लक्ष करते, याचे साक्षात उदाहरण आहे. या कथेचे नायक गडचिरोली जिल्ह्य़ातल्या आरमोरी तालुक्यातल्या कुरूड आणि विसोरा या दोन छोटय़ाशा गावचे शेतमजूर आहेत. यापैकी एका शेतमजुराचे हा संघर्ष करता करता निधनही झालेले आहे.

बेकायदा की बाकायदा?
उत्तरदायित्व आणि जबाबदारीविना मिळालेल्या अधिकारातून व्यवस्थेचे कसे तीनतेरा वाजतात, याचा अनुभव ठाणे जिल्हा घेत आहे. ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका, अनेक नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील क्षेत्र तसेच सिडकोचा सुभा अशा विस्तीर्ण हद्दीत उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांची आणि अतिक्रमणांची संख्या पाच लाखांच्या वर गेली आहे. ही बेकायदा बांधकामे हटविण्यासाठी अनेक आश्वासने आजवर दिली गेली. परंतु अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत लाखांचे हजार करण्याची दिवाळखोर कर्तव्यदक्षता दाखविण्यास ना सत्ताधारी तयार आहेत, ना नोकरशाही. अनधिकृत बांधकामांविरुद्ध कसलीही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर उच्च न्यायालयाने हे काम राज्याच्या मुख्य सचिवांकडे सोपविले आहे.

खडतर प्रवासाला आरंभ
कलकत्ता फिल्म सोसायटीच्या स्थापनेनंतर २५ सदस्यही होत नाहीत हे पाहून सत्यजित राय, चिदानंद दासगुप्ता, निमाई घोष इ.चा चित्रपट संस्कृती प्रसाराचा उत्साह मावळू लागला. ६०/६५ वर्षांपूर्वी फिल्म सोसायटी ही काय संकल्पना आहे याची समाजाला कल्पना नव्हती. स्वाभाविकच फिल्म सोसायटी स्थापन करणे आणि दर महिन्याला उत्तमोत्तम चित्रपट दाखवून ती चालविणे हे खडतर आणि कष्टप्रद काम होते. फिल्म सोसायटीच्या प्रसारातून नवा अभिरुचीसंपन्न प्रेक्षक घडेल याचीहीकोणाला फारशी कल्पना नव्हती.
१९५० साली सत्यजित रायना त्यांच्या जाहिरात कंपनीने प्रशिक्षणासाठी ६ महिने लंडनला पाठविले. त्यानंतर कलकत्ता फिल्म सोसायटी बंद पडण्याच्या मार्गावर गेली. पण जी काही २/३ वर्षे फिल्म सोसायटी चालली, त्या काळात फ्रेंच दिग्दर्शक रेनॉर, रशियन दिग्दर्शक पुडोव्हकीन, स्विडीश डॉक्युमेंटरी दिग्दर्शक आर्नी सुकोरोन्हाफ, आणि अमेरिकन दिग्दर्शक फ्रँक काप्रा या दिग्दर्शकांना बोलावून कलकत्ता फिल्म सोसायटीने त्यांच्याशी संवाद साधला. चित्रपट संस्कृतीप्रसाराचे हे पायाभरणी करणारे कार्य कलकत्ता फिल्म सोसायटीने केले. पण १९५२ साली केवळ ७५ सदस्य असलेली सोसायटी बंदच पडली.
सत्यजित रायनी लंडनला इटालियन नववास्तववादी इतर अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहिले. आणि स्वत: दिग्दर्शन क्षेत्रात उतरायचे ठरविले. लंडनहून परत येताना बोटीवरच त्यांनी ‘पाथेर पांचाली’ पटकथेचा पहिला कच्चा-खर्डा लिहून काढला आणि प्रत्यक्ष चित्रीकरणाला १९५२ मध्ये आरंभ केला. पहिला कच्चा खर्डा लिहितांना सत्यजितना पुसटशीही कल्पना नव्हती की ‘पथेर पांचाली’ फिल्म सोसायटी चळवळीचा प्रसार करायला सहाय्यभूत ठरेल.
१९५५ साली ‘पथेर पांचाली’ कलकत्त्यात प्रकाशित झाला. त्यामुळे वेगळ्या सिनेमाचे मॉडेल प्रेक्षकांसमोर आले. स्वाभाविकच ‘कलकत्ता फिल्म सोसायटी’त नवा उत्साह संचारला. सोसायटीला संजीवनी मिळाली, सदस्य संख्या वाढू लागली. या दुसऱ्या टप्प्यात ‘चलच्चित्र’ हे पहिले फिल्म सोसायटी जर्नलही प्रकाशित करायला सुरुवात केली. त्याचे पहिले संपादक सत्यजित राय होते. नंतर राय चित्रपट निर्मितीत गुंतल्यावर चिदानंद दासगुप्ता संपादक झाले.
कलकत्ता फिल्म सोसायटीसाठी चिदानंद दासगुप्तांनी ‘पोट्रेट ऑफ सिटी’ ही डॉक्युमेंटरी दिग्दर्शित केली. फिल्म डिव्हिजनने ती विकत घेतली. मॉडेल फिल्म सोसायटी कशी असावी याचा कलकत्ता फिल्म सोसायटी हा आदर्श होता. विजया मुळये तेव्हा कलकत्त्यात राहात होत्या. त्यांनी ‘कलकत्ता फिल्म सोसायटी’ची वाटचाल जवळून पाहिली होती. विजयाबाई पाटण्याला राहायला गेल्यावर त्यांनी तेथे ‘पाटणा फिल्म सोसायटी’ १९५५ मध्ये स्थापन केली. त्यांच्याबरोबर अरुणकुमार रॉय होता. प्रारंभी फक्त २० सभासद होते. पण उत्साह उदंड होता. ‘पाटणा फिल्म सोसायटी’ अद्यापही दिमाखात सुरू आहे. विजयाबाई १९५६ साली एनसीआरटीमध्ये नोकरीनिमित्त दिल्लीत आल्या. तेथे त्यांनी ‘दिल्ली फिल्म सोसायटी’ १९५७ मध्ये स्थापन केली. कम्युनिस्ट कार्यकर्त्यां अरुणा असफअल्ली, पुढे पंतप्रधान झालेल्या श्रीमती इंदिरा गांधी आणि इंद्रकुमार गुजराल या फिल्म सोसायटीशी संबंधित होते. १९५७ साली अम्मूस्वामीनाथन्नी ‘मद्रास फिल्म सोसायटी’ची स्थापना केली. त्याचवर्षी मुंबईत ‘आनंदम्’ या फिल्म सोसायटीची स्थापना मृत्युंजय सरकार यांनी केली. ‘आनंदम’मध्ये श्याम बेनेगल, गोपाल दुनिया, नितीन सेठी इ. संबंधित होते. १९४७ ते १९५७ या दहा वर्षांत फिल्म सोसायटीचा खडतर प्रवास सुरू होता. ही संकल्पना फक्त मेट्रो शहरातच आणि मोजक्या लोकांना ठाऊक होती. यावेळी सदस्य संख्या २०/२५ असायची. आंतरराष्ट्रीय चित्रपट मिळविणे हेदेखील जिकीरीचे असायचे. थिएटर्स मिळणेही मुष्कील. पण तरीही केवळ जिद्दीच्या बळावर फिल्म सोसायटय़ांचा खडतर प्रवास सुरूच होता.
सुधीर नांदगांवकर
फेडरेशनचे केंद्रीय सचिव
cinesudhir@gmail.com