Leading International Marathi News Daily

शनिवार, ७ फेब्रुवारी २००९

‘आयटी’ सर्जनशीलतेला ‘नॅसकॉम’ने दिली दाद!
पुणे,६ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) सर्जनशीलतेला ‘नॅसकॉम’ने सलाम ठोकला असून, मुंबईत ११ ते १३ तारखेदरम्यान होणाऱ्या ‘लीडरशिप फोरम’मध्ये नावीन्यपूर्ण उत्पादने-सेवांचा ‘इनोव्हेशन’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

मिरवणूक पाहायला गेली.. अन् जीव गमावला..!
पुणे, ६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

रथसप्तमीनिमित्त काढण्यात आलेली दिमाखदार मिरवणूक पाहण्यास गेलेल्या पाच वर्षांच्या सालिया शेख हिचा सोमवारचा दिवस अखेरचाच ठरला. फटाक्याच्या आवाजाने उधळलेल्या घोडय़ाच्या लाथेमुळे या मुलीचा दुर्दैवी अंत झाला. या प्रकरणी भवानी पेठेतील बालाजी ट्रस्टचे जया किराड यांच्यासह घोडेवाल्याविरोधात खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भवानी पेठेतील रामप्रसाद चिवडा विक्रीच्या दुकानासमोर ही घटना सोमवारी पावणेसातच्या सुमारास घडली.

एलपीजी गॅस टँकर धोकादायक वळणावर उलटल्याने मोठी गॅसगळती
चाकण, ६ फेब्रुवारी/वार्ताहर

एलपीजी गॅस घेऊन निघालेला टँकर चाकण-शिक्रापूर रस्त्यावर शेलपिंपळगाव (ता.खेड) येथील नदीलगतच्या धोकादायक वळणावर उलटल्याने मोठी गॅसगळती झाली. मात्र हा रस्ता तत्काळ वाहतुकीसाठी बंद केल्याने व अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅसगळतीचे प्रमाण कमी केल्याने मोठी दुर्घटना टळली. अठरा तासांहून अधिक काळ हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने रस्त्याच्या दुतर्फा आठ ते दहा किलोमीटपर्यंत पाच ते सहा हजार वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

जुन्नरच्या नवीन बसस्थानकाला शिवाजी महाराजांचे नाव द्यावे
महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषदेची मागणी
जुन्नर, ६ फेब्रुवारी/वार्ताहर
जुन्नरच्या नवीन बसस्थानकास ‘छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक’ असे नाव द्यावे, जुन्नर शहरातील नवीन बसस्थानकाची बी.ओ.टी. तत्त्वावर पुन्हा उभारणी करून त्याचे सुशोभिकरण करावे, अशी मागणी महाराष्ट्र मुस्लीम विकास परिषदेने एका निवेदनाद्वारे केली आहे.जुन्नर शहरातील नवीन बसस्थानकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक असे करावे अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

दुर्ग रायगडवरील छायाचित्रांचे प्रदर्शन
पुणे, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

‘साहस’ संस्थेतर्फे प्रसिद्ध दुर्गप्रेमी सुरेश वाडकर यांनी काढलेल्या रायगड किल्ल्याच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आजपासून बालगंधर्व कलादालनात आयोजन करण्यात आले आहे.
दुर्गप्रेमी वाडकर यांनी महाराष्ट्रातील अनेक दुर्गाची भ्रमंती केली आहे. यामध्ये शिवतीर्थ रायगड हा त्यांच्या विशेष आवडीचा दुर्ग असून आजवर या एका दुर्गाची त्यांनी साडेसहाशे वेळा वारी केली आहे. या भ्रमंतीमध्ये रायगडाची वेगवेगळय़ा ऋतुकाळात त्यांनी काढलेली तीनशे छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांच्या हस्ते उद्या शनिवारी ( दि. ७ ) सकाळी दहा वाजता होणार आहे. या कार्यक्रमास स्थायी समितीचे अध्यक्ष श्याम देशपांडे, राजाभाऊ करंदीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे प्रदर्शन ७ ते ९ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार असल्याचे ‘साहस’चे सचिव विजय डेरे यांनी कळविले आहे.

संगीत रंगभूमीवर प्रसारमाध्यमांचे आक्रमण झाले- जयमाला शिलेदार
पुणे, ६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

बोलपट सुरू झाल्यावर संगीत रंगभूमीवर प्रसारमाध्यमांचे आक्रमण झाले. मात्र आज तळमळीचे दिग्दर्शक मिळाल्यामुळेच काही बांधेसूद नाटकांची निर्मिती होऊ शकली, असे मत ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री जयमाला शिलेदार यांनी आज येथे व्यक्त केले. संगीतमय माहितीपटाचा परामर्श घेणाऱ्या नमन नटवरा या सीडीचे प्रकाशन श्रीमती शिलेदार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष वि. भा. देशपांडे, कीर्ती शिलेदार, माधवी वैद्य, दिलीप वैद्य आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.आजवर संगीत नाटकांची कुचंबणा झाली, मात्र नमन नटवरा या सीडीच्या माध्यमातून संगीत नाटक संग्रहित करण्याचा उत्तम प्रयत्न झाला आहे. घरबसल्या करमणुकीची सवय लागलेल्या आजच्या जमान्यात अशा प्रकारची सीडी अधिक उपयुक्त ठरणार असल्याचेही श्रीमती शिलेदार म्हणाल्या. सरकारनेही संगीत नाटकांच्या मागे खंबीरपणे उभे राहायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.या सीडीच्या रुपाने पुढील पिढीसाठी संगीत नाटकांचा मोठा ठेवाच उपलब्ध झाला आहे, असे वि. भा. देशपांडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. प्रभाकर पणशीकर, रघुनंदन पणशीकर, चित्तरंजन कोल्हटकर आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते. दिलीप वैद्य यांनी आभार मानले.

स्टील खरेदीच्या बहाण्याने तेरा लाख रुपयांना चुना
पुणे, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

चाळीस टन स्टील पाहिजे असल्याची मागणी नोंदवून त्या बदल्यात खात्यात पैसे नसतानाही कंपनीला बारा लाख ८१ हजार ८७६ रुपयांचा ‘चुना’ लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हिर्दीक मेहता याच्या विरोधात विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.मकरंद अनंत अभ्यंकर (वय ४३, रा. शुक्रवार पेठ) यांनी ही फिर्याद दिली आहे. १८ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान सदाशिव पेठेतील जे. के. अभ्यंकर अॅन्ड सन्स या ठिकाणी ही घटना घडली. कॅल कॉम सिस्टिम प्रा. लि. या नावाची कंपनी असल्याचे भासवून मेहताने अभ्यंकर यांच्याशी संपर्क साधला. चाळीस टन स्टील पाहिजे असल्याची मागणी ई-मेलद्वारे केली. त्याबाबत १२ लाख ७७ हजार ५३६ रुपयांची खरेदीची ऑर्डरही त्याने अभ्यंकर यांना दिली. १८ जानेवारी रोजी जालना येथून महाड येथे ४० टन स्टील माल पाठविण्यास भाग पाडले. त्यानुसार फिर्यादीने माल पाठविला असताना खात्यात पैसे नसतानाही मेहताने त्यांना पैसे थांबविण्याची सूचना म्हणून १२ लाख ८१ हजार ८७६ रुपयांचा धनादेश देऊन त्यांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक एम. आर. विचारे तपास करीत आहेत.

हिंदी एकांकी मंचन आणि बहुपात्रीय नाटय़ स्पर्धाचे निकाल जाहीर
पुणे, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेतर्फे आयोजित केलेल्या हिंदी एकांकी मंचन आणि बहुपात्रिय नाटय़ स्पर्धाचे निकाल जाहीर झाले आहेत. एकांकी मंचन शालेयस्तर, प्रथम क्रमांक रेणुका स्वरुप हायस्कूल (बाजीगर), द्वितीय क्रमांक, एचएससीपी हायस्कूल (दीपदान), तृतीय क्रमांक अहिल्या देवी हायस्कूल (नई प्रभात) महाविद्यालय स्तर, प्रथम क्रमांक मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड (फ्लाइंग क्वीन्स), द्वितीय क्रमांक शारदाबाई पवार महिला कनिष्ठ महाविद्यालय (साधु ना ए भोंदू), तृतीय क्रमांक राष्ट्रभाषा महाविद्यालय (कर्ण की माँ)बहुपात्रीय नाटय़स्पर्धा शालेय स्तर, प्रथम क्रमांक यशदा कुलकर्णी, द्वितीय क्रमांक तेजल महाडेश्वर (तृतीय क्रमांक दर्शना करंदीकर), सर्व एचएससीपी हायस्कूल, महाविद्यालय स्तर, प्रथम क्रमांक निशांत शहा (टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय), द्वितीय क्रमांक प्रज्ञा कुंकुलोळ (शारदाबाई पवार महिला कनिष्ठ महाविद्यालय), तृतीय क्रमांक पंकज अ पंचारिया (अहमदनगर महाविद्यालय)स्पर्धाचे परीक्षक म्हणून प्रा. शरद अनवलीकर, डॉ. रेवा कुलकर्णी, देवयानी जगताप यांनी काम पाहिले. याशिवाय व्यक्तिगत, दिग्दर्शन आणि लेखन अशी पारितोषिके देखील देण्यात आली.

इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेस लोकाश्रय
आळंदी, ६ फेब्रुवारी/वार्ताहर

अलंकापुरीतील इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेस लोकाश्रयातून इंद्रायणी सेवा संघाने आळंदीनगर परिषदेच्या सहकार्याने सुरुवात केली आहे. लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आळंदीनगर परिषदेचे नगराध्यक्ष नानासाहेब गरुड यांनी यासाठी पुढाकार घेऊन जेसीबी यंत्र इंद्रायणीनदी पात्रात उतरवून नदीपात्र स्वच्छ करण्यास सुरुवात केली. यास प्रतिसाद देऊन इंद्रायणी नदीकिनारा दर गुरुवार, रविवारी स्वच्छतेचे काम करणाऱ्या इंद्रायणी सेवा संघानेही सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक वसंत नाना लोंढे यांच्या मदतीने जेसीबी यंत्र आणून नवीन पुलापासून नदीपात्र स्वच्छ करण्यास सुरुवात केली. इंद्रायणी सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल वीर, विठ्ठल वाळुंज, नगरपरिषद यांचे माध्यमातून इंद्रायणीतील राडारोडा, कचरा, माती, दगड, गाळ काढण्यास मोठा प्रतिसाद मिळाला. या पावित्र्य कार्यास समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, पदाधिकारी सहभागी झाले.

डॉ. शंकरराव चव्हाण यांचे निधन
पुणे, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

अवसरी बुद्रुक शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी कार्याध्यक्ष डॉ. शंकरराव विठ्ठल चव्हाण (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा आणि सून असा परिवार आहे. अवसरी येथील मुक्तीधाम स्मशानभूमीत डॉ. चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. उपचारासाठी त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांच निधन झाले. अवसरी बुद्रुक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून डॉ. चव्हाण यांनी अनेक वर्ष काम पाहिले.

गुंडाच्या ठार झालेल्या साथीदाराची ओळख पटली
पुणे, ६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

मुंब्रा-पनवेल मार्गावर तळोजा येथे चकमकीत कुख्यात गुंड मोबीन इसाक शेख याच्यासह काल ठार झालेल्या त्याच्या साथीदाराची ओळख पोलिसांना पटली. किरण किसन खराडे (वय २२, रा. कांदिवली) असे शेख याच्या साथीदाराचे नाव आहे. खराडे याच्यासह त्याचे वडीलसुद्धा कांदिवले येथील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. नवी मुंबई व पुणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास केलेल्या संयुक्त कामगिरीत शेख व त्याचा साथीदार ठार झाला होता. शेख हा गेल्या आठ महिन्यांपासून फरार होता. तळोदा येथील एका हॉटेलवर तो व त्याचा साथीदार येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर तेथे पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत दोघेही ठार झाले होते.

‘कॅन उत्सव’ प्रदर्शन ७ फेब्रुवारीपासून
पुणे, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

कॅनरा बँकेच्या महिला उद्योजकता विभागाच्या वतीने येत्या ७ व ८ फेब्रुवारी रोजी ‘कॅन उत्सव’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.कॅनरा बँकेचे सहायक महाप्रबंधक मधुकर पाटणेकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बिबवेवाडी येथील प्राजक्ता हाऊसिंग सोसायटी येथे हे प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (दि. ७) सकाळी दहा वाजता वनराईचे अध्यक्ष मोहन धारिया यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनामध्ये राज्यातील साठ महिला बचतगटांचे स्टॉल राहतील. या महिलांना कॅनरा बँकेच्या वतीने मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे पाटणेकर यांनी या वेळी सांगितले.

पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेतर्फे निदर्शने
पुणे, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

पदविका व प्रमाणपत्रधारक पशुवैद्यकीय व्यावसायिकांच्या आर्थिक व सेवा विषयक गळचेपी विरुद्ध पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेतर्फे आयोजित राज्यव्यापी सामूहिक रजा व निदर्शनास चांगला प्रतिसाद मिळाला. पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे सरचिटणीस डॉ. नारायण जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्य पशुवैद्यकीय परिषद व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ प्रशासनातील उच्चपदस्थ पशुवैद्यकीय व पदवीधर अधिकारी संगनमताने कट कारस्थाने करून व्यावसायिक हक्क सवलती शिक्षण व प्रशिक्षण प्रकरणी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिफारसी डावलून पदविका व प्रमाणपत्रधारक पशुवैद्यकीय व्यावसायिकांची गळचेपी करत आहे. त्याच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले, असे जोशी यांनी सांगितले.

सत्तर हजारांचे दागिने लंपास
पुणे, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने सत्तर हजार रुपयांचे सोन्याचे दागिने नजर चुकवून पलायन करून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार धनकवडी येथे घडला. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा अज्ञात चोरटय़ाविरोधात दाखल केला आहे. जयश्री चंद्रकांत खोले (वय ५२, रा. विहार सोसायटी, धनकवडी) यांनी ही फिर्याद दिली. पितळी भांडय़ांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने चोरटय़ाने महिलेचा विश्वास संपादित केला. त्यानंतर सोन्याचे दागिने पॉलिश करून देत असल्याचे सांगून तो त्यांची नजर चुकवून घरातून ७० हजार रुपयांचे दागिने घेऊन लंपास झाला. पोलीस उपनिरीक्षक आर. एस. जगदाळे तपास करीत आहेत.

मंगळसूत्र हिसकावले
पुणे, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

रस्त्याने पायी जाणाऱ्या वृद्धेच्या पाठीमागून आलेल्या चोरटय़ाने गळ्यातील मंगळसूत्र हिसका देऊन चोरून नेले. दहा हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरीस गेल्याची तक्रार सहकारनगर पोलिसांकडे दाखल करण्यात आली. मधुमालती मधुसूदन पुणेकर (वय ७१, रा. सहकारनगर) यांनी ही फिर्याद दिली.हे दोन चोरटे स्कूटरवरून आले. सहकारनगरमधील नाना स्मृती बंगल्यासमोरील रोडवर ही घटना घडली. पोलीस उपनिरीक्षक आर. एस. जगदाळे तपास करीत आहेत.

वीरशैव लिंगायत, स्वामी समाजांचा राज्यस्तरीय वधू-वर मेळावा
पुणे, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

वीरशैव लिंगायत वधू-वर सूचक मंडळातर्फे येत्या १५ फेब्रुवारी रोजी वीरशैव लिंगायत व स्वामी समाजातील सर्व पोटजातीच्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर बिराजदार यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. औंध येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात सकाळी अकरा वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास चतुशृंगी देवस्थानचे अध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, संगमेश भैर गोंड, सुभाष कित्ते उपस्थित राहतील. या मेळाव्यास वधू-वरांसह येणाऱ्या पालकांना वधू-वर नोंदणीचे अर्ज मोफत देण्यात येतील, असे बिराजदार म्हणाले.

सिंहगड इन्स्टिटय़ूटमध्ये कर्मचाऱ्याची आत्महत्या
पुणे, ६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

वडगाव बुद्रुक येथील सिंहगड इन्स्टिय़ूटच्या वसतिगृहात प्रवीण हनुमंत पिसे या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. इलेक्ट्रीकल विभागात काम करणाऱ्या पंचवीस वर्षांच्या कर्मचाऱ्याच्या आत्महत्येबाबत हवेली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिसे हा इन्स्टिटय़ूटमध्ये कर्मचारी म्हणून कामास होता. वसतिगृहातील खोली क्रमांक ३०२ मध्ये पिसे याने पंख्याला गळफास घेतल्याचे दृश्य त्याचा मित्र अतुल मारणे याला दिसले. मारणे खोलीजवळ गेला असता खोलीचे दार आतून बंद होते. मारणे याने खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यावेळी त्याला गळफास घेतल्याचे दृश्य दिसले. त्याने तातडीने महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पिसे याचा मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात पाठविला.

टेम्पो-मोटारसायकलच्या धडकेत दोन ठार
शिक्रापूर, ६ फेब्रुवारी/वार्ताहर

भरधाव वेगात वळण घेणाऱ्या एका मालवाहू टेम्पोने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले. पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूरजवळ हा अपघात आज दुपारी एकच्या सुमारास झाला.अपघातात पुण्यातील आयडिया सेल्युलर कंपनीचे आशपाक मेहमूद पाशा करपुडे (वय २८, रा. शिवाजीनगर, पुणे, मूळ राहणार लातूर) व अमर रामहरी दुर्गुडे (वय २९, रा. हडपसर, मूळ रा. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) हे दोन युवक मृत्युमुखी पडले. राजेंद्र उत्तम नरवाडे यांनी फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी की, मिल्टन कंपनीकडून निघालेला टेम्पो पुणे-नगर महामार्ग भरधाव वेगाने नगरच्या दिशेने वळला. त्याचवेळी रांजणगाव एमआयडीसीकडे जाणाऱ्या मोटारसायकलला टेम्पोने जोरदार धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवरील दोघे युवक जागीच ठार झाले. अपघातानंतर टेम्पोचालक टेम्पो सोडून पळून गेला. पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांच्या मार्गदर्शनासाठी पोलीस उपनिरीक्षक आर. एम. चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

लाचप्रकरणी पवार, शिंदे यांना जामीन
पुणे, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

सव्वालाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पवार आणि कनिष्ठ अभियंता शशिकांत शिंदे या दोघांची प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आली. दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपली होती. त्यामुळे विशेष न्यायाधीश पी. आर. बोरा यांच्या न्यायालयात आज या दोघांना हजर करण्यात आले. त्यावेळी पवार यांच्याकडून ४९ हजार ५०० रुपयांचा तपास करायचा आहे, तसेच त्यांच्या भावाकडे चौकशी करायची आहे. यासाठी पोलीस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी सीबीआयचे वकील अॅड. मोहनराव देशमुख यांनी केली. अॅड. सुधीर शहा यांनी पोलीस कोठडीची गरज नसल्याचे सांगितले. भावाकडे चौकशी क रण्याऐवजी ती आरोपीकडे करावी. भावाचा या प्रकरणाशी संबंध नाही. पोलीस कोठडीसाठी कोणतेही महत्त्वाचे कारण नाही. आतापर्यंत न्यायालयाने दिलेली कोठडी पुरेशी आहे. यावर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.

सहाव्या वेतन आयोगाला श्रद्धांजली
पुणे, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

सहाव्या वेतन आयोगात महत्त्वाच्या सोयी व सवलती समाविष्ट न केल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी, कर्मचारी संयुक्त संघातर्फे येत्या ७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फुलांची श्रद्धांजली वाहून राग प्रकट करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे सर्व सोयीसवलती व भत्ते देण्यात येतील, असे आश्वासन शासनाने दिले होते. पण या आश्वासनाला मूठमाती देण्यात आली. यासाठी संघातर्फे भोजनकाळात फुलांची श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. सुधारित सहाव्या वेतन आयोगासाठी सात हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असे आश्वासन देण्यात आले होते. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी, मार्च-२००९ मध्ये थकबाकीचा दुसरा हप्ता तसेच २००९ मध्ये तिसरा हप्ता देण्यात यावा, केंद्र शासनाप्रमाणे घरभाडे भत्ता, शहर भत्ता, वाहन भत्ता आदींबाबतची अंमलबजावणी करण्यात यावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकी रोख स्वरुपात २००९ मध्येच देण्यात यावी आदी मागण्याही या वेळी करण्यात येणार असल्याचे रमेश आगवाणे, सुधीर पिंपळे, दत्तात्रय धुमाळ, लक्ष्मीकांत पाचारण, मनोहर गीर, विनायक राऊत यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

शांता शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त कविसंमेलन
पुणे, ६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी शांता शेळके मराठी कविता ग्रंथालयातर्फे येत्या ७ मार्च रोजी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कविसंमेलनात नवोदित कवींना संधी मिळणार आहे. तरी कवींनी २० फेब्रुवारीपर्यंत पुणे मराठी ग्रंथालय, ४३७-ब नारायण पेठ, पत्र्यामारुती-लोखंडे तालीम रस्ता, पुणे-४११०३० या पत्त्यावर आपल्या कविता पाठवाव्यात. या कविसंमेलनाला ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आनंद यादव उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात साठ ते सत्तर कवींना कविता सादर करण्याची संधी मिळेल.